तर त्या वीजेतून मी वाचलो. कसा वाचलो, ते मला ठाऊक नाही. पण खरी गोष्ट पुढेच आहे. तेव्हापासून एक विचित्र गोष्ट सुरू झाली. आणि ती मला कळली ती अशी.
एक दिवस मी हॉस्पिटलमध्येच पेपर वाचत बसलो होतो. पेपरात राहुल गांधींनी कशी एका दलिताच्या घरी रात्र घालवली. किती कामं केली, अशी बातमी होती. ती वाचता वाचता अचानक माझं डोकं भिरभिरायला लागलं. मला अचानक खूप तहान लागल्यासारखं झालं. मी पाणी घेण्यासाठी हात बाजूला करणार एव्हढ्यात हातातलं त्राण गेल्यागत वाटायला लागलं. आणि मी एकदम एका पर्णकुटीसमोर उभा असल्याचा मला साक्षात्कार झाला. पर्णकुटीच्या आजूबाजूला अनेकानेक सुरक्षारक्षक उभे होते. मी एकदम सावध झालो. एव्हढ्यात त्यातला एकजण माझ्या दिशेनंच येत असल्याचा मला भास झाला. मी चटकन आजूबाजूच्या किर्र अंधाराचा फायदा घेतला. मला कळेना, की आपण इथे काय करतोय. डोकं काम करेनासं झालं होतं. मी लपत छपत कसातरी त्या पर्णकुटीच्या मागच्या बाजूला पोचलो. तिथे एक छोटीशी खिडकी होती आणि त्यातून मिणमिणता प्रकाश येत होता. मी हळूवार पावलं टाकत टाकत खिडकीपर्यंत पोचलो आणि आतलं दृश्य पाहून त्या मिणमिणत्या प्रकाशातही माझे डोळे दिपून गेले. राहुल गांधी कंदिलाच्या प्रकाशात जेवत होते. ती माऊली आपल्या पोरांबरोबरच कोरडं-ओलं जे काही होतं, ते त्यांना घालत होती. ते ही मोठ्या आनंदाने ते खात होते. मी मनाशीच म्हटलं, आपण काय समजत होतो राहुलजींना. चुकलंच आपलं.
मग मी बराच इथे तिथे फिरलो, पण मला अंदाजच येईना मी कुठेय. शेवटी कंटाळून पुन्हा पर्णकुटीजवळ आलो आणि खिडकीतून डोकावलो. कंदिलाचा उजेड थोडा कमी केला होता आणि राहुलजी इतरांबरोबरच गोधडीवर झोपले होते. शांत, लहान मुलासारखे. माझे डोळे भरून येताहेत वाटेस्तोवर कुणीतरी माझा दंड धरल्याची मला जाणीव झाली आणि मी एकदम भानावर आलो. आई माझ्या दंडाला धरून मला हलवत होती. मी माझ्या हॉस्पिटलच्या खाटेवर होतो. माझ्यासमोर पेपर पडला होता.
“काय झालं रे?”
“कुठे काय?”
नाही, ते स्वप्न नव्हतं. मलाही आधी तसंच वाटलं होतं. पण मग मी तो प्रयोग दुसर्या दिवशी लगेच पुन्हा केला. ह्यावेळी मी मंत्रीमंडळाच्या बैठकीचा रिपोर्ट वाचत होतो. मी आपोआप मंत्रालयात बैठकीच्या सभागृहात पोहोचलो. अतिशय सामंजस्यानं जनहिताचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. साधक-बाधक चर्चा होत होती. योग्य ते निर्णय सार्वमतानं घेतले जात होते. एव्हढंच काय तर मंत्र्यांनी नाष्टाही केला नाही हो. तसाच पडून राहिला बैठक संपल्यावर. मी पडद्याच्या मागे उभा राहून सगळं पाहत होतो. मंत्री कलटल्यावर मी राहिलेल्या नाष्ट्यातले दोन वडेही हाणले. मग सभागृहातून बाहेर पडायचा प्रयत्न केला. पण मी बाहेर पडूच शकत नव्हतो. मला कळेना. मला सभागृहाचा दरवाजा दिसत होता. तिकडूनच सगळ्यांना बाहेर जातानाही पाहिलं होतं मी. पण माझ्यासाठी मात्र ती एक भिंत झाली होती. एखाद्या भित्तीचित्रासारखी! मग माझ्या लक्षात आलं. माझी बातमी फक्त बैठकीची आहे. मग मी टंंगळमंगळ करत बसलो. दोन वडे अजून हाणले. कुणीतरी उठवायची वाट बघत बसलो. शेवटी एकदाचं नर्सनं हलवलं आणि मी बातमीतून बाहेर आलो.
आता कन्फर्म झालं होतं की ते स्वप्न नव्हतं. एक विचित्र थकवा जाणवत होता. आदल्या दिवशीही असंच झालं होतं. असं वाटत होतं जणू माझ्या आत्म्याला कुणीतरी शरीरातून खेचून नेतं. मी वेड्यासारखा झोपलो. तब्बल १४ तास सलग. काहीतरी घोळ होता खास. तिसर्या दिवशी मी आराम करायचं ठरवलं. माझ्या विचित्र झोपण्याने बावचळलेल्या डॉक्टरांनी मला अजून थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवशीही मी पेपरापासून दूरच राहिलो. मला क्षणभर असंही वाटून गेलं की हा एखादा मानसिक आजार तर नाहीये! पण मग मन कसंतरी शांत केलं. पण पाचव्या दिवशी मन स्वस्थ बसू देईना. सकाळचा नाष्टा उरकल्यावरची औषधं झाली, की दुपारपर्यंत कुणी येत नाही, तेव्हाच मी धडधडत्या छातीनं पेपर हातात घेतला.
मग लक्षात आलं की मी पुरवणी उचललीय. मी एका घरामध्ये बसलो होतो. विचित्र वाटत होतं. घरामध्ये कुणीच नव्हतं. असं कसं होईल, हा मी विचार करत होतो. मी नक्कीच कुणाच्यातरी अनुभवांचा लेख वाचायला घेतला होता. तेव्हढ्यात मला काही वेगवेगळे आवाज ऐकू आले. ते घराच्या बाहेरून येत होते. मी आवाजाच्या दिशेनं गेलो तर घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि बाहेर एक नवरा-बायको एक कावळ्याला बुंदीचा लाडू खायला घालत होते. माझा क्षणभर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो कावळा चक्क एखाद्या लहान बाळाच्या आकाराएव्हढा मोठा होता. मी डोळे चोळले आणि दरवाज्यातून बाहेर पडून अंगणात आलो, तर एक २०-२५ वर्षांचा तरूण व्हिडिओ कॅमेरानं त्या सोहळ्याचं शूटिंग करत होता. मी सुन्न झालो होतो. ते नवरा-बायको ‘घे लाडू, लाडू! घे ना!’ असं काहीतरी असंबद्ध बरळत होते. एव्हढ्यात तो शूटिंग करणारा मुलगा म्हणाला, “मामी, तुमचा हा लाडू कावळा भारी बरं का?” मला मूर्च्छना येते की काय असं वाटायला लागलं. त्या कावळ्याच्या समोरच एक पाण्याचा मोठा वाडगा भरून ठेवला होता, मी काही विचार न करता धावत धावत तिथे गेलो, आणि तो वाडगा उचलून तोंडावर पाणी मारलं. ह्या धक्क्यानं लाडू कावळ्यालाच मूर्च्छना आली, त्या तरूणाचा व्हिडिओकॅमेरा जमिनीवर पडला आणि नवरा-बायको हातात लाडू घेऊन अविश्वासाने एकदा मूर्च्छित कावळ्याकडे आणि एकदा माझ्याकडे पाहत होते. तो तरूण ‘माझा अमेरिकन व्हिडिओ कॅमेरा पडला’ असं काहीसं पुटपुटत होता. आता मात्र मी टेन्शनमध्ये आलो. मी लेखातला घटनाक्रम बदलला होता. काहीतरी लोचा होऊ शकला असता. पण नशीबानं एक नर्स मला हलवायला आली आणि मी परतलो. मी पूर्ण भिजलो होतो. खोलीभर पाणी झालं होतं. म्हणूनच अवेळी नर्स बघायला आली होती. मला खूपच अशक्तपणा आला होता. मी आडवा पडलो, पण विचारचक्र फारच जोरात सुरू झालं होतं.
हे सगळं काय होतं? एक काळाला पडलेलं छिद्र, जे माझ्या मेंदूशी आणि आत्म्याशी त्या वीजेनं जोडलं गेलं होतं? की नुसतेच माझ्या मनाचे खेळ?
हे सगळं काय होतं? एक काळाला पडलेलं छिद्र, जे माझ्या मेंदूशी आणि आत्म्याशी त्या वीजेनं जोडलं गेलं होतं? की नुसतेच माझ्या मनाचे खेळ?
मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज द्यायला डॉक्टर तयार झाले. लाडू कावळ्याच्या वेळी खोलीभर झालेल्या पाण्याचा अन्वयार्थ माझ्या धक्क्याने जमिनीवर पडलेला फ्लास्क असा लागला होता. पण मी भिजलो कशाने होतो, ह्याचं उत्तर मी सोडून कुणाकडेच नव्हतं. मी घरी पोचलो पण मला बिलकुल स्वस्थता मिळत नव्हती. माझं मन पुनःपुन्हा कालछिद्राकडे झेप घेत होतं. एक प्रकारचा चस्का लागला होता. तब्बल ५ दिवस झाले होते मला काळाचे पापुद्रे ओलांडून. आताशा तल्लफ यायला लागली होती. आई-बाबा एक दिवस सकाळचेच कुणाकडे तरी गेले. आणि मी तहानलेल्या माणसानं पाण्याचा एक थेंब शोधावा, तस्मात पेपर शोधत होतो. आदल्याच दिवशी बहुतेक रद्दी टाकण्यात आली होती. माझी अस्वस्थता वाढत होती. आणि अचानक माझी नजर एका कोपर्यात गेली. तिथे एक काळवंडलेला पेपर पडला होता. मला शंका वाटली, म्हणून मी अजून जवळ गेलो आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हा तोच पेपर होता, जो माझ्याबरोबरच वीजेतूनही बचावला होता. मी तो पेपर उचलणार एव्हढ्यात दरवाजाची बेल वाजली. मी नाईलाजानंच दार उघडायला गेलो. कुरियरवाला होता. घाईगडबडीत सही करून त्याला कटवलं. दरवाजा बंद केला आणि एखाद्या नशैडीनं भांगेकडे जावं त्या उत्कटतेनं मी विद्युतंजय पेपराकडे निघालो पण एकदम पायात काहीतरी आलं. मी खाली पाहतो तर त्यादिवशीचा ताजा पेपर. मी अधाश्यासारखा तो पेपर उचलला आणि वाचायला लागलो.
मी एका मोठ्या महालसदृश इमारतीमध्ये उभा होतो. इमारत अनोळखी वाटत होती. काहीतरी विचित्र अशी जाणीव होत होती. चहूकडे ‘जनाब’, ‘वजीर-ए-आज़म’, ‘वजीर-ए-आला’ असले शब्द ऐकू येत होते. मला जनाब हा शब्द माहित होता, पण वजीर-ए-आज़म? मी मुगले आजम ऐकलं होतं. आम्ही आमच्या एका मित्राला, चुगले आजम आणि एकाला फुकटे आजम ही म्हणायचो, पण वजीर-ए-आज़म? आणि वजीरे आला, हे कुठलं मराठी? वजीर आला किंवा वजीर आले. वजीरे हे कुठलं रूप आणि त्यापुढे आला. जाऊ दे. एव्हढा सगळा विचार करेपर्यंत एकदम मोठा जमाव समोरून येताना दिसला. आधी वाटलं की मोर्चेकरी आहेत, मग लक्षात आलं पत्रकार आहेत. सगळ्यांच्या ओळखपत्रांवर उर्दूत खरडलं होतं काहीतरी आणि मग माझ्या डोक्यात पुन्हा एकदा प्रकाश पडला की आपण पाकिस्तानात आहोत. मी पुन्हा आजूबाजूला पाहिलं. काहीतरी गडबड वाटत होती. अचानक एकदम हळू आवाजात चर्चा होत असल्यासारखं वाटलं. मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. मी उभा होतो त्याच दालनात एका बाजूला एक पडदा टाकून ठेवला होता. मी तिकडे गेलो. जसजसा जवळ जात होतो, आवाज थोडा थोडा वाढत चालला होता. मी पडद्यामागे पोचलो आणि पडदा थोडासा सरकवून डोकावलो. पाहतो तर काय, समोर एका सोफ्यावर आपले परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा आणि एक खुनशी चेहर्याचा गृहस्थ बसले होते. तो बहुधा पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री असावा असा मी अंदाज़ बांधला. कारण एस.एम. कृष्णा त्याला सज्जड दम देत होते. भारतानं एव्हढे पुरावे देऊनही ‘हाफिज़ सईद’ ला पुरावा ही मागणी का मान्य केली जात नाही. भारताच्या सामंजस्याला भारताचं दौर्बल्य समजू नका वगैरे हाग्या दम इंग्रजीत देणं चाललं होतं. एस.एम. कृष्णांचा आवाज दोन फुटांपलिकडेही ऐकू येतो आणि त्यांच्या चेहर्यावरच्या रेषाही हलतात हा साक्षात्कार मला अचानकच झाला होता. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री चक्क खाली मान घालून ऐकत होता आणि सगळं मान्य असल्याचंही उर्दूत सांगत होता. एव्हढ्यात मी ज्या पडद्याला धरलं होतं तो पडदा वरूनच तुटला आणि मी तोंडावर पडलो.
आई मला उठवत होती.
‘असा हॉलच्या जमिनीवरच कशाला झोपला होतास रे? तब्येत तर ठीक आहे ना?’ आई काळजीच्या स्वरात विचारत होती. पण मला काही ऐकू कुठे येत होतं. मला पुन्हा अशक्तपणा आला होता, पण हवी ती किक मात्र मिळाली होती.
कसेबसे दोन दिवस ढकलले आणि पुन्हा आई आणि बाबा एकत्र बाहेर पडण्याचा मणिकांचन योग जुळून आला. आताशा माझ्या प्रत्येक संदिग्ध बेशुद्धीच्या घटनास्थळी मिळालेल्या वर्तमानपत्रांवरून आईचा संशय वर्तमानपत्रांवर बळावला होता. त्यामुळे घरातली वर्तमानपत्र गायब होऊ लागली होती. पण मी हुशारीनं स्वयंपाकघरातल्या फडताळांच्या फळ्यांवर टाकलेलं एक वर्तमानपत्र काढलं. जुनं तर जुनं. आणि वाचायला सुरूवात केली.
मी एका बंगल्याच्या हॉलमध्ये उभा होतो. मला काही संदर्भ लागायच्या आत, मोठमोठ्या किंकाळ्या ऐकू यायला लागल्या. एक बाई वरच्या मजल्यावरून जिवाच्या आकांतानं धावत खाली आली. मी जागच्या जागीच थिजलो. तिच्या अंगावर ठिकठिकाणी रक्त होतं. तिच्या मागोमाग एक पुरूष हातात चाकू घेऊन धावत खाली आला. मी काही कळण्याच्या स्थितीत नव्हतो. ती बाई दरवाजाच्या दिशेनं धावली, पण तिला दरवाजाच उघडता येईना. मग ती मागे आली आणि सरळ माझ्या दिशेनेच धावायला लागली. मी उभ्या जागी हादरलो. तो माणूस तिच्या मागेच होता. त्यानं तिला मधेच गाठलं, सोफ्यावर ढकललं आणि … आणि भोसकून ठार मारलं. मग त्यानं त्याची नजर वर केली आणि ती माझ्यावर स्थिरावली. आईनं त्याक्षणी मला जागं केलं नसतं, तर काय झालं असतं हे मला ठाऊक नाही. मी जागा झाल्या झाल्या उलट्या करायला लागलो. न जाणे किती वेळ उलट्या करत होतो. पोटातला कणनकण बाहेर पडला पण मळमळ जात नव्हती. ते रक्ताचं थारोळं डोळ्यांसमोरून जात नव्हतं. मी पुन्हा पेपरांना हात न लावण्याचा प्रण केला.
दोन दिवस झाले होते. हळूहळू गाडी पूर्वपदावर येत होती. मी सोफ्यावर बसून रिमोटशी खेळत होतो. तेव्हा एका न्यूज चॅनेलवर, “क्या रोहिणीका पती ही उसका खुनी है?” अशा नावाची एक सेगमेंट सुरू झाली. खाली, हां किंवा ना साठी वापरायचे एसएमएस कोड्स स्क्रॉल होत होते. पण एकदम टीव्हीवर आलेल्या फोटोनं माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ही तीच बाई होती. होय, तीच. मी कसा विसरू. तीच. तेच डोळे, तेच नाक. म्हणजे मी हिचा खून पाहिला होता! पण मग पुढे आलेल्या बातमीनं मी सुन्नच झालो. तिचा खून नवर्यानं केला होता आणि नवर्याला शिक्षा सुनवायची तेव्हढी बाकी होती आणि नवरा…. तो नव्हता ज्याला मी पाहिलं होतं!
मी इंटरनेटवर बसून गेल्या दोन महिन्यांतली सगळी वृत्तपत्र चाळली आणि मला ते विवक्षित पान मिळालं. इंटरनेटवर धुंडाळताना मी फार काळजीत होतो, पण इंटरनेटवर वाचताना मला ते होत नव्हतं, जे पेपर वाचताना व्हायचं. मी ते पान काळजीपूर्वक परत वाचलं. त्या पानावर खून झाल्याझाल्याची प्राथमिक माहिती होती आणि पोलिसांचा प्राथमिक अंदाज एका चोरानं हे कृत्य केलं असल्याचा होता, ह्याचंच वर्णन केलेलं होतं. मी विचारात पडलो.
हे कसं शक्य आहे. मी जे पाहिलं, ते सत्य होतं, की जे न्यायालयात सिद्ध झालंय ते? पेपरात लिहिलेलं जर मी प्रत्यक्षात बघू शकतो, अनुभवू शकतो, तर तेच खरं असणार ना. काय चाललंय नक्की! मी कोलमडून गेलो होतो. शरीर थकत होतं आणि मनही.
दुसर्याच दिवशी मी एक प्रयोग करायचा ठरवला. मी घराच्या खालच्या सार्वजनिक वाचनालयातून एक पेपर लपवून घेऊन आलो. कारण माझ्या घरातली सगळी वर्तमानपत्र एव्हाना गायब झालेली होती. कुणी आजूबाजूला नाही हे पाहून मी ते वर्तमानपत्र समोर ठेवलं आणि वाचायला लागलो. पहिलीच बातमी नक्षली हल्ल्याची होती. नक्षलवाद्यांनी किती निर्घृणपणे ४० पोलिसांची हत्या केली ह्याचं अंगावर काटा आणणारं वर्णन होतं. पण गंमत बघा. मी ते वर्णन पूर्ण वाचून काढलं आणि मला काहीही झालं नाही. मी तिथेच होतो. हातात पेपर धरून. मला काहीच कसं झालं नाही? मी त्या हल्ल्याच्या जागी कसा पोचलो नाही? मी मनोमन देवाचे आभार मानले, कारण मी मूर्खासारखी एव्हढी डेंजर बातमी वाचायला घेतली होती.
मग मी त्याखालची बातमी वाचायला घेतली. विदर्भातल्या एका शेतकर्याच्या आत्महत्येची बातमी होती. त्याच्या कुटुंबाची दुर्दशा वर्णन केली होती. आश्चर्य म्हणजे मी तीसुद्धा बातमी पूर्ण वाचून काढली आणि मला काहीही झालं नाही. च्यामारी, म्हणजे माझा मेंदू ह्या विचित्र कालछिद्राच्या संपर्कात येऊनही आपला निर्ढावलेपणा राखून होता म्हणायचा. की मी चक्क बरा झालो होतो? मला कळेना.
मग मी दुसरं पान उघडलं, तर एकदम तीच नेहमीची संवेदना निर्माण झाली. मी एका भल्यामोठ्या स्टेडियमसमोर उभा होतो. एकदम डोळ्यांचं पारणं फिटावं असं स्टेडियम होतं. थोडं बारकाईनं पाहिलं, तर तिथे लागलेलं मोठं होर्डिंग दिसलं, ‘दिल्ली, २०१०’. मायला, म्हणजे मी चक्क राष्ट्रकुल स्पर्धेच्या स्टेडियमच्या बाहेर उभा होतो. जवळपास पूर्ण बांधून होत आलेलं स्टेडियम. मी रखवालदाराचा डोळा चुकवून, पत्रकारांच्या गर्दीत लपून आत शिरलो आणि माझे डोळेच दिपून गेले. इतकं सुंदर आणि सुबक बांधकाम होतं. प्रेक्षकांची बसायची सोय, व्हीआयपी स्टँड, प्रेस बॉक्स सगळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं! माझा ऊर राष्ट्राभिमानानं भरून आला. आणि एकदम कुणीतरी माझा ऊर बडवत असल्याची मला जाणीव झाली. खिडकीतल्या कबुतरांच्या धक्क्यानं टेबलावरची दोन पुस्तकं जमिनीवर बसलेल्या माझ्या छाताडावर पडली होती आणि मी राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रेक्षागृहातून माझ्या शयनगृहात परतलो होतो. मी अजून बरा झालो नव्हतो. माझा कालछिद्राशी संपर्क अजूनी अस्तित्वात होता. पण मग हे काय होत होतं? काही बातम्यांना मी काही रिस्पॉन्स देत नव्हतो, पण काही बातम्यांना देत होतो, असं का?
दुसर्या दिवशीच टीव्हीवर राष्ट्रकुल स्पर्धेच्या स्टेडियमचं स्टिंग ऑपरेशन झाल्याची बातमी झळकली. स्टेडियमचं प्रत्यक्षात किती बांधकाम अपूर्ण आणि हलक्या दर्जाचं झालंय हे दाखवणारा एक स्टिंग व्हिडिओ सगळ्या वाहिन्यांवर दाखवला जात होता आणि ती सगळी चित्र आणि मी बघून आलो होतो, ती चित्र किती वेगळी होती हे मला जाणवलं. मला काही सुधरतच नव्हतं. हा सलग दुसरा धक्का होता. मी बघितलेलं खोटं कसं काय ठरलं होतं? आणि जर ते खोटंच होतं तर मी तिथे कसा पोचलो होतो? मी ते सगळं खरं असल्यागत कसं काय पाहिलं होतं? आणि त्या काहीच न जाणवलेल्या बातम्या? प्रश्न वाढत चालले होते, पण उत्तरं सापडत नव्हती.
आता मी सोफिस्टिकेटेड पद्धतीनं माझे कालछिद्राचे प्रयोग करायचं ठरवलं होतं. मी एक गजराचं घड्याळ घेऊन बसणार होतो. कदाचित, अक्षय कुमारचा ८X१० तस्वीर बघितल्याचा परिणाम असावा. १० मिनिटांचा गजर लावला आणि वाचनालयातून लपवून आणलेला पेपर समोर ठेवला. पहिली बातमी बारावीच्या निकालाची होती आणि मी कुठेही गेलो नाही. जसाच्या तसा. मग मी विचार केला की आपण वर्ल्ड कप फुटबॉल बघून येऊ. तर तिथेही तीच गत. काहीतरी गडबड झाली होती खास. कदाचित माझी शक्ति हळूहळू क्षीण होत होती. माझा कालछिद्राबरोबरचा संपर्क कमी होत होता कदाचित. मग मी सहजच एक रँडम पान काढलं आणि वाचायला लागलो.
मी एका मोठ्या आलिशान बोटीच्या डेकवर उभा होतो. बोट जुन्या जमान्यातली दिसत होती. समुद्र शांत दिसत होता. सूर्य मावळतीकडे झुकत होता. बोटीच्या एका मजल्यावरून मस्तपैकी पार्टी चालू असल्याचा आवाज येत होता. मी डेकवर असाच भटकत होतो, तर मला समोरच एका टोकाला, चक्क लिओनार्दो दीकाप्रिओ आणि केट विन्स्लेट त्यांची फेमस पोज घेऊन उभे असलेले दिसले. मी डोळे पुनःपुन्हा चोळले. हे खरंच असं घडत होतं? मी नक्की वाचत तरी काय होतो? ओ माय गॉड, टायटॅनिक सिनेमाची कथा तर नाही? मेलो. जहाजाची कशालातरी धडक बसली. गेम! संपला आमचा अवतार अशी माझी खात्री झाली आणि तेव्हढ्यात मी लावलेला गजर वाजला. मला त्यानंतर दोन दिवस खार्या वार्यांचा वास येत होता. कदाचित मतलई वार्यांचाही असेल, पण ते मला कळत नाहीत. चालायचंच!
पण ह्या सगळ्या अनुभवांमुळे माझी शारीरिक आणि मानसिक दोन्ही अवस्था वाईट होत चालली होती. माझं डोकं आता एका ट्रॅकवर धावायला लागलं होतं. मग मी तब्येतीकडे लक्ष न देता प्रयोगांचा धडाका लावला. अतिरेकी आणि नक्षलवादी हल्ल्यांच्या बातम्या काहीही न होता वाचून काढल्या, विदर्भातल्या सावकारांच्या कर्जामुळे आत्महत्या करणार्या शेतकर्याला जरी भेटता नाही आलं, तरी दारू पिऊन आत्मह्त्या करणार्या शेतकर्यांना भेटून आलो. देशांतली भुकेनं मरणारी जनता बघायला मिळाली नाही तरी एक्स्पोर्टर्सच्या रिकाम्या धान्यकोठारांना भेट देऊन आलो. कर्जबाजारी, देशोधडीला लागलेले गिरणीकामगार बघता आले नाहीत, पण मिलला आग लागण्यास कारणीभूत असलेलं शॉर्टसर्किट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. १२५करोडचं रिलीफ पॅकेज मिळालेलं उद्ध्वस्त लेह बघायला मिळालं नाही, पण १००० करोड खर्चून बदललेलं दिल्लीचं रूपडं पाहिलं, इराक युद्ध पाहायला मिळालं नाही पण इराकमध्ये सापडलेली धोकादायल अण्वस्त्र बघितली, जागतिक मंदीमुळे बेरोजगार झालेली माणसं भेटली नाहीत पण पगारकपात झालेले फायनान्स जायंट्सचे अर्थसल्लागार सीईओ मात्र दिसले, ३००% वेतनवाढ घेणार्या लोकसभेत जाता आलं नाही, पण लोकसभेवरील हल्ल्यात शहीदांना न्याय मिळताना पाहिला. अहो काय काय पाहिलं नाही, त्याची यादी कशाला करू, काय काय पाहिलं ते सांगतो. हाऊसफुल्ल चाललेला ‘रावण’ चा शो पाहिला, खच्चून गर्दी झालेली अशोकराव चव्हाणांची सभा पाहिली, समाजसेवा करताना संजय दत्त पाहिला, सलमान आणि कतरिनाचा विवाहसोहळा पाहिला, सामाजिक जबाबदार्या पार पाडणारे अंबानी बंधू पाहिले, शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेले पाहिले.
अधे मधे मी पुरवणी वाचायचो. त्यातले लोकांचे अनुभव वाचताना कधीकधी कुणाचा दुखण्याशी लढा, कुणाची मूकबधिर मुलाच्या लढ्याची कहाणी वाचताना, त्यांना भेटावंसं खूप वाटायचं. पण कधी भेटता आलं नाही. पण एकदा ताम्हिणी घाटात चुकीच्या बाजूला लावलेल्या गाडीतून दरीचं जवळून दर्शन झालं, एकदा त्याच घाटात चढावर गाडी असताना ब्रेकखाली टेनिसचा बॉल आल्यानं ब्रेकफेल झाल्यागत स्थिती उद्भवली, हरवलेले मोबाईल, चोरीला गेलेली कागदपत्रं असं बरंच कायकाय परत मिळताना बघितलं. अहो एव्हढंच काय, मी तर चक्क एकदा सायना नेहवालला भेटलो आणि ती माझ्याबरोबर बॅडमिंटन नाही तर टेनिस खेळली. आता हे सांगितल्यावर लोक मला वेड्यात काढतील, पण काढोत. मी खरंच तिच्याबरोबर खूप वेळ खेळलो आणि दमून गेलो. गजर मी चुकीचा लावल्याने तो उशिराने वाजला. मी भानावर येईस्तो पार घामाघूम झालो होतो. हा एक नवाच पायंडा पाडत होतो मी. आजपर्यंत लाडूकावळ्याच्या प्रसंगानंतर मी तिकडे गेल्यावर घटनाक्रम बदलायच्या फंदात पडलो नव्हतो. पण हल्ली हल्ली मी हा प्रकारही सुरू केला होता. कारण, हे प्रकरण समांतर विश्वाचं असल्याचा माझा ठाम ग्रह झाला होता, त्यामुळे मी निर्धास्तपणे माझं दुहेरी आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगत होतो.
त्यानंतर एके दिवशी बर्याच दिवसांनी बाबांनी आमची चारचाकी मला चालवायला दिली. मी ती घेऊन निघालो होतो. रस्त्याला फारशी गर्दी नव्हती. अचानक लूज झालेलं ग्लोव्ह कंपार्टमेंट उघडलं आणि त्यातनं काहीतरी खाली पडलं. मी गाडी चालवता चालवताच नजर खाली वळवली. तर तो माझा तोच विद्युतंजय पेपर होता. माझा विश्वासच बसेना. आणि नकळतच मी त्यातल्या मजकुरावर नजर फिरवली.
मी एका इस्पितळसदृश ठिकाणी होतो. माझ्या समोरच एक परदेशी गोरी छोटी मुलगी युनिफॉर्मसदृश कपडे घालून गाणी ऐकत बसली होती. पोरगी मोठी गोड होती. मी हळूवार चालत तिच्याजवळ गेलो, तर तिनं तिचे हेडफोन्स काढून मला दिले. मी ते कानात घातले आणि घात झाला. त्यामध्ये एव्हढ्या मोठ्याने गाणी वाजत होती की काही विचारू नका. ती गाणी ऐकण्याची पाच मिनिटं माझं आयुष्य बदलून टाकायला पुरेशी होती.
मी पेपरातल्या बातमीतून अमेरिकेतल्या एका वेड्यांच्या इस्पितळात आलो होतो. आणि इथे ती गाणी ऐकतानाच कदाचित तिथे काहीतरी अपघात झाला असावा. घटनाक्रम बदलण्याची माझी खोड मला महागात पडली असावी. मी एकतर तिथे मेलोय किंवा कोमात गेलोय. कारण मला गेल्या पाच वर्षांत कुणी उठवलंच नाहीये. मी इथेच आहे, ह्या अमेरिकेतल्या वेड्यांच्या इस्पितळात. अडकून पडलोय. कालछिद्रच बंद झालंय. एकाच आशेवर जगतोय, की तो मृत्यू नसावा, कोमाच असावा. आणि एक दिवस मी कोमातून बाहेर येईन आणि खरंच सांगतो, पुन्हा कधीही पेपराला हात लावणार नाही!
-समाप्त-
1 comments:
Mind blowing. Thanks for making us realize that, we are in coma.
Post a Comment