—–
“का रे, असाईनमेंट लिहिली का?” आमच्यापैकी कुणीतरी एक नेहमीप्रमाणेच कुणातरी एकाला विचारत असतो. “‘त्या’नं लिहिली असेल ना!” अपेक्षित उत्तर येतं. ‘तो’ कुठेतरी कोपर्यात बसून दुसरी एखादी असाईनमेंट किंवा जर्नल लिहित असतो. “काय रे नेहमी सगळं सगळ्यांच्या आधी लिहून दाखवतो, आमची लागते ना!” म्हणत म्हणत आम्ही त्यानं लिहिलेल्याची झेरॉक्स काढायला घेतो. तो फक्त “मारा, मारा अजून” ह्या अर्थी मान हलवतो.
—–
“काय रे, ह्या पुस्तकातनं काही कळत नाहीये रे!” आमचा नेहमीचा प्रेमसंवाद सुरू असतो. “हे फक्त मार्क मिळवायचं पुस्तक आहे रे, ह्यामधनं कळणार काहीच नाही, पण प्रश्न मात्र सगळे ह्यातनंच येतील बहुतेक!” दुसरा कुणीतरी नुकतंच कुठेतरी सिनीयरकडून ऐकलेलं ज्ञानामृत पाजतो. “अरे त्यापेक्षा ते रेफरन्स बुक वाचा ना. त्यामध्ये सगळे कन्सेप्ट्स एकदम क्लिअर होतील.” हे कोण बोलिले बोला म्हणून आम्ही पाहतो तर अपेक्षेप्रमाणेच तो ओशाळून आमच्याकडे पाहत असतो. “च्यायला तू पण ना, पुस्तकांशीच लग्न कर. किती वाचणार? अरे ते स्वर्गातून बोंबलत असतील, आम्हाला सोड, आम्हाला सोड म्हणून.” आणि कुणाच्यातरी ह्या जोकवर सगळे मनसोक्त हसतात. तो नेहमीसारखाच “मारा, मारा अजून” ह्या अर्थी मान हलवतो आणि ओशाळवाणं हसतो.
—–
“च्यायला ‘हा’ बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक पुस्तकं वाचण्याचा रेकॉर्ड तोडणार आहे.” परीक्षा डोक्यावर असताना रिकाम्या वर्गात बसून सिलॅबसकडे नजर टाकताना आणि त्यातली रेफरन्स बुक्सची नावं वाचताना सुचलेला माफक विनोद. “का रे? ह्यातली कुठली कुठली, किती झाली वाचून?” अजून कुणीतरी त्याला टोकतो. तो नेहमीसारखी मान डोलावतो आणि म्हणतो, “चला ना यार, चहाची तल्लफ आलीय.”
—–
परीक्षेचा पेपर सुरू आहे. सगळे प्रचंड तणावाखाली आहेत. जनरली आमच्या ग्रुपमधली सगळी पोरं जवळपास फर्स्ट क्लासातली, त्यामुळे पेपर एकसारखेच जातात. त्यात आजच्या पेपराला ‘अर्ध्याहून जास्त सिलॅबसबाहेरचं’ आहे. कुणीही जास्त लिहू शकत नाहीये. आणि ‘हा’ दुसरी पुरवणी मागतो. पेपर संपतो, तरी हा लिहितोच आहे. संपल्या संपल्या, त्याच्या वर्गात असणारा आमच्यातला एक पोरगा त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, “लागलीय यार.” “अरे काय, सिंपल होता!” ‘हा’. आम्ही सगळे कॉलेजच्या इमारतीबाहेर ही कथा ऐकून गारद. आणि निकाल लागल्यावर आमच्यामध्ये सर्वांत कमी मार्क ‘त्या’लाच. “सगळ्यांत जास्त अभ्यास करून, सगळ्यांत कमी मार्क का मिळतात यार त्याला?” आम्हा सगळ्यांनाच त्याचं दुःख.
—–
पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याला केटी लागते. तो पेपर रिव्हॅल्युएशनला टाकतो, पण रिव्हॅल्युएशनचा निकाल येण्यापूर्वी केटीची परीक्षा उगवते. हा परीक्षा देतो आणि नंतर कळतं की हा रिव्हॅल्युएशनमध्ये पास झालाय आणि केटीमध्ये सुद्धा. ऑफकोर्स तो रिव्हॅल्युएशनचा निकाल मार्कशीटवर प्रीफर करतो. पण ह्या सगळ्यामध्ये तो अर्ध्याहून जास्त सेमिस्टरभर अर्ध्या डझनाहून जास्त वेळा युनिव्हर्सिटी ऑफिसच्या चकरा मारतो. आम्ही त्याला नेहमी चिडवतो, की “तू युनिव्हर्सिटी एक्स्पर्ट आहेस.” जेव्हा कुणी नवा मुलगा युनिव्हर्सिटीत अमुक ऍप्लिकेशन कसं करायचं विचारतो, आम्ही ’त्या’च्याकडे बोट दाखवायचो, ”हा तुला बस स्टॉप पासून, कुठला क्लार्क आणि कुठला फॉर्म कुठे मिळेल हे सगळं सांगेल!” आणि हसायचो. तो फक्त नेहमीसारखीच मान हलवायचा.
—–
आम्ही सगळे एकदा कॉलेजकडून घरी निघालो होतो. एका ठिकाणी रस्त्याला फाटा फुटायचा आणि तो वळणदार होता, अगदी जाणवेल इतका वर्तुळाकार फाटा. तर आम्ही सगळे चालत स्टेशनाकडे निघालो होतो. अचानक, एका गाडीतून माणसानं काच खाली करून मला विचारलं, “अमुक ठिकाणी कसं जायचं?” मी काही बोलायच्या आत ‘हा भाई’ पुढे सरसावून “यहां से सीधा जाओ, सीधा जाओ” असं तोंडानं सीधा म्हणत हात वर्तुळाकृती फिरवून दाखवत होता. आम्ही त्यानंतर घरी पोचेपर्यंत सारखे सीधा सीधा म्हणत गोलाकार हात फिरवून लोटपोट होत होतो. आणि तो नेहमीसारखीच मान डोलवत होता.
—–
२६ जुलैच्या प्रलयंकारी पावसात माझ्याबरोबर तो आणि अजून एकजण होता. आम्ही वडलांच्या एका मित्राकडे रात्र काढून सकाळी चालत अंधेरीपासून मालाडपर्यंत आलो होतो. माझ्या घरी दुपारचं जेवण करून मग पुढे जा, असा आईचा आदेश होता. त्यादिवशी २७ जुलैला ‘त्या’चा वाढदिवस होता. आईनं काहीतरी गोड केलं आणि त्याचा वाढदिवस अगदी साधाच साजरा केला. मी त्याला गंमतीनं म्हटलं, “हा तुझा सर्वांत संस्मरणीय वाढदिवस बघ!” त्यानं नेहमीसारखीच फक्त ह्यावेळी आनंदानं मान डोलावली.
—–
मी मोठ्या धामधुमीतून, निवडणुका, गैरसमज अशा वाईट वातावरणात जी.एस. म्हणून निवडून आलो होतो. त्या काळामध्ये मला कुणाचा आधार होता, तर आमच्या पाच जणांचा. पडेल ते काम आणि गरज लागेल तेव्हा साथ ह्या गोष्टी निःस्वार्थीपणे सगळ्यांनी दिल्या त्या वेळी. कॉलेजच्या फेस्टिव्हलच्या वेळेस, “अरे तू इथे जा, अरे तू तिथे जा”, करून आमच्या सगळ्यांनी जवाबदार्या वाटून घेतल्या होत्या, तेव्हा सगळ्यांत नॉन-ग्लॅमरस आणि कंटाळवाणं काम कुठल्याही तक्रारीशिवाय फक्त मैत्रीखातर करणारा ‘तो’ होताच.
—–
कॉलेजच्या तिसर्या वर्षापासूनच त्यानं एम.बी.ए. करायचं ठरवलं होतं. तो मेहनती होता, पण कदाचित ऍप्टिट्यूडमध्ये आणि पब्लिक स्पीकिंगमध्ये कमी पडायचा. त्यामुळे आम्ही त्याला “तू एम.बी.ए. कशासाठी होतो? तू होऊन काय करणार?” वगैरे पीडायचो. पण त्याच्या मनाने ते घेतलेलं होतं. की त्याला एम.बी.ए. करायचंय. तो परीक्षा देतच होता. त्याला नोकरी लागली. इंजिनियरिंग पूर्ण झाल्यावरही, तो एम.बी.ए. ची एन्ट्रन्स पास करू शकला नव्हता. त्यानं नोकरी सुरू केली आणि त्याच्या ट्रेनिंग बॅचपैकी त्याचं एकट्याचं पोस्टिंग बँगलोरला झालं. तो तरीही एम.बी.ए. साठी प्रयत्न करत होता. फायनली त्यानं मुंबई पोस्टिंग मिळाल्यात जमा होतं. तो मुंबईत आला आणि त्याला एम.बी.ए.ला ऍडमिशन मिळाली. गंमत म्हणजे, त्याच्या कंपनीनंही गुडविलमध्ये त्याचा बॉन्ड माफ केला. तो अतिशय खुष होता. आणि शेवटी एकदाचं त्याचं स्वप्न पूर्ण होतंय म्हणून आम्ही. माझ्याशी त्याचं अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं. “गेम झालाय रे!” हा त्याचा तकिया कलाम बनला होता. पण तरी त्याची इच्छाशक्ती शिल्लक होती. आता ह्यावेळेस त्याला भेटेन तेव्हा, “गेम झालाय रे!” ऐकायला मिळणार नाही, ह्याची खात्री होती. आणि अचानक एक दिवस कॉलेज सुरू झाल्याच्या काही दिवसांतच तो हॉस्पिटलाईज झाल्याची बातमी आली.
बँगलोरपासूनच तो डोकेदुखी घेऊन आला होता. दिवसातून दोन-तीन ऍस्पिरिन्स घेण्यापर्यंत स्थिती पोचलेली होती. तो आय.सी.यू. मध्ये होता. मला मुंबईला यायला अजून वीसेक दिवस होते. मग अचानक त्यानं थोडी रिकव्हरी केल्याचं कळलं. मी त्याला फोन केला. “गेम झालाय रे! वाचता पण येत नाही. डोकं दुखत राहतं.” पण तरी त्याच्या आवाजात थोडा तजेला जाणवला. मी म्हटलं, “डोन्ट वरी, मी येईन तोवर होशील ठीक. आल्यावर बोलूच अजून. आराम कर.” पण.. ते शेवटचंच बोलणं होतं आमचं. ‘तो’ गेला.
हजारो स्वप्न उराशी बाळगलेला आमचा जिवाभावाचा मित्र गेला. मी त्याला शेवटचा भेटूही शकलो नाही. दोन वर्षांपूर्वी १३ नोव्हेंबरला तो गेल्याचा मेल मी सकाळी ऑफिसला पोचल्या पोचल्या मला मिळाला होता. त्याला जाऊन दोन वर्षं झालीत, ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही. दरवेळी आम्ही भेटतो, तेव्हा त्याचा उल्लेख होतो, त्याची कमतरता जाणवते. आमच्यातला सर्वांत लो-प्रोफाईल आणि बरेचदा कुणाचीतरी पंचिंग बॅग ठरणारा तो आमच्या सर्वांमधला एकमेव अजातशत्रू होता, ह्यावर कुणाचंही दुमत होणार नाही. त्याची किंमत आम्ही कधी केली नाही असं नाही, पण कुणाच्याही जाण्यानंतर त्याची जी उणीव भासते, त्यावरून त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं होतं ह्याची जाणीव होते. आम्ही भेटलो की त्याच्या उल्लेखानंतर आम्ही कधी त्याच्याबद्दल फार बोलत नाही, पण आम्ही सगळेच त्याला फार मिस करत असतो हे दोन क्षण जाणवणार्या तणावावरून कळतं. वर लिहिलेले आणि ह्याहूनही कित्येक जास्त प्रसंग जे आमच्या आयुष्यांत आले, त्यांच्या रूपानं तो अजूनही आमच्यामध्येच आहे. कदाचित वरती त्याच्या आवडत्या रेफरन्स बुक लेखकांच्यात बसून तो आमच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असेल, आणि नेहमीसारखीच मान डोलावत असेल.
0 comments:
Post a Comment