नुकतच झालं होतं लाडक्या आजोबांचं निधन...
भांबावलेल्या चिंटूच सुन्न झालं होतं मन...
५ वर्षाचा निरागस चिंटू आजोबांच्या झोपडीत गेला आणि..
ओक्साबोक्शी रडला... हातात घेऊन ...आजोबांचा पाणी पिण्याचा पेला....
झोपडीच्या समोरच दिसत होत आई-बाबांचं टुमदार घर..तरीही
चिंटूच प्रेम जडलं होतं..आजोबांच्याच झोपडीवर...
"काय रे झालं सोन्या ?" म्हणत जवळ आली आई...
चिंटू बोबड्या रागात म्हणाला..."मला तुम्ही दोघंही आवलत नाही.."
आईने प्रेमाने घेतलं...चिंटूला कवेत,
हंबरडाच फोडला त्याने...."मला आजोबा हवेत..."
आई-वडिलांना पण अश्रू झाले होते अनावर..पण त्यांना..
"निरागस धडा" शिकवायचं चिंटूने पण घेतलं होतं मनावर..
पेल्याबरोबर हळूच त्याने काढलं आजोबांचं जेवणाचं तुटलेलं ताट...
छातीशी दोन्ही घट्ट पकडून फिरवली आई-बाबांकडे पाठ..
बुचकळ्यात पडलेल्या बाबाने विचारलं..काय रे करतोस चिंटू ??
चिंटू म्हणाला ," धुवून जपून ठेवतोय ह्या दोन्ही वस्तू"..
"का रे ?" म्हणून विचारल्यावर चिंटूने दिलं उत्तर....
ते ऐकल्यावर..मान खाली घालून आई-बाबा दोघंही झाले निरुत्तर..
चिंटू म्हणाला,"म्हाताले झाल्यावर तुम्ही पण ईकलेच येनाल...
तेव्हा मी तुम्हाला यातूनच खायला प्यायला देनाल"....
उत्तर ऐकून.....वागलो कसे वडिलांशी हे दोघांनाही आठवलं..
लक्षात आलं की वय झाल्यावर त्यांना आपणच झोपडीत पाठवलं
चिंटूचे ते निरागस शब्द काळीज गेले चिरून....
पश्चात्तापाने आईही रडली...बाबांना घट्ट धरून..
बाबा म्हणाले...."छोटा असून दिलीस तू आम्हालाच चांगली शिकवण"..
तुझ्या या उत्तराचे कधीच मिटणार नाहीत मनावर झालेले व्रण..."
आपणही लक्षात ठेवू.....खाण तशी माती आणि झाड तशी वेल..
पेरलेल्या बी ला जसं घालाल खतपाणी, तशीच ती उगवेल....
0 comments:
Post a Comment