Demo Site

Sunday, May 8, 2011

ही नाती सुगंधी


जानू…जानू…लवकर ऊठ..
अगं आम्ही निघतोय आता..आवर तू पण..किती वेळ झोपून राहणारेस ? आठ वाजलेत.
किती वेळच्या हाका मारतेय मी,ऊठ लवकर आणि खाली ये..आम्ही निघतोय.
आईच्या हाका ऐकून "हं" म्हणण्याइतपतच जान्हवीच्या अंगात बळ होतं,तेवढं एकवटून "हो,उठतेय" म्हणत तिने डोळे उघडायचा निष्फळ प्रयत्न केला.थोडी चुळबूळ केली पण उडालेली झोपही आता काही लागत नव्हती.
खिडकीच्या पडदयामधून शिरलेली अजाण सूर्यकिरणंही तिच्या झोपाळू डोळ्यांना सहन होत नव्हती.
काश्श ! ह्या सूर्याने पण एक दिवस सुट्टी घेतली असती तर….
म्हणत डोळे चोळतच ती बिछान्यातून उठली.रोजच्या सवयीप्रमाणे सरळ खिडकीकडे गेली.
खिडकीच्या पडद्यामधून सूर्यकिरणं गाळून आत येत होती.
तिनं पडदा बाजूला करुन पाहिलं तर सूर्याचा जणू काही चंद्र झाला होता.सूर्याला काळ्याभोर ढगांनी कुशीत घेतलं होतं.एरव्ही लालिमेने वेढलेलं त्याचं अस्तित्व शीतल धुरकट झालं होतं.आकाशभर काळ्या जांभळ्या ढगांचे पुंजके हसत खिदळत होते.
ही कुठली गाणी गाताहेत पक्षी आज ?
अन ही झाडं अशी काहीतरी लबाडी केल्यासारखी चुपचाप का उभीयेत ?
मधुनच सळसळतात,हिरवे दात विचकत.
पाऊस येईल बहुतेक..
असं स्वत:शी पुटपुटत ती खालच्या मजल्यावर स्वयंपाकघराकडे निघाली.
रविवारचा दिवस..ती सोडून घरचे सारेच गावाला जाणार होते.अर्थातच,तिनं यावं म्हणून सगळे खुप आग्रह करत होते पण रोजचं ऑफिस त्यात एक रविवारचा दिवस सुट्टीचा मिळतो तो गावाला घालवण्याचा तिचा अजिबात मूड नव्हता म्हणून तिने घरीच राहायचा निर्णय घेतला होता.
स्वयंपाकघरात जानूची आई आवराआवर करत होती.
उठलीस ?
येतेस का गावाला..आजी आठवण काढत असते गं तुझी सतत..
गेलो की पहिले विचारेल,"जानूला नाही आणलीत ?"
हो गं आई,माहितीये मला,पुढच्या वेळेस नक्की येईल,सांग तिला.
डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीवर बसत जान्हवी पुढे म्हणते,
अगं जाम कंटाळा येतो गं रोज घराच्या बाहेर निघायचं म्हणजे..
जानू,ऑफिससाठी बाहेर निघणं वेगळं आणि गावाला जाण्यासाठी निघणं वेगळं..
दिवसभर ते कम्प्युटर बडवतात तुम्ही आजकालची पोरं,ऑफिसमधल्या कोनाड्यात एखादी पानाफुलांची कुंडी पडलेली असते,तेवढंच काय ते निसर्गाचं आणि तुमचं सान्निध्य.
खरा निसर्ग भेटतो का कधी तुम्हाला ?
पिकनिक स्पॉटला जाता आणि दंगामस्ती,बस्स.

आईचं बोलणं ऐकत जान्हवी खिडकीबाहेर पहात होती.
तिचे आवडते बुलबुल पाठशिवणीचा खेळ खेळत होते.
आणि तुला तर किती आवडतं,गावाला जातांना गाडीत तंद्री लागल्यासारखी बघत असते पळणार्‍या झाडांकडे.
आईच्या बोलण्याकडे परत लक्ष देत जानू आईला बिलगत म्हणते..
हो आई,पण आज आराम.आज मूड नाहीये.
बरं जशी तुझी मर्जी.राहू देत.
मला माहितीये,आजी लग्नाचा विषय काढते,मामा स्थळ सुचवतो..म्हणून दूर पळते तू..मला काय माहित नाही ?
हा हा,मग तरी विचारतेस ?
अगं पण तुझ्यासाठी राजकुमारच शोधू ना आम्ही ? काय कुणा अशा तशाला देऊ होय आमची राजकन्या ?
तू पण ना आई..आईच्या पदराशी खेळत जान्हवी हसते.
बरं,पाऊस येईलसं दिसतंय आज,घराकडे नीट लक्ष दे.
आणि,स्वयंपाक करुन ठेवलाय मी.वाटलं तर जेवायला मैत्रिणींना बोलवून घे घरी.
तुला हवं असेल तर आणखीन काही करुन घे.
इतक्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजतो..
जान्हवीचे बाबा शेजारच्या बंगल्यातील आजोबांशी बोलत उभे असतात.
"बाबा"
हाक मारत जानू बाबांजवळ जाते..
बरं बेटा,तुझ्या आईने तुला शक्य तितका आग्रह करुन झालाच असेल,म्हणुन मी आता काही आग्रह करत नाही.
दुपारी पोहचल्यावर तुला फोन करु,ओके ?
आम्ही रात्री लवकर येऊ.
हसतच आई बाबांना बाय म्हणत जान्हवी त्यांच्या दुमजली बंगल्याचं गेट लावते.
गेटजवळच्या पानाफुलांना गोंजारत ती घरात जाते.
" हं,चला जान्हवी मॅम,आता आवरुन घ्या " म्हणत आळस देत ती तिच्या खोलीत जाते.
तिचं आवरुन होईपर्यंत दहा वाजत आलेले असतात.
सूर्याचे नामोनिशाण मिटलेले असते.जणु संधिप्रकाश पसरलेला असतो.
आवरुन सवरुन जान्हवी कॉफी घेत गॅलरीत येते.
शहरातल्या मध्यवस्तीतल्या त्यांच्या बंगल्याची गॅलरी....शांत हिरव्यागार वनराईच्या सान्निध्यातली.
शेजारुन कॉलनीतला तुरळक रहदारीचा रस्ता दिसत असतो.
गार हवेच्या झुळूकांनी वातावरणात एक आल्हाददायक नशा पसरलेला असतो.
आत जाऊन ती सीडी प्लेयर चालू करते.तिची आवडती सीडी लोडच असते.
सुनो सजना,पपीहेने कहा सबसे पुकार के....
आह ! क्या बात है ! काय दिसते ना आशा ह्या गाण्यात..
गाण्याला जोरात दाद देत जान्हवी मान डोलवत गुणगुणायला लागते.
तिची नजर दूर क्षितीजापर्यंत जाऊन स्थिरावलेली असते.

तिच्या काळ्याभोर डोळ्यांत मोरपिशी स्वप्नं तरळायला लागतात..तिच्याही नकळत..
भुरभुर उडणारे केस उगाच बेभान होऊ पहात असतात.
अन तिला तरी कुठे पर्वा असते त्यांना सावरण्याची !
गॅलरीतल्या भिंतीला टेकून ती गाण्यातल्या सुरावटींबरोबर वाहत दूर कुठेतरी पोहचलेली असते.
एक अनामिक हसू ओठांवर उमलले,स्वत:च्याच प्रेमात जणू पडावं अशी त्या एकांतात जान्हवी हरवलेली असते.
तितक्यात,
दारावरची बेल वाजते.
तिची तंद्री भंगते.कोण आलं असेल सकाळी सकाळी ? नसती कटकट.
खाली धावत जात ती दार उघडते.दारावर कुणीच नसतं.
कोण आलं होतं आणि गेट लावून निघुन पण गेलं ! थोडं बाहेर जात ती रस्त्यावर बघून येते.
कुणीच नाही ?
असं तर कधीच झालं नाही आधी..
काहीशी घाबरत घरात जात ती घराचा दरवाजा बंद करायला लागते.
तितक्यात, त्यांच्या बंगल्यातल्या झोपाळ्यावर ठेवलेला एक पुष्पगुच्छ तिला दिसतो.
अरे,हे कुणी ? कधी ?
आणि मग ज्याने आणला होता, असं गुपचूप ठेवून निघून का गेला ?
जान्हवीच्या मनात प्रश्नचं प्रश्न निर्माण होतात.
आणि आज थोडी कुणाचा वाढदिवस,ऍनिव्हर्सरी आहे,काहीच नाहीय आज.
त्या पुष्पगुच्छाला हात लावावा की नाही ह्या विचारांत ती उभी असते.
इतक्यात आभाळ अधिक दाटून यायला लागतं,विजांचा कडकडाट दाही दिशांत घुमायला लागतो.
म्हणून त्या पुष्पगुच्छाचं निरीक्षण करुन शेवटी ती तो हातात घेते आणि घरात जाऊन दार लावते.पाठवणार्‍याची काही खुण तरी मिळेल ह्या आशेने निरखायला लागते.
गुलाब,जास्वंद,केवड्याच्या फुलांनी सजलेल्या त्या पुष्पगुच्छाने एव्हाना सारे घर सुवासिक झालेले असते.
कित्ती सुंदर आहे..पण असं का ? का नाही देणारा थांबला ?मला खाली यायला इतका पण उशीर नव्हता झाला की देणार्‍याने परस्पर निघून जावं..
बरं जर फुलांच्या दुकानातून कुणी ऑर्डर देऊन पाठवला असेल तर त्यांचा माणुस सही घेतल्याशिवाय गेलाही नसता.
ओह नो ! काय आहे हे,नसती भानगड ? माझं तर आता डोकं फिरायला लागलंय..स्वत:शीच पुटपुटत जान्हवी त्या पुष्पगुच्छाला सोफ्यावर ठेवते.
कोणी पाठवला असेल ? आरती,निशा..नाही..मं..रोशनी.. छे ! छे ! असं कशाला करतील त्या ?
ऑफिसमधलं कुणी ? नाहीच शक्य.
कॉलनीत कुणी ? नाही..कुणाच्या नजरेत असं कधी काही जाणवलं नाही मला.भलताच काय विचार ? सिक्रेट ऍडमायररचा..

ह्या विचाराने कित्ती वेळपासून चिंताग्रस्त असलेल्या तिच्या चेहर्‍यावर हसू उमलतं.
आहेत फुलं पण काट्यांसारखे टोचताहेत जणु.
बरं आता काय करु ह्याचं ? घरचे विचारतील कुणी दिला तर काय सांगु ? त्यांना विश्वास बसेल का , की मला खरंच नाही माहिती कुणी पाठवला..
पण किती मोहक आहेत ही फुलं,देणार्‍याला एकदाही वाटलं नसेल माझी प्रतिक्रिया पहावी ? मला आवडला की नाही विचारावं ?
धडाधड कम्प्युटरच्या कीबोर्डवर चालणारी तिची बोटं हळुवार त्या फुलांवरुन फिरत होती.जणु तो पुष्पगुच्छ तिला अनोळखी नव्हताच मुळी.
त्या सुगंधाला उराशी घट्ट कवटाळून ती विचार करत बसली.कोण असेल तो ? हा उद्योग माझ्या मैत्रिणी करणं शक्यच नाही.
कोणी माझ्या प्रेमात ?
ती सोफ्यावर पहुडते अन तो सुगंध तिच्या मनाच्या खोल कप्प्यात.
कुणी का दिला असेना पण आता हा माझा आहे.तसं पुष्पगुच्छ काही नवी नवलाई थोडीच आहे पण हा अनामिकाने दिलेला..
ज्याने माझ्यासाठी दिलाय त्यानेही ह्या फुलांना काही सांगितलं असेल ना माझ्यासाठी ? कितीदा तरी हात फिरवला असेल..डोळे भरुन पाहिलं असेल.
नक्कीच,म्हणुन तर मला परकी वाटलीच नाहीत ही फुलं पाहताक्षणी.
बोला रे फुलांनो,तुम्ही तरी बोला.
का आलात तुम्ही माझ्याकडे ?
कुणी पाठवलं तुम्हाला इथे सुगंध उधळायला ?
मी सुखावतांना पहावसं वाटलं नाही का देणार्‍याला ?
सांगा ना,बोला ना,प्लीज.कोण आहे तो ?
बोलता बोलता जान्हवीच्या डोळ्यांतून पाणी वहायला लागतं.
काय झालंय मला ? ही रंगगंधाची उधळण मला वेड लावतेय.
तू थांबायला हवं होतस रे,मला ही फुलं देतांना..का नाही थांबलास..
तु कसाही,कुणीही असतास..मनभरुन थॅंक्स म्हटले असते निदान मी तुला.
माझ्या डोळ्यांत दरवळणारा सुगंध हुंगून जायचं होतस रे.
भावविभोर होत जान्हवी त्या फुलांशी बोलत असतांनाच फोन वाजतो.
स्वत:ला सावरत ती फोन घेते.

हॅलो..
जानू,आम्ही पोहचलो गं आजीकडे.
हो बाबा,ठीक आहे.
इकडे खुप पाऊस सुरु झालाय,निघतांना मला फोन करा.
हो,तू जेवून घे नीट.काय ? काही लागलं सवरलं तर शेजारी पवार काकूंकडे जा.
हो बाबा,अहो मी काय लहान आहे का ?काहीपण तुमचं..आणि मी काय पहिल्यांदा एकटी आहे का घरी ?
माझ्यापेक्षा मोठी तर नाही ना झालीस वेडू..
हा हा नाही..
मग ? काळजी वाटते बेटा.बरं ठेवतो मी फोन,निघतांना फोन करेल,चल बाय.
बाय.
फोन खाली ठेवल्यावर जान्हवीला भुकेची जाणीव होते.
चला,जेवून घेऊ.खरं तर ह्या फुलांनीच मला खाऊन टाकलंय.पण तरी गिळते आता दोन घास..म्हणत जान्हवी जेवायला स्वयंपाकघरात जाते.जातांना पुष्पगुच्छही सोबत घेऊन जाते.
काय केलंय आईने ? फ्लॉवर ? इथे पण ? जानूला प्रचंड हसु येतं.
कसेबसे दोन घास खाऊन जानू मोबाईलवर आरतीला फोन लावते.
हाय्य,काय चालूय ?
वाट लागलीय.
म्हणजे ?
वाघाचे पंजे..आज काय फिरकी घ्यायचा विचार होता का ?
पुष्पगुच्छ का पाठवला मला ?
पुष्पगुच्छ ? तुला ? आणि ते कशाला ?
ए बाई,प्लीज हां,This is serious.
जानू,अगं काय म्हणते आहेस,मी का पाठवीन तुला पुष्पगुच्छ वगैरे ?आणि लपवायचं काय आहे त्यात ?
मग कोणी निशा ? रोशनी ?
Come on जानू,निशाला आज पहायला येणार आहेत.रोशनी बाहेरगावी गेलीय.आणि माझ्या माहितीप्रमाणे आम्ही कुणीही तुला पुष्पगुच्छ पाठवला नाहीये.
खरंच आरती ? अगं मग काय आहे हे ? ना ऑफिस ना आमच्या कॉलनीमध्ये असं कुणी आहे की जे..
हो गुड गर्ल,मला माहितीये ते.मी असं करते संध्याकाळी येते तुझ्याकडे,आत्ता नाही येऊ शकत.माझी ट्युशन्स असतात तुला माहितीये.
ओक्के,पण नक्की ये यार.
बाकी काही प्रॉब्लेम नाही ना ? आणि तुझ्या घरचे आज गावाला जाणार होते ना ?
हो,ते निदान एक बरंय ह्या सगळ्या गडबडीत.
ओक्के,चल टेक केअर.
बाय.
मोबाईल बंद केल्यावर त्या पुष्पगुच्छाकडे न्याहाळत जान्हवी शांतपणे बसते.
खिडकीच्या तावदानावर पाऊस संथपणे ओघळत असतो.विजेच्या थयथयाटातही तिचे मन आता जराही विचलित होत नसते.
ती घड्याळाकडे पाहते.४ वाजत आलेले असतात.
काय करावं आता ह्या विचारांत ती असतांनाच दारावरची बेल वाजते.
तिच्या ह्रदयाचा ठोका चुकतो.
तो ? पुष्पगुच्छ देणारा तर नसेल आला ? की दूसरंच कुणी ?

काय करु आता मी ? तो जर कुणी बदमाष असेल तर ? हा विचार विजेसरशी तिच्या मनात चमकून जातो अन ती हादरते.
स्वयंपाकघरातून ती सुरी घेऊन येते.दाराशेजारच्या टेबलाच्या खणात ठेवते.त्याने पुढे यायचा प्रयत्न केला तर....
बेल पुन्हा वाजते.
होईल तितक्या शांतपणे ती दार उघडते.
क..कोण पाहिजे ?
दारात उभ्या असलेल्या युवकाकडे संशयाने पाहत ती जराशा चढ्या आवाजात विचारते.
माफ करा,त्रास देतोय आपल्याला.
हा नक्की सेल्समनच दिसतोय.एवढा टापटिप अन दुपारच्या वेळेस आला म्हणजे नक्कीच सेल्समन.
मी..
हे बघा,आम्हाला वॉशिंग पावडर,साबण,वॉटर प्युरिफायर काही नकोय.सॉरी.
आणि आत्ता घरात आमच्याकडे खुप गर्दी आहे,वेळ नाहीय कुणाला.
यावर हसत तो म्हणतो,
माझं नाव साहिल..साहिल देशमुख.
मी इथे तुमच्या शेजारी पवारांकडे आलोय.माझ्या मावशीच्या घरी.
ओह्ह,सॉरी हं ! मला वाटलं..
इटस ओके.
मी मुंबईला असतो.इथे मीटींग साठी आलो होतो.वेळ मिळाला म्हटलं भेटून जावं मावशीला.सकाळी देखील आलो होतो पण,नेमके सगळे बाहेर गेलेत, आता मावशी फोनवर म्हटली अर्ध्या तासात येतोय.आणि पाऊस जोरात येतोय म्हणुन तुमची हरकत नसेल तर मी इथे पोर्च मध्ये थांबू शकतो का ?
अं..
तुम्ही प्लीज माझ्या मावशीला फोन लावून विचारुन घ्या,संकोच नको.
तुम्ही विश्वास ठेवू शकता माझ्यावर.मी तुमच्या बगिच्यातली फुलं तोडणार नाही.
हा हा,अहो नाही तसं काही नाही.थांबा तुम्ही.इटस ओके.
एव्हाना साहिल मावशीच्या मोबाईलवर नंबर लावतो.
हॅलो मावशी,अगं तुझ्या शेजारच्या बंगल्यातनं बोलतोय मी.
ह्या मिस आहेत इथे,त्यांच्याशी बोलुन घेतेस का ?
असं म्हणून साहिल जान्हवीकडे फोन देतो.
हॅलो,अगं बेटा,आम्ही अर्ध्या तासात येतोय.इथे पावसामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलोय.प्लीज,साहिलला तुमच्या इथे थांबू दे.
ओक्के मावशी,बाय.
बरं तुम्ही बसा इथे,मी चहा ठेवते तुमच्यासाठी.
नो प्लीज,मी चहा घेत नाही.
मग कॉफी ?
ओह नो प्लीज,नो फॉर्मलिटीज.मी इथे शांत बसून राहतो बाहेर.यू कॅरी युअर वर्क.
जान्हवी आत जायला निघते खरी पण आत जाऊन करायचे काय ? पावसामुळे लाईटही गेलेले.सारं अंधारुन आलेलं.
ती विचार करते,बाहेरच बसूयात.
ती बाहेर येते.साहिल काहीतरी लिहीत असतो.
तुम्ही काय करता ?

मी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे एका MNC मध्ये.तुम्ही ?
मी ग्राफिक डिझायनर एका कंपनीत.
साहिल परत आपल्या लिखाणात गुंतून जातो.
एक विचारु ?काय लिहतायं ?काही कामाचं आहे का ?
असंच,काही विशेष नाही....चारोळी....
चारोळी ? बघू ना..वाचून तरी दाखवा..
अगं,इतकं खास नाहीये काही,असंच इतका छान पाऊस चालूय,लिहावसं वाटलं..म्हणून.
बोलण्याच्या ओघात त्या दोघांमधली औपचारिकता कमी होत होती.

चिंब चिंब धारा धारा
कोसळत आहे
धरुन थेंब थेंबाला
एकटेपण संपवत आहे

ओहह,सही !
तू तुझा चारोळ्यासंग्रह वगैरे प्रकाशित केलाय का ?
अगं नाही गं,असंच हौस म्हणुन लिहीतो,ब्लॉगवर टाकतो.मित्रं बसतात कौतुक सोहळा करत.
तुलापण आवड आहे का कविता,चारोळ्या वगैरे मध्ये.
हो,आहे ना,मी पण ब्लॉग,ऑर्कुट कम्युनिटीवर टाकत असते काहीबाही.
काय ? तू आहेस ऑर्कुटवर ?
तुला इमेल देतो.मला प्रोफाइल लिंक मेल कर मग नंतर,काय नाव कम्युनिटीचं ?
शब्दंसखी..
शब्दंसखी ? तू ह्याच नावाने कविता लिहतेस ना ?
Ohh small world जान्हवी.तुझ्या प्रत्येक कवितेला मी रिप्लाय करतो.
माझं प्रोफाइल नेम आहे "गंमत जंमत".
अरे राम ! तो तू आहेस ?
हो मग,तुला अनेकदा स्क्रॅप करत असतो मी.आणि तू एकदाही नाही..फक्त कवितेखाली आभार मानतेस.
एव्हाना पावसाचा जोर ओसरलेला असतो,पवार काकांची गाडी गेट समोर थांबते.
ओह मावशी आली,चल जान्हवी.भेटु मग ऑनलाईन.थॅंक्स फॉर युअर टाईम.
ओक्के साहिल,बाय.
घाईघाईने निघणार्‍या साहिलला पाठमोरा पाहत जान्हवी पायर्‍यांवर उभी असते.
बघता बघता ६ वाजत आलेले असतात.लाईट अजूनही आलेले नसतात.घरात इमरजन्सी लाईट लावून ती परत पायर्‍यांवर येऊन बसते.
वीजेच्या लकलकाटात काळोखात पुष्पगुच्छ झळाळून निघतो.
त्याच्याकडे पाहत ती बाहेर येऊन बसते.
"गंमत जंमत" हा साहिल चा ऑर्कुट प्रोफाइल ?
साहिलचा ? गंमतच आहे नाही ?
खुदकन हसून ती आठवते,तिच्या प्रत्येक कवितेला आवर्जून अभिप्राय देणारा तो "गंमत जंमत"
तिच्या कवितेतल्या भावना ओळखून कधीकधी कवितेतच अभिप्राय देणारा.
ही कविता थोडी अजून सुधारता येईल असे स्क्रॅपवर सांगणारा.
तिच्या कवितांना फोटोत टाकून तिला स्क्रॅप करणारा.
आणि मी आभाराशिवाय त्याच्याशी कधी काही बोलायची तसदी घेतली नाही.काय वाटत असेल नाही त्याला ?
अरे यार,पण मी तरी काय करु ? एकदम अशा अनोळखी माणसाशी ऑनलाईन काय बोलायचं ना ?
ती असा विचार करत असते तितक्यात गेटमधुन साहिल परत येतांना तिला दिसतो.
लगबगीने ती उभी राहते,
अगं जान्हवी,मी निघतोय आता मुंबईला.जाण्यापूर्वी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे..प्लीज रागवू नकोस.गैरसमज करुन घेऊ नकोस.
बोल ना..आश्चर्याने त्याच्याकडे पहात जान्हवी म्हणते.
मी सकाळी मावशीकडे आलो होतो.तेव्हा तू गॅलरीत उभी होतीस.तुझं लक्षही नव्हतं कुठेच,हरवल्यासारखी एकटक क्षितीजापार बघत उभी होतीस.
मी पुष्पगुच्छ घेऊन आलो होतो मावशी अन काकांना देण्यासाठी.ते बाहेर गेलेले.मला मीटींगला जायचं होतं,इतकी निरागस फुलं फेकून देता येईना..सुचेना काय करावं.
कोण जाणे का पण वाटलं..तुला तरी ही सुंदर फुलं द्यावीत.
पण आपण अनोळखी,तू घेतली नसतीस,तुझा गैरसमज झाला असता.कदाचित तुझ्या घरच्यांकडून माझी पिटाईही झाली असती.म्हणुन तसाच गुपचुप ठेवला पुष्पगुच्छ इथे झोपाळ्यावर आणि सटकलो.
अवाक होऊन जान्हवी साहिलकडे पहातच राहते.
तुला राग तर नाही ना आला,प्लीज अगदी सहजच दिला तो पुष्पगुच्छ मी.
कसंबसं स्वत:ला सावरुन जान्हवी उद्गारते,ओह इटस ओके,छान आहेत फुलं,थँक्स.
चलो मग बाय.
बाय.
क्षणभर हे सारं काय चालूय,जान्हवीला कळेनासं होतं.
पाऊस थांबलेला असतो.पक्ष्यांचे थवे घराकडे निघालेले असतात.क्षितीजावर ईंद्रधनु उमटलेलं असतं.
ओल्या मातीतनं सॄजनाचा सुगंध दरवळत असतो.
इतक्यात लाइट येतात.गेटसमोर जान्हवीच्या बाबांची स्कॉर्पिओ उभी राहते.
आई..
ह्या पिशव्या धर हातात आधी.आजीने खाऊ पाठवलाय,तझ्यासाठी.नीट ठेव कपाटात.
त्याच्यातनं आत्ता काही खायला काढशील तर नीट ठेवून दे,कपाट लावून घे.
हो.बरं,आणखीन काय हुकूम.
सध्या एवढंच.
असं म्हणुन जान्हवीची आई तिच्या बाबांशी बोलायला निघून जाते.
जान्हवीला अचानक दाराशेजारच्या खणामध्ये ठेवलेल्या सुरीची आठवण होते.शिताफिने वर्तमानपत्रात लपवून ती सुरी ती स्वयंपाकघरात आणुन ठेवते.
आणि पुष्पगुच्छ तिच्या खोलीत लपवते.
थोड्यावेळाने रात्रीच्या जेवणाला तिघे जमतात.
बरं ऐक,जान्हवीला जवळ बसवत तिची आई वाढायला सुरुवात करते.
तुझ्या मामाने स्थळ सुचवलंय तुझ्यासाठी.शेजारच्या पवार मावशींचा भाचा आहे..मुंबईला असतो..साहिल देशमुख....

1 comments:

sudeepmirza said...

:)
chaan jamalay...

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers