Demo Site

Friday, January 6, 2012

मि. ईस्टवूडचे साहस

 ईस्टवूडने मान वळवून आढ्याकडे पाहिलं. परत खाली जमिनीकडे, तिथून उजव्या भिंतीकडे. शेवटी काही निश्चयानंच त्याने पुढ्यात ठेवलेल्या आपल्या टा‌ईपरायटरकडे लक्ष केंद्रित केलं. मात्र ठळक टायपात छापलेलं शीर्षक सोडलं तर तो कागद पूर्ण कोरा होता.

’दुसर्‍या काकडीचे रहस्य’ असं ते नाव होतं. एक लक्षवेधक शीर्षक! 'असल्या नावाच्या गोष्टीत आहे तरी काय? एक काकडी! आणि ती सुद्धा दुसरी? वाचून तरी बघूयात.' असा विचार वाचकाने नक्कीच केला असता, अँथनी ईस्टवूडला वाटलं. या रहस्यकथांच्या बादशहाने एका साध्या काकडी भोवती किती थरारक कथानक गुंफले आहे! वाचक नक्कीच खिळून गेला असता.
इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. कथा कशी असावी हे चार लोकांप्रमाणेच अँथनी ईस्टवूडला चांगलं माहीत असलं तरी गाडं पुढे सरकत नव्हतं. शीर्षक आणि कथानक हे कथेचे मुख्य घटक. ते जमलं तर बाकीचं जमायला काय वेळ लागणार? आणि कधीकधी तर शीर्षक सुचलं की कथा आपो‌आप सुचत जाते. मात्र यावेळी शीर्षक साधलं तरी कथानकाचा मागमूस नव्हता.
अँथनी ईस्टवूडची नजर पुन्हा एकदा, काहीतरी सुचावं, कथानकाला आकार यावा म्हणून छत, भिंतीवरचा वॉलपेपर वगैरेंवरून रेंगाळत राहिली. मात्र विशेष काही जमत नव्हतं. "नायिकेचं नाव असावं सोनिया" काहीतरी सुरुवात करण्यासाठी अँथनी स्वत:शीच म्हणाला. सोनिया किंवा मग डोलोरस. तिचा वर्ण असेल मोतिया रंगाचा! मात्र आजारपणामुळे पांढराफटक दिसतो तसा नाही. तिचे डोळे! थांग न लागणार्‍या एखाद्या गूढ जलाशयासारखे. नायकाचं नाव असेल जॉर्ज! किंवा मग जॉन. काहीतरी छोटंसं आणि ब्रिटीश. मग माळ्याचं नाव? अर्थात कथेत माळी तर असायलाच हवा होता. काहीही करून ती काकडी कथेत घुसडण्यासाठी तो बराच उपयोगी पडला असता. त्याला आपण स्कॉटिश बनवूया. एकदम निराश आणि चिडचिड करणारा.
अँथनीची ही पद्धत कधीकधी काम करत असली तरी आज मात्र त्यातून काही निष्पन्न होण्याचे चिन्ह दिसेना. कारण त्याने स्वत: कितीही जॉर्ज, सोनिया आणि त्या माळ्याला नजरेसमोर आणले तरी आपण जरा अंग मोडून हालचाल करावी, इकडेतिकडे फिरावं अशी त्या कुणाचीच इच्छा दिसत नव्हती. "एखादं केळं पण चालून जा‌ईल म्हणा!" अँथनीने मनाशीच विचार केला. किंवा मग सॅलड, एखाददुसरी स्थानिक भाजी वगैरे. स्थानिक म्हणताच एखादा अमीर उमराव, हरवलेले महत्त्वाचे दस्त‌ऐवज वगैरे गोष्टी झरझर त्याच्या नजरेसमोर तरळल्या. पण क्षणभरच! प्रकाशाचा एखादा किरण चमकून गेल्यासारखं त्याला झालं, मात्र मागे काहीच उरलं नाही. अमीर उमरावदेखील आकार घे‌ईना आणि आता तर काकडी, चिडखोर माळी वगैरे सर्वच गोष्टी त्याला विजोड वाटू लागल्या.

"मरू दे! काहीच करायला नको!" वैतागून अँथनी उठला आणि त्यानं डेली मेलचा अंक हातात घेतला. कोण जाणे एखाद्याचा खून झाला असेल तर त्यातून एका होतकरू लेखकाला एखादी कल्पना सुचून जा‌ईल! तशी शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र आजच्या बातम्या एकतर राजकीय नाहीतर विदेशी होत्या. तिरमिरीत त्याने पेपर फेकून दिला. सहजच टेबलापाशी ये‌ऊन त्याने एक कादंबरी उचलली. डोळे मिटले नि अंदाजानेच एक पान उघडून त्यावर बोट ठेवले. अशा तर्‍हेने नशिबाने सुचवलेला शब्द होता - शेळी. अहा! हा एकच क्लू त्याला पुरेसा होता. क्षणार्धात एक कथा त्याच्या डोळ्यांसमोर उलगडत गेली. एक सुंदर मुलगी, तिचा प्रियकर. युद्धात मारला गेलेला! आता ती स्कॉटिश पर्वतरांगांवर शेळ्या-मेंढ्या राखते आहे बिचारी! तिच्या मृत प्रियकराचे तिला होणारे भास. त्यांच्या गूढ भेटी! आसपासच्या त्या शेळ्या मेंढ्या, चंद्राचा प्रकाश. अगदी चित्रपटातल्यासारखं! आणि मग शेवटी गोठवणार्‍या बर्फात मरून पडलेली ती आणि जवळच दिसणार्‍या पायांच्या ठश्यांच्या दोन रांगा!
"खूपच छान कथा आहे ही! "अँथनी एकदम भानावर आला. मात्र संपादकाचा चेहरा डोळ्यांसमोर येताच त्याने निराशेने मान हलवली. कितीही सुंदर असली तरी ही कथा त्याने नक्कीच छापली नसती. त्याला हव्या असत गूढ स्त्रिया, त्यांचा झालेला खून, एखाद्या तरूण नायकावर येणारा आळ, अगदीच क्षुल्लक असलेले पुरावे आणि मग कल्पनाही करता येणार नाही अशा भलत्याच माणसावर गुन्हा शाबित हो‌ऊन उलगडणारे रहस्य. (अर्थात अशा कथांना तो पुष्कळ मानधनही देत असे म्हणा!) एकंदरीत त्याला हवी होती ती ’दुसर्‍या काकडीचे रहस्य’ सारखी कथा. आता अशी कथा दिली तर तिचं शीर्षक त्याला पटलं नसतं. 'एक निर्घृण खून’ वगैरे फडतूस नावं त्याला सुचत आणि अँथनीला विचारल्याशिवाय तो ती बदलून टाकत असे. अँथनीचा विचार चालू असतानाच फोनची घंटा वाजायला लागली.
फोनजवळ जा‌ऊन त्याने रागानेच फोन उचलला. कारण मागच्या एका तासात त्याला दोनदा विनाकारण उठावं लागलं होतं. एक होता राँग नंबर आणि दुसरा एका ओळखीच्या चळवळ्या बा‌ईचा. जेवायला बोलावण्यासाठी. त्याला मात्र ती बिलकूल आवडत नसे आणि तिला नकार द्यायला त्याला बरीच शक्ती खर्च करावी लागली होती.
"हॅलो!" त्याने त्रासून विचारले.
एका स्त्रीचा हळूवार, परदेशी वाटणारा आवाज पलीकडून ऐकू आला.
"माझ्या प्रियकरा, तूच आहेस काय? "
"अं? काय? माहित नाही. पण तुम्ही कोण बोलताय?"
"अरे मी, कार्मन! हे बघ नीट ऐक. माझा पाठलाग होतोय. मी धोक्यात आहे, तुला ताबडतोब यावं लागेल. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे!"
"ऑं? एक मिनिट. मला माफ करा पण..... अँथनीने शांतपणे सांगितलं. "मला वाटतं तुम्ही राँग नंबर.. "
पण त्याचं बोलणं त्याला पूर्ण करताच आलं नाही.
"ते येत आहेत आहे रे! आणि त्यांना जर कळलं मी काय करतेय तर ते मला नक्की मारून टाकतील. प्लीज लवकर ये! मला निराश करू नकोस. आला नाहीस तर मी मेलेच म्हणून समज. ३२० कर्क स्ट्रीट तुला माहीत आहेच.. हा संकेत लक्षात ठेव, काकडी."
आणि लगेचच पलीकडून फोन ठेवल्याचा एक क्षीण आवाज.
"छे! आता काय करायचं?" झाल्या प्रकाराने अँथनी पूर्ण चकित झाला होता. त्याने आपला पा‌ईप उचलला आणि त्यात काळजीपूर्वक तंबाखू भरायला सुरुवात केली. "नक्कीच माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. ती नक्कीच काकडी म्हणाली नसेल. हे सगळं विलक्षणच आहे. काय म्हणत होती ती? काकडी का दुसरं काही?"
विचार करत तो खोलीत येरझार्‍या घालू लागला.
'३२० कर्क स्ट्रीट.’ हा सगळा काय प्रकार आहे? ती कोणा दुसर्‍या माणसाची वाट बघत असेल. मी आधीच सगळं स्पष्ट सांगायला हवं होतं. ३२० कर्क स्ट्रीट, आणि शब्द आहे काकडी... छे! हे सगळं अशक्य आहे. माझ्या शिणलेल्या मेंदूला नक्कीच भ्रम होत असावा.
परत टा‌ईपरायटरवर नजर पडताच त्याला खूप राग आला. एकतर सकाळपासून तो कथेसाठी डोकं शिणवत बसला होता आणि एवढं करूनही हाती काही लागलं नव्हतं. जगण्यातूनच सुचणारं कथानक वगैरे बर्‍याच गोष्टी त्याने आजपर्यंत ऐकल्या होत्या आणि आता तशीच एक संधी त्याच्याकडे चालून आलेली होती. त्याने क्षणभर विचार केला नि लगेच निघण्याचा निर्णय घेतला. आपल्या जुन्या नि अमूल्य, दुर्मिळ भांड्यांच्या संग्रहाकडे त्याने प्रेमभराने पाहून घेतलं, डोक्यावर हॅट चढवली आणि फ्लॅटचं दार बंद करून तो बाहेर पडला.
बहुतांश लंडनकरांना माहीत असेलच की कर्क स्ट्रीट हा एक लांबुळका, अस्ताव्यस्त पसरलेला, दुर्मिळ वस्तूंच्या दुकानांनी व्यापलेला रस्ता आहे, जिथे बर्‍याचदा बनावट वस्तूदेखील महागड्या किंमतीला खरेदी केल्या जातात. पितळेच्या जुन्या वस्तू, काचसामान आणि बर्‍याचशा जुन्या वस्तूंची बाजारपेठ या रस्त्यावर आहे. नं. ३२० हे दुकान जुन्या काचवस्तूंचं होतं. ओसंडून वाहणारं विविध प्रकारचं काचसामान इकडेतिकडे पसरलेलं होतं. त्यामुळेच मद्याचे चषक, झुंबरं यासारख्या सामानातून अँथनीला काळजीपूर्वक पावलं टाकावी लागत होती. या सगळ्या सामानाच्या पाठी मागे एक अतिशय वृद्ध स्त्री बसलेली होती. एखाद्या नवयुवकाला हेवा वाटेल अशी मिश्यांसारखी लव तिच्या ओठांवर होती आणि चेहर्‍यावरचे खा‌ऊ का गिळू भाव स्पष्ट दिसत होते.
"काय पाहिजे?" तिने दरडावल्यासारखं अँथनीला विचारलं.
साध्यासुध्या तरूण अँथनीचं त्या आवाजानंच अवसान गळाल्यासारखं झालं. त्याने ताबडतोब काही ग्लासांची चौकशी केली.
"अर्धा डझन ग्लासांना ४५ शिलिंग पडतील."
"काय सांगता? खरंच? खूप सुंदर आहेत ते, नाही का? आणि त्या तिकडे, त्यांची काय किंमत आहे?"
"ते? जुन्या वॉटरफर्डचे आहेत ते. तुला म्हणून १८ गिनिजला एक जोडी दे‌ईन."

आता ईस्टवूडला आपण स्वत:साठी खोदत असलेल्या खड्ड्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. असंच चालू राहिलं तर पुढच्या मिनिटातच त्याला काही ना काही घ्यावं लागलं असतं. म्हातारीचे डोळे तर इतके भयकारी होते की काहीच न घेता दुकान सोडणं ही त्याच्यासाठी अशक्य कोटीतली बाब होती.
"त्या, त्याचा काय भाव आहे?" एका झुंबराकडे बोट दाखवून त्याने विचारलं.
"३५ गिनीज."
"३५ गिनीज खूपच होतात. मला नाही परवडायचं ते." अँथनी निराश हो‌ऊन म्हणाला.
"पण तुला नक्की काय पाहिजे? लग्नासाठी काही प्रेझेंट वगैरे पाहिजे का?"
"अं? हो, तेच ते! " चालून आलेलं हे उत्तर गोंधळलेल्या अँथनीसाठी पुरेसं होतं.
"पण ते आवडीचं मिळेलच असं नाही."
"हा, मग तसं सांगा ना! " म्हातारी आता चिकाटीने जागेवरून उठली.
"हे बघ! हे नक्षीदार ग्लास! कुणालाही आवडतील. आणि हे बघ, हे काचेचे मग आहेत. किंवा मग हा लिकर सेट. खास एकदम नवर्‍यामुलीसाठीच. "
अशी पुढची जवळजवळ दहा मिनिटं अँथनीने जन्मभराच्या वेदना सहन केल्या. म्हातारीने त्याला पूर्ण कह्यात घेतले होते. जे जे काही म्हणून काचेत शक्य आहे ते सगळं अँथनी निमूटपणे पाहत होता. निरर्थक बडबडल्यासारखा ’सुंदर, सुंदर’ हा त्याचा एकच जप चालू होता. शेवटी वैतागून हातात कोंबलेला एक उंची चषक त्याने खाली ठेवला आणि म्हातारीला विचारलं, "तुमच्याकडे इथे फोन आहे का?"
"नाही. इथे नाहीये पण तिकडे थोडं पुढं पोस्टात फोन आहे. पण मग तुमचं काय ठरलं? हे काचेचे पेले घेणार की तो उंच चषक दे‌ऊ?"
तो स्त्री नसल्या कारणाने काहीच न घेता दुकानाबाहेर पडण्याच्या सूक्ष्म कलेशी अँथनी पूर्णपणे अनभिज्ञ होता.
"मी, अं, मला तो लिकर सेटच द्या." तो उदासवाण्या स्वरात उत्तरला.
त्यातल्या त्यात तोच सगळ्यात लहान दिसत होता. मात्र म्हातारी अजूनही एखादं झुंबर आपल्या गळ्यात मारेल अशी धास्ती त्याला वाटत होती. तोंड वाकडं करतच त्याने लिकर सेटचे पैसे दिले नि म्हातारीने पॅकिंग करायला सुरुवात केली. पण अचानकच त्याचा आत्मविश्वास परत उसळून आला. नाहीतरी तिला जास्तीत जास्त काय वाटेल? विचित्र, विक्षिप्त वगैरे वगैरे! अजून काय? आणि तिला वाटलंच तरी एका म्हातारीची कोण पर्वा करतो?
"काकडी." तो स्पष्ट आणि निर्धाराने म्हटला.
पॅकिंग करता करताच म्हातारीची मान झटक्यात वर झाली.
"काय? काय म्हणालास तू?"
"काय, कुठे काय?" अँथनी.
"नाही, नाही! तू नक्कीच काकडी म्हणालास."
"बरं म्हणालो! मग?"
"शहाण्या, तुला हे आधीच म्हणायला काय झालं होतं? फुकट माझा वेळ वाया घालवलास. त्या तिकडे दार आहे, जिन्याने वर जा. ती तुझी वाट बघत आहे."
स्वप्नात असल्याप्रमाणे अँथनी तिने सांगितलेल्या दाराने निघाला. अतिशय गलिच्छ जिन्याने वर गेल्यावर एक दार आणि त्यामागे एक छोटी बैठकीची खोली दिसत होती. खोलीत खुर्चीवर बसलेली नि अधीरतेने दरवाजाकडे पाहणारी एक अतिशय सुंदर तरूणी त्याची वाट बघत होती. अँथनीने आजवर लिहिल्याप्रमाणेच तिचा मोतिया वर्ण होता. आणि तिचे डोळे! ती इंग्लिश नव्हती हे अँथनीला पाहताक्षणी जाणवलं. तिचं भुरळ पाडणारं सौंदर्य साध्याश्या कपड्यांतही उठून दिसत होतं.
लाजून अँथनी दारातच उभा राहिला. या सगळ्या झालेल्या गोंधळाचं स्पष्टीकरण देण्याची वेळ आता आली होती. मात्र त्याला पाहताच आनंदातिरेकाने ती धावत आली आणि त्याच्या बाहुपाशात शिरली.
"तू आलास! खरंच तू आलास? देवाने माझी प्रार्थना ऐकली म्हणायची. "
आलेली संधी साधून, तिच्या पावलावर पाय ठेवत अँथनीने देखील तिला प्रेमाने आलिंगन दिलं. आता मात्र ती लाजली.
त्याच्या चेहर्‍याकडे पाहत म्हणाली, "मी तुला ओळखलंच नसतं रे!"
"का?"
"तू पूर्वीपेक्षा कितीतरी तरूण दिसतो आहेस. आणि तुझे डोळे! एकदमच वेगळे दिसत आहेत!"
"खरंच?"
मनात मात्र अँथनी शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. भयानक वेगाने आकार घेणारे हे कथानक हातचे घालवून चालणार नव्हते. काहीही करून डोकं शांत ठेवण्याची गरज होती.
"मी... मी तुझं पुन्हा एक चुंबन घे‌ऊ का?"
"नक्कीच घे‌ऊ शकतेस! तुला पाहिजे तितक्या वेळा!" अँथनी मनापासून म्हणाला.
हा एकंदरीतच प्रकार त्याला खूप सुखावह वाटत होता. ’कोण जाणे मी कोण आहे ते! आणि ही मुलगी पण काय सुंदर दिसते! देवाची कृपा होवो नि तो खरा माणूस इकडे ये‌ऊ नये म्हणजे झालं.’
पण एकदमच ती मुलगी त्याच्या पासून बाजूला झाली. तिचे डोळे शंकास्पद दिसत होते.
"इकडे येताना तुझा कुणी पाठलाग तर नाही ना केला?"
"छे, छे! शक्यच नाही."
"बरं झालं. पण ते खूप धूर्त आहेत रे! मी त्यांना चांगलीच ओळखून आहे. तो बोरीस तर राक्षस आहे नुसता."
"त्या बोरीसचं काय करायचं ते मी बघतो आता."
"खरंच? तू एका सिंहासारखा शूर आहेस रे! एक सिंह! खरंच! बाकी ती सगळी जनावरं आहेत. माझा ठावठिकाणा त्यांना लागला असता तर त्यांनी मला मारूनच टाकलं असतं बघ. मला काहीच कळेना. पण मग एकदम तुझी आठवण झाली..... शऽऽऽऽ! हा आवाज कसला?"
खाली दुकानातूनच तो आवाज येत होता. त्याला तिथेच थांबायला सांगून ती हळूच चोरपावलांनी जिन्याकडे निघाली. मात्र धावतच ती परत आली. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.
"खाली पोलिस आले आहेत. बहुधा इकडेच यायला निघालेत. लवकर, एखादा सुरा किंवा पिस्तूल, काही आहे का तुझ्याकडे?"
"जरा थांब तरी! एखाद्या पोलिसाचा मी खून करावा अशी तुझी इच्छा आहे काय?"
"अरे असं काय करतोस? तुला काय वेड लागलंय काय? ते नक्कीच तुला पकडतील आणि मग कदाचित तुला फाशीसुद्धा देतील. मरेपर्यंत!"
"काय? काय करतील?" भीतीची एक थंडगार लाट आपल्या अंगातून गेल्यासारखं त्याला झालं.
तोपर्यंत जिन्यात पावलं वाजायला सुरुवात झाली होती.
"बघ, ते आलेच! मी काय सांगते ते ऐक. सगळ्याला नाही म्हण. तेवढा एकच मार्ग उरलाय आता." कानापाशी ती कुजबुजली.
"हे तर खूपच सोप्पं आहे!" अँथनी.
दुसर्‍याच क्षणी दोघांनी खोलीत प्रवेश केला. त्यांनी साधेच कपडे घातले होते, मात्र त्यांच्या एकंदर हालचाली त्यांची ओळख पटवण्यासाठी पुरेशा होत्या. त्यांच्यातल्या बुटक्या, करड्या रंगाचे डोळे असलेल्या माणसाने बोलायला सुरुवात केली.
"मी तुम्हाला अटक करत आहे, कॉनरॅड फ्लेकमन. ऍना रोझेंबर्गचा खून केल्याच्या आरोपावरून! तुम्ही जे काही म्हणाल ते कोर्टात तुमच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यात ये‌ईल. हे माझं वॉरंट आणि शांतपणे तुम्ही आमच्या बरोबर आलात तर बरं हो‌ईल."
एक अस्फुट किंकाळी मुलीच्या ओठातून निघाली. अँथनी मात्र शांतपणे पुढे झाला.
"तुमची काही तरी चूक होते आहे ऑफिसर. माझं नाव अँथनी ईस्टवूड आहे."
मात्र त्या दोघांच्याही चेहर्‍यावर त्या वाक्याने काहीही फरक पडला नाही.
"ते काय ते आपण नंतर बघू." दुसर्‍याने तोंड उघडलं. "आत्ता तुम्ही आमच्याबरोबर चला."
"कॉनरॅड" मुलगी ओरडली. "त्यांना असं काही करू दे‌ऊ नकोस."
अँथनीने त्या दोघांकडे वळून पाहिले.
"एक मिनिट! या मुलीचा निरोप घ्यायला तरी तुम्ही मला नक्कीच परवानगी द्याल. नाही का?"
अपेक्षेपेक्षा जास्तच सभ्यतेने ते दोघेजण दारात जा‌ऊन उभे राहिले. अँथनीने मुलीला खिडकीजवळच्या कोपर्‍यात ओढलं नि भराभर झाला प्रकार सांगायला सुरुवात केली.
"हे बघ, मी जे काही सांगितलं ते खरं होतं. मी खरंच कॉनरॅड फ्लेकमन नाही. आज सकाळी तू फोन केलास तो बहुधा राँग नंबर होता. माझं नाव अँथनी ईस्टवूड आहे. तुझ्या हाकेला मी धावून आलो याचं कारण खरंतर....... जा‌ऊ दे! काही नाही. मी आलो एवढंच!"
तिने साशंकतेनं त्याच्या डोळ्यात पाहिले.
"तू कॉनरॅड फ्लेकमन नाहीस?"
"नाही."
"अरे देवा!" तिचा आवाजात निराशा होती. "मी..... मी मघाशी तुझं चुंबन घेतलं रे!"
"त्याचं काही नाही एवढं! अशा गोष्टी होतच असतात." तिला समजावत तो म्हणाला. "पण आता मी काय सांगतो ते नीट ऐक. मी या दोघांबरोबर जात आहे आणि लवकरच माझी ओळख त्यांना पटवून दे‌ईन. तुला काही काळजी करायचं कारण नाही. तेवढ्या वेळात तू तुझ्या या खर्‍या कॉनरॅडला सावध कर. नंतर.. "
"नंतर काय?"

"वेल.... काही नाही. एवढंच! हा माझा फोन फोन नंबर, नॉर्थ वेस्टर्न १७४३. आणि परत राँग नंबर लागणार नाही याची काळजी घे!"
तिने अगदी प्रेमानं त्याच्याकडे पाहिलं. एकाचवेळी तिच्या डोळ्यात पाणी तर ओठांवर हसू दिसत होतं.
"मी तुला कधीच विसरणार नाही... खरंच रे! कधीच विसरणार नाही."
"असू दे. चल, मी येतो आता. मला वाटतं..... "
"काय?"
"अजून एकाने काहीच फरक पडणार नाही, नाही का? "
ती पुन्हा एकदा त्याच्या मिठीत शिरली. क्षणभरच तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकले.
"मला तू खूप आवडतोस रे! आणि काहीही झालं तरी तू सुद्धा मला कधीच विसरणार नाहीस, हो ना?"
अँथनीने निग्रहाने तिला बाजूला केलं नि तो पोलिसांबरोबर जायला निघाला.
"मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. आणि मला वाटतं या तरूण स्त्रीला तर तुम्हाला अटक करायची नाहीये, हो ना?"
"नाही सर. त्याची काही आवश्यकता नाही."
"या सौजन्याबद्दल तरी स्कॉटलंड यार्डचं कौतुक केलं पाहिजे!" असं मनात म्हणतच अँथनीने जिना उतरायला सुरुवात केली.
खाली काचेच्या दुकानात मात्र, मघाची ती म्हातारी बिलकूल दिसत नव्हती. क्षणभरच अँथनीला मागच्या दरवाजामागे काही हालचाल जाणवली. कदाचित दारामागे उभं राहूनच ती काय घडतंय ते पाहत असावी.
पुन्हा एकदा कर्क स्ट्रीटच्या अस्ताव्यस्त पसार्‍यात आल्यावर अँथनीने एक दीर्घ श्वास घेतला नि दोघांमधल्या बुटक्या ऑफिसरशी बोलायला सुरुवात केली.
"आता काय इन्स्पेक्टर....? मला वाटतं इन्स्पेक्टर हाच तुमचा हुद्दा आहे, हो ना?"
"होय सर. हेर-इन्स्पेक्टर वेरॉल. आणि हा, हेर-सार्जंट कार्टर."
"हे बघा इन्स्पेक्टर वेरॉल. मला वाटतं आता खरं काय ते सांगायची वेळ आली आहे. आणि त्याप्रमाणे वागायची देखील! मी काही हा कॉनरॅड.. काय बरं त्याचं नाव? ... नाही. तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे माझं नाव अँथनी ईस्टवूड आहे आणि पेशाने मी एक लेखक आहे. आणि आता जर माझ्याबरोबर माझ्या फ्लॅटवर येण्याची कृपा तुम्ही केलीत तर तुमचं समाधान होण्या‌इतपत माझी ओळख मी पटवून दे‌ऊ शकेन."
दुसरं काही नाही तरी ज्या तर्‍हेने अँथनीने वस्तुस्थिती सांगितली त्यावरून त्या दोघांनाही त्याचं म्हणणं जरा पटल्यासारखं दिसलं. इन्स्पेक्टर वेरॉललाही थोडी शंका वाटू लागली होती मात्र सार्जंट कार्टर काही हार मानण्यास तयार नव्हता.
"खरं काय ते कळेलच पण ती स्त्री देखील तुम्हाला कॉनरॅड म्हणूनच हाक मारीत होती हे तुमच्या लक्षात असेलच!" कार्टर हेटाळणीच्या सुरात म्हणाला.
"अच्छा, ते होय? मी हे नक्कीच मान्य करेन की मी तिच्या घरी कॉनरॅड नावाची व्यक्ती म्हणूनच गेलो होतो, मात्र ती माझी एक खाजगी बाब आहे."
"एक बनाव! नाही का?" कार्टर म्हणाला. "मात्र काही झालं तरी तुम्हाला आमच्या बरोबर यावंच लागेल. ती टॅक्सी थांबव जो!"
लवकरच एक टॅक्सी थांबवण्यात आली आणि तिघेही आत शिरले. अँथनीने एक शेवटचा प्रयत्न केला आणि त्यातल्या त्यात समजूतदार अशा इन्स्पेक्टर वेरॉलशी बोलायला सुरुवात केली.
"हे बघा इन्स्पेक्टर, माझ्या फ्लॅटवर तुम्ही आलात आणि मी खरं सांगतो आहे की नाही याची खात्री केलीत तर तुम्हाला असा काय तोटा होणार आहे? वाटलं तर आपण टॅक्सी थांबवून ठेवू. पाच मिनिटंसुद्धा लागणार नाहीत."
वेरॉलने त्याच्याकडे शोधक नजरेनं पाहिलं.
"ठीक आहे तर, " तो अचानक म्हणाला. "विचित्र वाटलं तरी मला वाटतं, तू खरं बोलत आहेस. त्याचबरोबर चुकीच्या माणसाला पकडून ने‌ऊन, पोलिस ठाण्यात आम्हाला स्वत:चं हसं करून घ्यायचं नाहीये. तुझा पत्ता काय आहे? "
"४८ ब्रँडनबर्ग मॅन्शन. "
वेरॉलने डोकं पुढे केलं आणि ओरडून टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता सांगितला. त्यांचं ठिकाण ये‌ईपर्यंत ते तसेच शांतपणे बसून होते. ठिकाण येताच कार्टरने गाडीबाहेर उडी घेतली नि वेरॉलने अँथनीला त्याच्या मागून येण्यास खुणावले.
"हे बघ, उगाच देखावा करण्याची काही गरज नाहीये. आपण सहजच आल्यासारखे आत जा‌ऊया. जणू काही अँथनी त्याचे काही मित्र घरी घे‌ऊन आला आहे."
अँथनीला या सूचनेनं खूपच हायसं वाटलं आणि एकंदरीतच गुन्हे अन्वेषण खात्याबद्दलचं त्याचं मत सुधारण्यास बराच हातभार लागला. पुढे वाटेतच त्यांना रॉजर भेटला. इमारतीत राहणार्‍या लोकांची हरप्रकारची कामे करण्यासाठी त्याला नेमण्यात आले होते.
"गुड इव्हिनिंग रॉजर" ऍंथनी उद्गारला.
"गुड इव्हिनिंग मि. ईस्टवूड! " तो आदराने म्हणाला. सर्व भाडेकरूंमधल्या ह्या स्वतंत्र वृत्तीच्या ईस्टवूडशी त्याचे नेहमीच पटत असे.
एक पाय जिन्यात ठे‌ऊन अँथनी क्षणभर उभा राहिला नि सहजपणे म्हणाला,
"बरं रॉजर, मला एक गोष्ट सांग, मी या ठिकाणी किती दिवस राहत आहे? आताच काही वेळापूर्वी माझ्या या दोन मित्रांशी मी या बाबतीत चर्चा करत होतो."
"अं, एक मिनिट सर.... मला वाटतं आता जवळजवळ चार वर्षं होत आली असावीत."
"अगदी मी म्हटल्याप्रमाणे!"
अँथनीने दोघांकडेही एक विजयी दृष्टिक्षेप टाकला. कार्टर कुरकुरला, वेरॉलच्या चेहर्‍यावर मात्र स्मिताची एक रेषा चमकून गेली.
"ठीक आहे सर पण समाधान होण्या‌इतपत ठीक नाही म्हणता येणार. मला वाटतं आपण वर जा‌ऊया."
वर जा‌ऊन अँथनीने आपल्या लॅच कीने फ्लॅट उघडला. त्याचं घरकाम करणारा सीमार्क घरी नव्हता ही त्यातल्या त्यात एक जमेची गोष्ट होती. नाहीतरी कमीत कमी लोकांना या प्रकरणाबद्दल कळेल तेवढं बरं होतं.
टा‌ईपरायटर अजूनही सकाळच्याच जागी पडला होता. कार्टर टेबलापाशी गेला आणि त्या कागदावरचं शीर्षक त्यानं वाचलं. ’दुसर्‍या काकडीचे रहस्य’ हळू आवाजात तो उद्गारला.
"मी एक कथा लिहतोय." अँथनीने थंड आवाजात सांगितलं.
"हा अजून एक चांगला मुद्दा आहे सर," वेरॉल खिजवत म्हणाला. "पण मला एक सांगा, ’दुसर्‍या काकडीचे रहस्य’ हा नक्की काय प्रकार आहे? "
"तोच तर सगळा वैताग आहे ना. या सगळ्या प्रकरणाला ही कथाच कारणीभूत आहे."
कार्टर आता अँथनीकडे बारका‌ईने पाहू लागला. त्याने डोकं हलवलं आणि कपाळावर हात मारून घेतला.
"गरीब बिचारा! त्याच्या डोक्यावर नक्कीच काहीतरी परिणाम झालाय." तो हळूच पुटपुटला.
"सभ्य गृहस्थांनो, आता जरा मुद्द्याकडे वळूया का? ही बघा माझ्या नावाने आलेली पत्रं, माझं बँकबुक आणि संपादकांशी केलेला हा पत्रव्यवहार. तुम्हाला अजून काय पुरावा पाहिजे आहे?"
अँथनीने दिलेली कागदपत्रं वेरॉलने तपासून पाहिली.
"माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझं समाधान झालं आहे. अजून कशाची आवश्यकता नाहीये. पण केवळ माझ्या जबाबदारीवर तुला मोकळं करता येणार नाही. असं दिसतंय खरं की मि. ईस्टवूड या नावाने तू इथे राहत आहेस पण तरीदेखील कॉनरॅड फ्लेकमन आणि अँथनी इस्टवूड ह्या दोन्ही एकच व्यक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही झालं तरी तुझ्या फ्लॅटची तपशीलवार तपासणी, तुझ्या बोटांचे ठसे आणि मुख्यालयाला एक फोन या गोष्टी मला कराव्याच लागणार आहेत."
"हा तुमचा एक बराच वेळखाऊ कार्यक्रम दिसतो आहे." अँथनी म्हणाला. "तरीदेखील माझ्याबद्दल जी काही गौप्य माहिती असेल ती तपासण्यास माझी परवानगी आहे."
इन्स्पेक्टरच्या चेहर्‍यावर आता हास्य पसरलं. हेर असूनही नि:संशय तो एक चांगला माणूस होता.
"मी इकडे माझं काम करेपर्यंत तुम्ही कार्टर बरोबर जरा त्या खोलीत बसाल का सर? "
"ठीक आहे" अँथनी अनिच्छेने म्हणाला. "पण याच्यात थोडा बदल करता येणार नाही का?"
"म्हणजे?"
"आपण जरा छानपैकी व्हिस्की, सोडा वगैरे घे‌ऊन त्या खोलीत बसू, तोवर आपला मित्र कार्टर झडती घ्यायचं काम करेल."
"तुम्ही म्हणाल तसं सर..... "
"मग असंच करुया!"
लवकरच एखाद्या मुरलेल्या अधिकार्‍याप्रमाणे कार्टरने खोलीची तपासणी करायला सुरुवात केली. दोघंजण शेवटच्या खोलीकडे निघताच त्याने फोन उचलला आणि मुख्यालयाचा नंबर फिरवायला सुरुवात केली.
"हा प्रकार एवढाही काही वा‌ईट नाहीये" आरामशीरपणे व्हिस्की, सोडा वगैरे आपल्या बाजूला मांडत, इन्स्पेक्टर वेरॉलची जमेल तेवढी सरबरा‌ई करत अँथनी म्हणाला.
"तुम्हाला हवं असेल तर आधी मी व्हिस्की पितो, जेणेकरून तिच्यात विष टाकलं नसल्याची तुमची खात्री हो‌ईल."
परत एकदा इन्स्पेक्टरच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.
"अहो, हा एकंदर प्रकार विचित्र वाटला तरी काय करणार? आमच्या या व्यवसायात अशा गोष्टी कराव्याच लागतात. खरंतर सुरुवातीपासूनच आपण चूक केली आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. तरी कायदेशीररीत्या सगळं केलेलं बरं! नाही का? काही झालं तरी लालफितीचा सोपस्कार पाळावाच लागतो."
"हो नक्कीच." अँथनी पश्चातापाच्या सुरात म्हणाला. "पण मला एक सांगा, हा तुमचा सार्जंट कार्टर काही फारसा मोकळाढाकळा दिसत नाही, हो ना?"
"नाही सर, सार्जंट कार्टर एक चांगला माणूस आहे, पण त्याला पटवणं ही खरंच एक अवघड बाब आहे."
"ते माझ्या कधीच लक्षात आलंय!" अँथनी.
"बरं ते जा‌ऊ द्या इन्स्पेक्टर," अँथनी पुढे म्हणाला. "पण तुमची काही हरकत नसेल तर मला जरा माझ्याबद्दल सांगा ना?"
"म्हणजे? तुम्ही काय म्हणताय?"
"आता मात्र कमाल झाली राव! अहो मला कधीपासून उत्सुकता लागून राहिली आहे. ही ऍना रोझेंबर्ग कोण होती आणि मी तिचा खून कशासाठी केला आहे?"
"तुम्हाला सर्व काही उद्याच्या वर्तमानपत्रात वाचायला मिळणारच आहे सर."
"पण आता उगाच माझी उत्सुकता कशाला ताणता? जरा वेळ तुमची ही वर्दी, कर्तव्य वगैरे गोष्टी बाजूला ठेवा आणि मला सगळं सांगा तरी!"
"पण असं करणं योग्य ठरेल?"
"अहो आता आपण जवळजवळ मित्र झालोच आहोत, नाही का?"
"वेल, तुम्ही एवढं म्हणता तर.... ऍना रोझेंबर्ग ही एक जर्मन-ज्यू होती. हँपस्टीड ला तिचं घर होतं. मात्र तिच्याजवळ उत्पन्नाचा कोणताही प्रत्यक्ष मार्ग नसूनही दरसाल तिच्याजवळचा पैसा वाढतच गेला."
"माझी अगदी उलट तर्‍हा आहे. उत्पन्नाचा मार्ग असूनही मी मात्र दरवर्षी गरीब होत चाललोय. हँपस्टीडला रहायला असतो तर बरं झालं असतं. मी ऐकलंय की हँपस्टीड अगदी भन्नाट ठिकाण आहे."
"एकेकाळी" वेरॉलने पुढे सांगायला सुरुवात केली. "तिचा सेकंड हँड कपड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय होता."
"आलं लक्षात!" ऍंथनी मध्येच म्हणाला. "मी सुद्धा माझा गणवेश युद्धानंतर विकला होता. पूर्ण नाही पण इतर काही सटरफटर गोष्टी! मला आठवतं, सोनेरी जर, लाल रंगाच्या पँटी वगैरेंनी तो फ्लॅट ओसंडून वाहत होता. एक जाडा माणूस रोल्स रॉ‌ईसमधून त्याच्या नोकराबरोबर बॅग घे‌ऊन आला आणि सगळ्य़ासाठी त्याने मला एक पा‌ऊंड दे‌ऊ केला. अजून एक कोट आणि गॉगल दिल्यावर मग कुठे तो दोन पा‌ऊंड द्यायला तयार झाला. नोकराने सगळे कपडे बॅगेत भरले आणि त्या जाड माणसाने मला दहा पौंडांची नोट दिली आणि माझ्याकडे सुट्टे मागितले."
"जवळजवळ दहा वर्षांपूर्वी," इन्स्पेक्टरने पुढे बोलायला सुरुवात केली, "लंडनमध्ये स्पेनचे बरेच राजकीय आश्रित राहत होते. त्यांच्यामध्ये कुणीतरी डॉन फर्नांडो फेरारेझ आपल्या बायको, मुलासह राहत होता. तो खूपच गरीब होता आणि त्याची पत्नी आजारी पडली होती. एकदिवस ऍना रोझेंबर्गने ते राहत असलेल्या ठिकाणी त्यांना भेट दिली आणि काही विकायचं आहे का म्हणून चौकशी केली. नेमका डॉन फर्नांडो त्यावेळेस घराबाहेर होता आणि त्याच्या पत्नीने एक अतिशय सुंदर अशी स्पॅनिश शाल विकायचं ठरवलं, जी तिच्या नवर्‍याने स्पेन सोडण्य़ापूर्वी तिला भेट दिली होती. जेव्हा डॉन फर्नांडो परतला तेव्हा मात्र शाल विकल्याचं कळताच त्याच्या संतापाला पारावार राहिला नाही. ती परत मिळवण्याचा त्याने बराच प्रयत्न केला, जो निष्फळ ठरला. सरतेशेवटी सेकंड हँड कपड्यांचा व्यवसाय करणारी ती स्त्री त्याला सापडली. मात्र तिने आधीच ती शाल एका बा‌ईला विकली होती आणि तिचं नाव काही तिला आठवत नव्हतं. डॉन फर्नांडो आता पुरता निराश झाला. दोनच महिन्यानंतर भर रस्त्यात चाकूने भोसकून त्याच्यावर वार करण्यात आले आणि त्या जखमांमुळेच त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासूनच ऍना रोझेंबर्गकडे संशयास्पदरीत्या पाण्यासारखा पैसा वहायला सुरुवात झाली. पुढच्या दहा वर्षांत तिच्या घरी जवळजवळ आठ वेळा चोरी झाली. चार प्रयत्न फसले आणि कुणाच्याच हाती काही लागलं नाही. उरलेल्या चारवेळी मात्र एक भरीव, कलाकुसर केलेली एक शाल चोरीच्या मालात समाविष्ट होती."
इन्स्पेक्टर जरा क्षणभर थांबला मात्र अँथनीच्या चेहर्‍यावरची उत्कंठा पाहताच त्याने पुढे बोलायला सुरुवात केली.
"एका आठवड्यापूर्वी डॉन फर्नांडोची तरूण मुलगी, कार्मन फेरारेझ फ्रान्सच्या एका कॉन्व्हेंटमधून इकडे आली. सर्वप्रथम तिने हँपस्टीडमधल्या ऍना रोझेंबर्गचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. तिथे तिचं त्या म्हातार्‍या बा‌ईशी कडाक्याचं भांडण झालं. निघताना तिचं बोलणं तिथेच काम करणार्‍या एका नोकराने ऐकलं. "ती तुझ्याकडे अजूनही आहे!" कार्मन ओरडली, "एवढी सगळी वर्षं तिच्यामुळेच तू श्रीमंत झाली आहेस. पण मी तुला खात्रीनं सांगते शेवटी कधीतरी तुझं दुर्दैव तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. ती ठेवून घेण्याचा तुला काही एक अधिकार नाही आणि एक दिवस निश्चितच असा उगवेल की ती हजार फुलांची शाल आपल्याला कधी दिसलीच नसती तर बरं झालं असतं असं तुला वाटेल."
त्यानंतर तीन दिवसांनी, ज्या हॉटेलात ती उतरली होती त्या हॉटेलातून कार्मन फेरारेझ अचानक गायब झाली. तिच्या खोलीत एक नाव आणि पत्ता सापडला. नाव होतं कॉनरॅड फ्लेकमन. तसंच एका जुन्या वस्तूंच्या विक्रेत्याकडून आलेली चिठ्ठी सापडली ज्यात त्याने तिच्याकडे असलेली एक शाल विकायची आहे का ह्याबद्दल चौकशी केलेली होती. त्या चिठ्ठीवर असलेला पत्ता खोटा होता.
आतापर्यंत हे तर स्पष्ट झालं की ती शालच या एकूण प्रकरणाच्या मुळाशी होती. काल सकाळी कॉनरॅड फ्लेकमनने ऍना रोझेंबर्गची भेट घेतली. एका तासापेक्षा जास्त वेळ त्यांची बोलणी चाललेली होती. मात्र तो निघताना तिचा चेहरा पांढराफटक पडलेला होता. त्या भेटीचा निश्चितच तिच्यावर परिणाम झाला होता. तरीदेखील कॉनरॅड फ्लेकमन परत कधी आलाच तर त्याला आत सोडण्य़ाबद्दल आणि आडकाठी न करण्याबद्दल तिने नोकरांना बजावून ठेवलं. काल रात्री साधारण नऊ वाजता ती घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. आज सकाळी कॉनरॅड फ्लेकमनच्या घरात चाकूने भोसकून खून केलेला तिचा मृतदेह मिळाला. आणि तिच्या जवळच खाली जमिनीवर............. काय असावं? तुला काय वाटतं?
"शाल?" अँथनी अधीरतेने म्हणाला.
"नाही, काहीतरी त्याच्याहून भयंकर. ज्याच्यामुळे क्षणार्धात शालीचं सगळं रहस्य उलगडलं आणि तिची खरी किंमत कळाली. पण एक मिनिट... मला वाटतं आमचा वरिष्ठ अधिकारी..... "
मध्येच घरातली बेल वाजली होती. अँथनीने मोठ्या मुष्किलीने आपली उत्सुकता दाबून ठेवली आणि इन्स्पेक्टरच्या परतण्याची तो वाट पाहू लागला. थोड्याच वेळात सहीसलामत सुटणार असल्याने तो निर्धास्त होता. त्याच्या बोटांचे ठसे घेताच त्यांना त्यांची चूक कळून येणार होती. त्यानंतर कदाचित कार्मनने देखील फोन केला असता. आणि ती हजार फुलांची शाल! खरंच, काय विलक्षण हकीकत होती! त्या मुलीच्या सावळ्या सौंदर्याला एकदम शोभून दिसेल अशी! कार्मन फेरारेझ.....
पण लवकरच आपल्या दिवास्वप्नातून त्याने स्व:तला सावरलं. इन्स्पेक्टरला परत यायला फारच वेळ लागला होता. तो उठला आणि त्यानं दार उघडलं. परंतु फ्लॅटमध्ये विलक्षण शांतता पसरलेली होती.
ते गेले की काय? अर्थात त्याला न सांगता जाणं तर शक्यच नव्हतं. तो पळतच पुढल्या खोलीत आला, पण ती रिकामी होती. बैठकीची खोलीत सुद्धा कोणीच नव्हतं. आणि सगळ्या घराला एक अस्ताव्यस्त कळा आलेली होती. बापरे! त्याचा भांड्यांचा संग्रह. चांदीची भांडी! त्याने पळतच घरभर शोध घेतला. पण सगळीकडे तीच परिस्थिती होती. संपूर्ण घर लुटण्य़ात आलं होतं. अगदी कवडीमोल वस्तूंपासून त्याने एवढ्या रसिकतेने जमवलेल्या सगळ्या वस्तू नाहीश्या झाल्या होत्या.
विव्हळत, लटपटत्या पायांनीच डोक्याला हात लावून तो खुर्चीत बसला. मात्र पुढच्या दाराची बेल वाजल्याने त्याला उठावं लागलं. त्याने दार उघडलं तर दारात रॉजर उभा होता.
"माफ करा सर पण त्या गृहस्थाने सांगितलं की तुम्ही मला बोलवलंय म्हणून" रॉजर म्हणाला.
"कोण गृहस्थ?"
"ते दोघं, तुमचे मित्र सर! होता हो‌ईल तेवढी मदत केली मी त्यांना सामान भरायला. सुदैवाने आपल्या तळघरात दोन पेट्या होत्या." त्याची नजर खाली जमिनीकडे गेली. "अगदी झाडून पुसून सगळ्या वस्तू भरल्या मी सर."
"तूच इथल्या सगळ्या वस्तू भरल्यास?" अँथनी दु:खातिरेकाने म्हणाला.
"हो सर, तुम्हीच तर तसं सांगितलं नाही का? त्यांच्यातल्या त्या उंच माणसानं मला तसं करायला सांगितलं. आणि तुम्ही त्या दुसर्‍या माणसाशी त्या खोलीत बोलण्यात गर्क होता. म्हटलं मग तुम्हाला कशाला त्रास द्या?"
"मी त्याच्याशी बोलत नव्हतो, तोच माझ्याशी बोलत होता. भामटा!"
"सर अशा या प्रसंगी मला खूपच वा‌ईट वाटत आहे सर!"
"अशा प्रसंगी?"
"तुमच्या आवडत्या वस्तू तुम्हाला दे‌ऊन टाकाव्या लागल्या सर, नाही का?"
"अं? हो! खरंच!" त्यानं हसायचा एक दुबळा प्रयत्न केला.
"ते आता निघून गेले असतील नाही का....? माझे मित्र?"
"होय सर, थोड्याच वेळापूर्वी. मीच त्या पेट्या टॅक्सीत ठेवल्या. मग तो उंच मनुष्य वर गेला आणि मग ते दोघेही पळतच खाली आले आणि ताबडतोब निघून गेले. पण एक मिनिट सर..... काही घोटाळा झालाय का?"
रॉजरने हा प्रश्न विचारावा यात काही नवल नव्हते. अँथनीचा आवाज इतका घोगरा येत होता की कुणीही चौकशी केली असती.
"होत्याचं नव्हतं झालं आहे रॉजर. पण असो. मला नाही वाटत तुला दोष देण्यात काही अर्थ आहे. आता तू गेलास तरी चालेल, मला एक फोन करायचा आहे."
पुढच्या पाचच मिनिटांत इन्स्पेक्टर ड्रिव्हर हातात छोटीशी वही घे‌ऊन अँथनीच्या शेजारी बसला होता आणि तो सांगत असलेली हकीकत ऐकत होता. हा इन्स्पेक्टर एक निर्दय माणूस वाटत होता, विशेषत: ऍंथनीच्या अनुभवानंतर तर तो बिलकूल खरा वाटत नव्हता. एकदम नाटकी!
अँथनीने आपली हकीकत सांगून संपवली नि इन्स्पेक्टरने आपली वही मिटली.
"आता काय?" अँथनीने काळजीच्या सुरात विचारलं.
"आता काय सांगायचं? सूर्यप्रकाशा‌इतकं स्पष्ट आहे हे!" इन्स्पेक्टर म्हणाला. "ही नक्कीच पॅटरसन्सची टोळी आहे. अलीकडे असले पुष्कळ उद्योग त्यांनी केले आहेत. उंचापुरा गोरा मनुष्य, काळा बुटका माणूस आणि ती मुलगी!"
"मुलगी?"
"हो, सावळी आणि खूप सुंदर दिसणारी. लोकांना फशी पाडायचं काम करते!"
"ती स्पॅनिश मुलगी? "
"आता ती स्व:तला तसं म्हणत असेल. पण तिचा जन्म इथलाच आहे, हँपस्टीडमधला."
"आणि मी हँपस्टीड खूप चांगली जागा आहे म्हणत होतो." अँथनी पुटपुटला.
"सगळं काही स्पष्ट आहे सर" इन्स्पेक्टर निघण्य़ाची तयारी करत म्हणाला. " तिने तुम्हाला फोन केला आणि रचलेली कहाणी ऐकवली. तिनं ओळखलं की तुम्ही नक्की याल. नंतर ती त्या म्हातार्‍या गिबसनच्या घरी गेली आणि ती म्हातारी काय? जरा पैसे मिळाले की ती तिची खोली देते. नाहीतरी या प्रेमिकांना बाहेर कुठे भेटण्याची पंचा‌ईत असतेच. आणि खोली देणे हा काही गुन्हा तर हो‌ऊ शकत नाही, नाही का? तुम्ही या सगळ्याला फसता, ते तुम्हाला इकडे घे‌ऊन येतात आणि जोपर्यंत त्यातला एक तुम्हाला कहाणी ऐकवत बसतो तोपर्यंत दुसरा चोरीचा माल घे‌ऊन पसार होतो. नक्की पॅटरसन्सच! ही खास त्यांची ष्टा‌ईल आहे."
"पण माझं सामान?" अँथनीनं काळजीनं विचारलं.
"आम्हाला हो‌ईल तेवढं आम्ही करुच सर. पण ते पॅटरसन्स खूपच हुशार आहेत."
"तसंच दिसतंय." अँथनी कडवटपणे म्हणाला.
इन्स्पेक्टर निघून गेला मात्र तो जातो न जातो तोच पुन्हा एकदा बेल वाजली. अँथनीने दार उघडलं. एक छोटा मुलगा हातात पार्सल घे‌ऊन दारात उभा होता.
"तुमच्यासाठी पार्सल आहे सर."
त्यानं जरा आश्चर्यानेच ते पार्सल घेतलं कारण सध्यातरी त्याला कोणतंही पार्सल येण्याची सुतराम शक्यता नव्हती. बैठकीच्या खोलीत परत ये‌ऊन त्याने ते उघडलं.
तो एक लिकर सेट होता.
"हरामखोर!" अँथनी उद्गारला.
तिथेच एका ग्लासच्या खाली असलेल्या एका छोट्याश्या गुलाबाकडे त्याचं लक्ष गेलं. क्षणार्धात त्याला कर्क स्ट्रीटवरची ती खोली आठवली.
"मला तू खूप आवडतोस रे! आणि काहीही झालं तरी तू सुद्धा मला कधीच विसरणार नाहीस, हो ना? " असंच ती म्हणाली होती. "काहीही झालं तरी... तिला कदाचित हेच तर......अँथनीने मोठ्या कष्टाने स्वत:वर ताबा मिळवला. "असं होता उपयोगी नाही!" त्यानं स्वत:लाच समजावलं. टा‌ईपरायटरकडे त्यानं पाहिलं आणि निग्रहाने तो समोर बसला. ’दुसर्‍या काकडीचे रहस्य’
पुन्हा एकदा त्याचे डोळे हरवल्यासारखे झाले. ’हजार फुलांची शाल’. आणि त्या मृतदेहाच्या कडेलाच खाली जमिनीवर पडलं होतं ते नक्की होतं तरी काय? काहीतरी भयंकर ज्यामुळे सगळं रहस्य क्षणात उलगडलं? अर्थातच काहीच नाही! त्याचं लक्ष वेधण्यासाठी रचलेली केवळ एक गोष्ट. आणि ती सांगणार्‍याने देखील अगदी अरेबियन ना‌ईटस सारखीच युक्ती वापरली होती, अगदी ऐन मोक्याच्या क्षणाला खिळवून ठेवण्याची. पण अशी एखादी रहस्य उलगडणारी भयानक वस्तू असायला काय हरकत आहे, नाही का? आणि एखाद्याने शोधायचीच म्हटलं तर?
अँथनीने टा‌ईपरायटरमधला आधीचा पेपर ओढून काढला आणि एक नवीन पेपर टाकला. शीर्षक टा‌ईप केलं, 'स्पॅनिश शालीचे रहस्य'. शांतपणे एक दोन क्षणभर त्यानं त्याचं निरीक्षण केलं आणि भरभर टा‌ईप करायला सुरुवात केली.
 
- ऍगाथा ख्रिस्तीच्या ’मि. ईस्टवूडस ऍडव्हेंचर’ या कथेचा मराठी अनुवाद.




  • हि कथा अगोदर मनोगत इथे प्रकाशित झाली आहे. खूप आवडली म्हणून इथे देत आहे.
  • ह्याचे लेखक सौरभ पांडकर आहेत.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers