Demo Site

Monday, September 13, 2010

पेशवेकालीन तांडव गणपती

  •   इतिहास / माहिती
इतिहास हा बहुतेकांचा एक उत्सुकता असणारा विषय असतो तसा तो माझाही आहे. श्री प्रमोद ओक यांचे पेशवे घराण्याचा इतिहास, यं. न. केळकर यांचे मराठेशाहितील वेचकवेधक व इतिहासातील सहली तसेच डो. अ रा कुळकर्णी यांचे जेधे शकावली- करिना ही पुस्तके विकत घेतली. पेशवे घराण्याचा इतिहास या श्री प्रमोद ओक लिखीत पुस्तकातील माहिती माझ्या साठी खुप नवीन होती. यात पेशवेकालीन तांडव गणपती बद्दल दिलेली माहिती इतरांना हि व्हावी याउद्देशाने त्यांच्याच शब्दात साभार खाली देत आहे. या संदर्भात काही नवीन माहिती असल्यास त्यावर् प्रकाश टाकावा ही अपेक्षा. :-
"सन १७६५ नंतर कधीतरी श्रीमंत रघुनाथ राव दादासाहेब पेशव्यांमुळे पेशवा परिवारांच्या संपर्कात आलेली अघोरी तांडव गणपतीची मूर्ती हाएक विलक्षण प्रकार होता. या मूर्तीशी संपर्क आलेल्या कोणाचेही भले झाले नाही. या मूर्तीची थोडी माहिती इतिहासात उपलब्ध आहे. थोरल्या माधवरावांचे दुखणे बळावत चालल्यामुळे उपचार करणाऱ्या वैद्यांची, प्रकृती सुधारण्याबद्दलची आशा मावळत चालली होती. त्यामुळेरघुनाथरावांची पेशवेपदाची हाव वाढून ते पेशवाईची स्वप्ने पाहू लागले. ही लालसा पुरी व्हावी म्हणून रधुनाथराव स्वतःजवळील तांडव नृत्यकरणाऱ्या उग्र गणपतीची, अघोरी मांत्रिकाच्या व कपट विद्येत पारंगत असलेल्या लोकांच्या नादी लागून , कडक उपासना करू लागले. नारायणपेशवे गारदी मागे लागले असतांना जीव वाचविण्यासाठी केविलवाणे किंचाळत रघुनाथरावांकडे धावले , त्या वेळी रघुनाथराव याच गणपतीचीपुजा करीत होते. म्हैसुर प्रांतातील कोणी कोत्रकर नावाचे गृहस्थ अघोरी विद्येच्या बाबतीत रघुनाथरावांचे गुरू होते. त्यांनी ही तांडव गणपतीची मूर्तीरघुनाथरावांना उपासनापूर्वक अनुष्ठान करण्यासाठी खास कर्नाटकातून आणून दिली होती, मूर्ती पंचधातुची असून उंची सुमारे दिड फूट आहे. निजामावर स्वारी करण्याच्या निमित्ताने सन १७७३ च्या अखेरिस रघुनाथरावांनी पुण्यातून पळ काढला त्यावेळी, त्यांच्या शेडाणीकर नावाच्याआश्रिताने मूर्ती शनिवारवाड्यातून लांबविली व शेडाणी गावात नेऊन एका पिंपळाकाली मूर्तीची स्थापना केली. थोड्याच दिवसात मूर्ती तेथूननाहीशी झाली. ती चिंचवड , वाई या ठिकाणी वनवास भोगून सातारला एका ब्राम्हणाच्या घरी असल्याचे आढळले. या अघोरी मूर्तीच्या अशुभकरणीला त्रासून त्या पोटार्थी ब्राम्हणाने जुन्या पडक्या विहिरीत मूर्तीला जलसमाधी दिली. या गोष्टीला ५०-६० वर्षे उलटून गेल्यानंतर साताराशहरातिल प्रसीद्ध संन्यासी गोडबोले शास्त्री (नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद) यांच्या स्वप्नात ती मूर्ती आली. स्वामीनी आपले शिष्य श्रीवामनराव कामत यांना मूर्तीचा शोध घेण्याची आज्ञा केली. चौकशी अंती श्री वामनराव कामत यांना मूर्तीचा कुप्रसिद्ध इतिहास समजला. सातारचा तो ब्राम्हण निः संतान वारल्याचेही कामतांना समजले. त्यामुळे श्री कामत गुरुंजींची आज्ञा पाळण्याबद्दल टाळाटाळ करू लागले. इकडे गोडबोलेशास्त्रींना (स्वामी स्वच्छंदानंद) वारंवार दृष्टांत होऊ लागले. अखेर नाइलाजाने कामतांनी मूर्ती बाहेर काढली. आपल्याच देवघरात तिची स्थापना करून श्री कामत पूजाअर्चा करू लागले. यानंतर ८-१० वर्षातच कामत कुटुंबातील मंडळी एक एक करून वारली. यामुळे या वेळेपर्यंत निः संतान झालेले श्री. कामत हाय खाऊन सुमारे १९३८ साली वारले. यानंतर त्यांच्या लांबच्या नात्यातील त्याच घरात राहणाऱ्या एका बाईंनी त्या मूर्तीचे स्थलांतर देवघरातून वाड्याच्या ओसरीतील कोनाड्यात केले.
पुढे १९४३ सालच्या सुमाराला कै. कामतांच्या गुरुभगिनी ताई चिपळुणकर यांनी ब्राम्हणाकरवी तांडव गणपतीची पूजा सुरू केली. मूर्तीने या बाईंनाही चांगलाच हात दाखवल्याचे कळते. या बाई अखेरच्या काळात अर्धांगाने जर्जर झाल्या होत्या. दरम्यान मुंबईचे डॉ. मोघे यांना पुराणवस्तू (क्युरिओज) जमवण्याचा विलक्षण नाद होता. या मूर्तीची हकीगत कानांवर येताच मोघ्यांनी स्वतःचे मित्र धुंडिराजशास्त्री बापट यांना मूर्ती मिळविण्यासाठी ताई चिपळुणकरांकडे सातारला पाठवले. बापटांचे मित्र नानासाहेब सोनटक्के यांनी खास टैक्सीने मूर्ती पुण्याला आणली. नंतर रात्रीचा प्रवास नको म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला निघायचे ठरले. आश्चर्य असे की अचानक त्या रात्री सौ. सोनटक्केया पोटशुलाने हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी वेदना असह्य झाल्या. श्री. सोनटक्के मूर्तीसह टैक्सीने मुंबईला निघाले. ती टैक्सी दूर जाताच इकडे बाईंची पोटदुखी एकदम थांबली. यानंतर २-३ वर्षे मूर्ती मूंबईला डॉ. मोघ्यांच्या घरी राहिली. पुढे डॉ. मोघ्यांना मुलगा झाला पण तो वेडसर निपजला . तसेच डॉ. मोघे व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे त्रासून मोघ्यांनी प्रैक्टीस बंद करून मुंबई सोडली. मोघ्यांच्या गरी विद्यार्जनासाठी विद्यार्थी ठेवण्याची जुनी पद्धत होती. तशा विद्यार्थ्यांपैकी केशवराम अय्यंगार हा कर्मठ ब्राम्हण विद्यार्थी एक होता. मुंबई सोडतांना डॉ मोघ्यांनी गणेशाची मूर्ती इतर संग्रहासह, सर्व इतिहास सांगून अयंगार ला दिली.
कालांतराने अय्यंगार ने म्हैसूरच्या प्रसिद्ध मूर्तीकाराकडून मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती तयार करवून आणली. दोन्ही मूर्ती कांचीपूरमचे शंकराचार्यांना अर्पण करण्याचे ठरविले. स्वामींनी परवानगी देताच, गरोदर पत्नीची नाजूक अवस्थाही नजरेआड करून अय्यंगार दोन्ही मुर्ती घेऊन कांचीपूरमला गेले. स्वामींनी मूर्तीकडे क्षणभरच दृष्टीक्षेप टाकला व प्रतिकृती ठेवून घेतली व अघोरी मूर्ती परत केली. निराश मनाने अय्यंगार मूर्तीसह मद्रासला परतले. तोच त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीची बातमी समजली. पण मुलगा वेडसर निपजला. अय्यंगारांची अवस्था ऐकून त्यांचे स्नेही मद्रासच्या गणेश बुक एजन्सीचे मालक श्री. सुबय्या यांनी श्री अय्यंगार नको म्हणत असतानाही मूर्ती स्वतःजवळ ठेवली. पुढे सुबय्यानी ही मूर्ती मद्रासच्या लंबूचेट्टी स्ट्रीटवरील शंकरमठाला अर्पण केली. यानंतर वर्षभरातच श्री सुबय्या कैलासवासी झाले. या प्रकारे मूर्ती शंकरमठातच आहे असे समजते. "


आधार - भा. इ. सं. मंडल त्रै. २८-१-२
केसरी वृत्तपत्र-२६-३-१९७८ आणि ९-७-७८.


0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers