skip to main |
skip to sidebar
रविवार सकाळची वेळ होती,
मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो ;
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
" चहा घेणार का तुम्ही? " असं मला म्हणाली ;
मी तिच्याकडे न बघताच "हो " म्हणालो ,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो;
माझ्या जवळून जाताना तिने केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला ;
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनंही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले;
मी हळूच उठलो खुर्चीवरुन आणि स्वयंपाकघरात आलो,
तिनं माझ्याकडे बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिनं मात्र मागे न बघताच चहाचं आधण ठेवलं,
आणि मग मला चिडवण्यासाठी आपलं नाक उडवलं;
तिच्या पाठमोर् या रुपाकडे बघत मी क्षणभर तसाच थांबलो,
उगाच तिला दुखावले म्हणुन स्वतःच्याच मनाशी भांडलो;
हळुच मग मागुन जाऊन मग मी तिच्या कमरेला विळखा घातला ,
पण गडबडीत चहाच्या भांड्याला लागुन हात माझा भाजला;
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली;
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली " जाऊ द्या ना!"
ती लाजुन म्हणाली "अहो असं काय करता? चहा उकळतोय !"
मी म्हणालो " उकळू दे! इथं माझा जीव जळतोय!"
" अहो असं काय करता? दूध उतू जाईल ना!"
" कशाला काळजी करतेस मी परत आणुन देईन ना!"
ती उगाच कारणं देत होती, मी प्रत्येक कारण उडवत होतो,
शेवटी तिनं कारण दिलं " अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय"
मी म्हणालो "हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय"
तेवढ्यात दाराची कडी वाजली,
मी मनातल्या मनात बाहेरच्याला इरसाल शिवी घातली;
तिनं झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतलं,
आणि हळूच मला धक्का मारुन, स्वयंपाकघराबाहेर लोटलं ;
मी वैतागानं दार उघडलं समोर कचरावाला दिसला,
माझा खांद्याशी ओला झालेला शर्ट पाहुन तो पण गालात हसला;
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं,
पण मागेवळताक्षणी काहितरी विचित्र घडणार आहे , असं मला वाटलं;
पहिले मला स्वयंपाकघरातुन, दूध जळण्याचा वास आला ,
नंतर कान दणाणुन सोडणारा , सिलेंडरचा स्फोट झाला;
मी धावत आत गेलो, माझं ह्रदय धडधडत होतं,
माझ्या डोळ्यांदेखत तिचं पातळ आगीवर फडफडत होतं ;
मी तिला उचलून घेतलं , डोळे माझे झरत होते,
तिच्या करपलेल्या कायेवरून हात माझे फिरत होते;
मोठ्या कष्टानं तिने डोळे उघडले,
मला पाहुन तिच्या ओठांवर, हास्य मग विलसले ;
ती म्हणाली मला " एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना !"
"मरण्यापुर्वी मला, तुमच्यामध्ये सामावू द्या ना!"
मी कवटाळले तिला उराशी, अन देवाचे स्मरण करु लागलो,
ती वाचावी म्हणुन त्याची करुणा भाकू लागलो;
पण दूध उतू गेलं होतं, ओटा मात्र फेसाळला होता,
आम्हा दोघांचं अमर आलिंगन पाहुन, तिचा मृत्युही क्षणभर रेंगाळला होता....
2 comments:
स्तब्ध........ बोलायला शब्दच नाहित उरलेले........फ़ार ट्ची लिहिलेत.... फ़ार उत्तम
सुंदर.....पण वाचली आहे हि कविता मी पूर्वी. कोठे ते आठवत नाही. याच ब्लोग वर का?
Post a Comment