पूर्वी एकेकाली येमेनचा बादशहा तई याने खूप वर्ष राज्य केले. आपल्या अलकिरससा नावाच्या चुलत्याच्या कन्येशी विवाह केला. पूढे ब-याच दिवसांनी त्यांना एक सुंदर मुलगा झाला. त्यावेळी बादशहाला अतिशय आनंद झाला. त्याने आनेक पंडितांना बोलावून म्हटले की, ’आपल्या पंचांगात पाहुन याचे अचूक भविष्य सांगा.’ त्या सर्व विद्वानांनी त्याची पत्रिका तयार केली व ती पाहिल्यावर बादशहास सांगितले की, ’खुदावंत! आमच्या मते हा राजपुत्र बादशहा तर होईलच, पण त्याशिवाय तो आपले सारे आयुष्य परोपकारात घालवून पुण्यसंचय करील. प्रत्यक्ष विधात्याचेच कार्य केल्यामुळे याचा किर्तीरूपी सुगंध आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत चोहीकडे दरवळत राहील.’ हे ऎकुन बादशहा एकदम खूश झाला. त्याने ह्या लोकांना खूप जडजवाहीर व मोहरा देऊन निरोप दिला.
नंतर त्या मुलाचे मोठ्या थाटाने ’हातिम’ असे नांव ठेवून त्याने आपल्या सरदारांना आज्ञा केली की, ’ तुम्ही सगळीकडे दवंडी जाहीर करा की, ’ माझ्या राज्यात आज ज्यांच्या कुटुंबात मुलगा जन्माला आला असेल तो आजपासून बादशहाचा नोकर आहे. त्याच्या मातापित्यांनी त्याला इकडे पोहोचते करावे. मुलाचे लालनपालन येथेच केले जाईल.’ बादशहाचा हूकूम ऎकताच प्रत्येकाच्या आईवडिलांनी आपापला मुलगा हुजुरांकडे पोहोचता केला, त्या दिवशी राज्यात सहा हजार मुलगे जन्माला आले होते. नंतर त्या सर्व मुलांसाठी सहा हजार दाया व नोकरचाकर ठेवले गेले. त्या मुलांपैकी एकावर सर्वांचे विशेष लक्ष होते, तो म्हणजे हातिम. त्याला अनेक दाया जपत व अनेक प्रकारांनी खेळवत असत. एवढे करूनही तो मुलगा डोळे उघडेना किंवा दूधसुद्धा घेईना.
तो प्रकार पाहून बादशहा बुचकळ्यात पडला व त्याने सरदारांना हुकुम सोडला की, ’ पंडितांना ह्याचे कारण विचारा.’ ते ऎकल्यावर पंडितांनी सांगितले की, ’सर्व मुलांचे दूध पिऊन झाल्यावर हा दूध पिईल.’ त्याप्रमाणे सर्व मुलांना दूध पाजल्यावर तो प्याला. पुढे त्या सहा हजार मुलांबरोबर त्याचे जेवणखाणे होऊ लागले.
जेव्हा तो १४ वर्षाचा झाला तेव्हा त्याने बापाची संपत्ती गोरगरिबांस वाटून टाकली. त्याने कधीही कोणावर जुलूम केला नाही. आपले नुकसान करून घेतले नाही किंवा दूस-याचेही केले नाही. पुढे तारूण्य प्राप्त झाल्यावर तो इतरांना उपदेश करू लागला की, ’ही सर्व सुष्टी ईश्वराने निर्माण केली. त्याच्या कारागिरीनी चौ-याशी लाख विश्व निर्माण केली आहेत. त्याच्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या कर्तुत्वाने पुढे यावे.’ लवकरच त्याचे लावण्य, शौर्य बुद्धिमत्ता, परोपकारी वृत्ती यांची किर्त्ती वा-यासारखी सगळीकडे पसरली.
एकदा तो जंगलात शिकारीसाठी गेला असता एक सिंह त्याच्या अंगावर गुरगुरताना दिसला. तेव्हा त्याने मनात विचार केला की, ’मी खंजीर मारला तर तो घायाळ होईल. सोडून दिले तर माझा प्राण घेईल. पण मग ह्याचा आत्मा तरी कसा शांत होईल?’ शेवटी तो स्वत:च सिंहापूढे उभा राहून म्हणाला, ’हे वनराजा! मी व माझा घोडा तुझ्यासमोर हजर आहोत. तुला आवडेल त्याला खाऊन तू तृप्त हो.’ ते ऎकुन तो सिंहराज आपली गर्दन झुकवुन हातिमच्या पायांवर पडला आणि डोके त्याच्या पायांवर चोळू लागला. त्याचे पाय चाटू लागला. तेव्हा हातिमने त्याला पुन्हा सांगितले की, ’ मला खात नसशील तर माझ्या घोड्याला खा.’ पण सिंह काही न करता मान खाली घालून तेथून निघून गेला. अशा प्रकारे हातिम सर्वांसाठी झटत होता. परोपकारासाठी आपले आयुष्य वेचित होता.
0 comments:
Post a Comment