"ईईईईव! हे काय भलतंच. नसती फ्याडं सुचतात एक एक. जंकी, ड्रगी, हिप्पी, फ्याशनच्या जगतातील काही बिघडलेले कलावंत यांच्याखेरीज कोणीही टॅटू लावत नाहीत. अमेरिकेत एखादे फ्याड निर्माण झाले की लग्गेच आपण त्याचे कित्ते गिरवायलाच हवेत, नाही का? आपल्या अंगावर काहीतरी कोरून घ्यायचे, त्याचे साइड
इफेक्ट्स, इन्फेक्शन झाले तर पंचाईत. एडसचा बागुलबुवा आहेच वर. आपल्या कातडीत सुया टोचून रंग खुपसून घेण्याचा रानटीपणा आणि त्यातून काही वर्षांनी आपण कसला मूर्खपणा करून बसलो असे वाटले तर पश्चात्ताप करत बसायचं. तो टॅटू पुसून टाकणे इतके सोपेही नाही. " मी तोंड सोडले आणि त्या दटावणीमुळे बहुधा त्यांची इच्छा तिथेच विरून गेली आणि त्यांनी हलक्या सुरात केलेली तक्रारही.
"ठीक आहे नाही लावून घेत टॅटू पण ते जंकी, हिप्पींचे संदर्भ जरा चुकताहेत असे वाटत नाही का आणि आपल्याकडील लहान मुलांचे कान-नाक टोचण्याच्या रानटीपणाबद्दल काय वाटते? "
टॅटूइंग किंवा गोंदवणे या कलेबद्दल टोकाचे विचार मांडणार्या अनेक व्यक्ती भेटतात. आपले अंग टोचून कायमस्वरुपी रंगवण्याविषयी नाराजी व्यक्त करणारी माझ्यासारखी माणसे किंवा टॅटू लावणे "कूल" आहे म्हणून दिमाखात आपल्या अंगावरचे गोंदवण मिरवणारे. या टॅटूंविषयी सामोआ या पॉलिनेशियन बेटावरील भाषेत एक म्हण आहे - एकवेळ तुमच्या शरीरावरील दागिना मोडून तुमची साथ सोडण्याचा संभव आहे पण गोंदवण तुमची साथ कबरीपर्यंत करेल.
प्राचीन काळापासून शृंगाराचे मानवाला वेड असल्याचे अनेक पुरावे देता येतात. हस्तिदंती फण्या, अत्तराच्या आणि काजळाच्या कुप्या, सुगंधी तेले, लेप, रंग यासारख्या सौंदर्य खुलवणार्या साधनांचे आणि कायमस्वरुपी शारीरिक शृंगार म्हणता यावे असे कान, नाक किंवा शरीराचे इतर भाग टोचणे, अंग गोंदवणे यांचेही मानवाला आकर्षण असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात हातावर, पायांवर आणि शरीराच्या अन्य भागांवर मेंदीची नक्षी काढणे ही देखील टॅटूसदृश कला मानली जाते. शाईने गोंदवण्यासारखी ती कायमस्वरुपी नसते एवढेच. अन्यथा, परदेशांत मेंदीला इंडियन टॅटू या नावाने सर्रास संबोधले जाते. मेंदीच्या नक्षींचे डाय वापरून अंग रंगवण्याची कलाकुसरही प्रसिद्ध आहे. इजिप्त, लिबियापासून भारतापर्यंत सर्व प्रदेशांत गेली हजारो वर्षे धार्मिक, सांस्कृतिक कार्यांत मेंदी लावण्याची प्रथा जोपासलेली आहे. भारतात मेंदीला सौभाग्यलंकार मानले जाते.
नवपाषाणयुगातील सुमारे ५३०० वर्षांपूर्वी सापडलेल्या ऑत्झी या आदिमानवाच्या पाठीवर पट्ट्याप्रमाणे गोंदवलेल्या लहान रेषांचा समूह आणि पायांवर गोंदवलेली काही चिन्हे हे टॅटूचे जगातील सर्वात आद्य उदाहरण मानले जाते. इटली आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्स पर्वतात सापडलेल्या या मृतदेहाच्या अंगावर मोजून ५७ गोंदवल्याच्या खुणा सापडल्या आहेत. या गोंदवणांचे ऑत्झीच्या शरीरावरील स्थान ऍक्युपंक्चर पॉईंटसपाशी असल्याने कदाचित शारीरिक उपचार म्हणूनही ही गोंदवणे केलेली असावीत असा एक मतप्रवाह दिसतो. प्राचीन इजिप्त आणि लिबियामध्ये सापडलेल्या ममींच्या शरीरांवरही गोंदवल्याच्या स्पष्ट खुणा दिसून येतात.
प्राचीन संस्कृतीत गोंदवून घेण्याची कारणे मात्र निराळी असावीत असा तर्क मांडला जातो. धार्मिक विधी म्हणून, ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी, एखादा ताईत किंवा मंत्र म्हणून, त्यागाच्या भावनेतून, आपण एका कबिल्याचे, जमातीचे आहोत हे ठसवून देण्यासाठी, गुलामांची-दास्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा शिक्षा म्हणूनही अंग चिन्हांकित करण्याची प्रथा अस्तित्वात आली असावी.
ख्रिस्ताचा क्रूस, भळभळा वाहणारे हृदय, अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक चिन्हे, आद्याक्षरे, नावे आणि असे अनेक टॅटू प्रत्येकाने आजवर पाहिले असतील परंतु टॅटूंच्या या विविध नक्षींना अर्थ असतो किंवा त्यातून एखादी भावना व्यक्त केलेली असते. काही प्रसिद्ध नक्षींबद्दल थोडक्यात माहिती पाहू:
जहाजाचा नांगर: जहाजाचा नांगर हे सावधानतेचे आणि सुरक्षिततेचे निशाण मानले जाते. खलाशी आणि जहाजावरील इतर कर्मचार्यांच्या मते नांगर हे जहाजाला बुडण्यापासून वाचवणारे सुचिन्ह आहे.
गुलाब: हे निःसीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते तसेच सौंदर्य आणि निकोपतेचे चिन्हही. प्रेमाची आणि सौंदर्याची रोमन देवता व्हीनस हिचे प्रतीक म्हणून गुलाबाचे गोंदवण केले जाते.
सर्प: साप आपली कात टाकून नवा जन्म धारण करतो या भावनेतून साप किंवा नाग यांचे गोंदवण हे अमरत्वाशी संबंधीत मानले जाते. साप हे शक्तीचे प्रतीकही मानले जाते.
सिंह: सिंह हा वनाचा राजा मानला गेल्याने सिंहाचे चिन्ह हे पुरुषत्वाचे, शौर्याचे, विजयाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते.
मासा: मासा हे प्राचीन ख्रिश्चन संस्कृतीचे प्रतीक ख्रिस्ताशी संबंधीत असल्याने माशाच्या रेखाकृतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
ड्रॅगन: मानवाला भीती वाटेल असे आग ओकणार्या किंवा पंख विस्तारलेल्या ड्रॅगनचे गोंदवण हे भीतीवर मात केल्याचे किंवा संकटातून पुढे जाण्याचे चिन्ह मानले जाते.
सूर्य, चंद्र, तारे: सिंहाप्रमाणेच सूर्य हे देखील पुरुषत्वाचे, शौर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते तर चंद्रकलांचा वापर जीवनातील टप्पे दाखवण्यासाठी केला जातो आणि चांदण्या हे आशेचे आणि आत्मिक आनंदाचे प्रतीक मानले जाते.
अग्नी: अग्नी हे जीवनाचे प्रतीक मानले जाते. जीवनातील चांगल्या-वाईट क्षणांची आठवण म्हणून या गोंदवणाचा वापर होतो.
पक्षी: पक्षी हे प्रेमाचे, शांततेचे, ज्ञानाचे, आशेचे आणि आत्मसाक्षात्काराचे प्रतीक मानले जाते.
लहान-मोठ्यांपासून सर्वांना आकर्षित करणार्या या टॅटूंबरोबर आरोग्याची सुरक्षितता आणि त्यामागील धोक्यांचे आकलन हे अतिशय महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. शरीरात किंवा त्वचेत सुया खुपसण्यातून अनेक त्वचारोग, टीबी, हेपॅटॅटिस आणि HIV ची आणि इतर रोगांची लागण होण्याची शक्यता असते . अमेरिकेत टॅटू स्टुडिओ उघडण्यासाठी विशेष परवानापत्र लागते तर सरकारमान्य नसलेल्या स्टुडियोंतून टॅटू लावून घेतल्यास त्या व्यक्तीस पुढील १२ महिन्यांपर्यंत रक्तदानाची मुभा नसते. टॅटू गोंदवणारी व्यक्ती कायद्याने सज्ञान असण्याची अट घातलेली आढळते किंवा काही वेळेस पालकांच्या परवानगीने टॅटू करवून घेता येतो. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठीच नाही तर बर्याचदा असा वैयक्तिक निर्णय भविष्यात चुकीचा वाटू शकतो आणि म्हणून हा निर्णय घेताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
गेल्या आठवड्यात एका मिटिंगमध्ये ग्रेग नावाचा एक अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार सहकारी प्रोजेक्टमधील काही महत्त्वांच्या घटकांवर समरसून चर्चा करत होता. कामाचे काही पेपर्स माझ्या दिशेने सरकवताना त्याच्या शर्टाची बाही थोडी वर सरकली आणि त्याच्या दंडावरील राखेतून जन्म घेणारा लाल-निळा फिनिक्स पक्षी माझी नजर वेधून गेला हे त्याच्या लक्षात आले.
“आय ऍम फिनिक्स,” ग्रेग मंद हसत कुजबुजला आणि एका लेखाचा जन्म झाला.
संदर्भ :
बॉडी पिअर्सिंग ऍंड टॅटूज - जे. डी. लॉयड
द बॉडी आर्ट बुक - जीन-क्रिस मिलर
टॅटू - इंग्रजी विकिपीडिया
0 comments:
Post a Comment