Demo Site

Saturday, November 13, 2010

एक उत्क्रांती अशीही

आमिरचा घजनी आल्याबरोबर बर्‍याच तरूणांनी 'घजनी कट' मारला. ते पाहून नाक मुरडणारे त्यांचे काका-मामा म्हणाले, "काय ही आजकालची पोरं! काहीतरी फ्याड आहे झालं." अर्थात ते त्यांच्या काळात देव आनंदसारखा केसांचा कोंबडा ठेवत होते ते सोडा. पण खरेच ही गोष्ट फ्याड म्हणून सोडून देण्याइतकी क्षुल्लक आहे का? की यामागे काही वेगळेच कारण आहे? माणूस आणि इतर प्राण्यांमधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाकडे संस्कृती आहे. संस्कृती या शब्दाची व्याप्ती बरीच मोठी आहे. भाषा, साहित्य, संगीत यापासून ते रोजच्या फ्याशन किंवा जेवताना पाळायचे नियम हे सर्व संस्कृतीमध्येच येतात. पण उत्क्रांती होताना माणसाला माणूसपण मिळाल्यानंतर हे सर्व नियम कसे अस्तित्वात आले असतील?
त्यांचा प्रसार कसा झाला असेल? उत्क्रांतीचा अभ्यास करणार्‍या काही शास्त्रज्ञांचे या गोष्टीकडे लक्ष गेले. त्यांच्या असे लक्षात आले की सर्व प्राण्यांमध्ये ज्याप्रमाणे जनुकीय उत्क्रांती होते आहे तशीच उत्क्रांती माणसाच्या संस्कृतीमध्येही होते आहे आणि ती जनुकीय उत्क्रांतीपेक्षा फारच वेगवान आहे. हा शोध महत्वपूर्ण आहे कारण यामुळे डार्विनचा सिद्धांत जनुकांपुरता मर्यादित न राहता अधिक व्यापक होतो. जनुक हे डार्विनच्या सिद्धांताचे केवळ एक प्रकारचे वाहक आहे. याऐवजी दुसरा वाहक आला तर तो ही डार्विनचा सिद्धांत पाळेलच, पण त्यामुळे होणारी उत्क्रांती वेगळ्या प्रकारची असेल.

संस्कृतीमधील वेगवान उत्क्रांतीचे एक ठळक उदाहरण म्हणजे झपाट्याने बदलणार्‍या भाषा. स्टारमाझाच्या ग्रेट भेटमध्ये शिवरायांना बोलावले तर त्यांना आत्ताचे मराठी कळणे अशक्य होईल. किंवा शेक्सपिअरला बीबीसीवर मुलाखत देणे तितकेच अवघड जाईल. गुणसूत्रांमध्ये कधीकधी अपघाताने बदल होतात आणि ते टिकून रहातात. भाषेच्या उत्क्रांतीमध्येही बरेचदा चुकीचे बदल टिकून राहिल्याचे दिसते. (इंग्रजीतील यू वॉज ऐवजी यू वेअर किंवा मराठीत सशाचे स्त्रीलिंग, पालीचे पुल्लिंग नसणे.) किंबहुना यामुळेच सर्व भाषांचे व्याकरण क्वचितच तर्कसंगत असते.

ज्याप्रमाणे उत्क्रांतीसाठी जनुके (जीन) वाहक म्हणून काम करतात तसेच एकक संस्कृतीच्या उत्क्रांतीसाठीही असायला हवे. प्राणीशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांनी हा विचार पहिल्यांदा मांडला. या एककाला त्यांनी मीम (meme) असे नाव दिले. मीम हा शब्द mimeisthai या ग्रीक शब्दापासून घेतला आहे. या शब्दाचा अर्थ आहे नक्कल करणे. mimeisthai चे meme असे संक्षिप्त रूप करण्याचे कारण डॉकिन्स यांना जीन या शब्दाशी मिळताजुळता शब्द हवा होता. मीमच्या उत्क्रांती आणि प्रसाराचा अभ्यास करणायांसाठी आता जेनेटिक्स प्रमाणे मिमॅटिक्स (memetics) ही नवीन शाखा अस्तित्वात आली आहे.

मीम म्हणजे नेमके काय? वरील उदाहरणात आमिरची किंवा देव आनंदची विशिष्ट प्रकारची केशभूषा ही एक मीम आहे. अशी कोणतीही गोष्ट जिची नक्कल करता येणे शक्य आहे आणि जिचा एका मेंदूतून दुसया मेंदूत प्रसार होऊ शकतो, तिला मीम म्हणता येईल. यात कल्पना, विचार, लकबी, शिष्टाचार, संगीताच्या चाली, फ्याशन काहीही येऊ शकते. पण मीम म्हणजे फक्त संकल्पना आहे की जीनप्रमाणे तिला भौतिक अस्तित्वही आहे? यावर संशोधनाअंती असे आढळले आहे की एखादी मीम मेंदूत शिरल्यानंतर मेंदूतील तेवढ्या विशिष्ट भागातील न्यूरॉनच्या वायरिंगची संरचना बदलते. याचा अर्थ मीमचा प्रसार होत असताना सर्व वाहक मेंदू त्या मीममुळे किंचित बदलतात. मीमच्या उत्क्रांती आणि प्रसाराला जडरूपात अस्तित्व आहे याचा हा एक पुरावा आहे.

मीम फक्त माणसांमध्येच असतात असे नाही. पण माणसांमध्ये संस्कृतीचा प्रचंड विस्तार झाल्यामुळे याची उदाहरणे अधिक आहेत. न्यूझिलंडजवळच्या एका बेटावर सॅडलबॅक या पक्ष्यांची वसाहत आहे. हे पक्षी जवळपास नऊ विविध प्रकारची गाणी गातात. पण कुठलाही नर यापैकी एक-दोन प्रकारचीच गाणी गातो. ही नऊ प्रकारची गाणी बेटाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचलित आहेत. एखादा पक्षी कोणते गाणे गाईल हे तो कुठल्या भागात रहातो यावर अवलंबून असते. लहान मुले ज्याप्रमाणे ऐकून आणि नक्कल करून भाषा शिकतात, तसेच या पक्ष्यांची पिल्ले आजूबाजूला गायली जाणारी गाणी ऐकत आणि त्यांच्या नकला करत गाणी शिकतात. कधीकधी एखादा पक्षी गाताना चुकून एखादा स्वर वेगळा लावतो आणि तीच पद्धत पुढे चालू रहाते. अशा प्रकारे नवीन गाणीही तयार होतात. ही गाणी या पक्ष्यांच्या मीम आहेत.

जीनमध्ये बदल झाल्यास तो बदल टिकेल किंवा नाही हे त्या बदलाचे परिणाम त्या जातीचे अस्तित्व टिकवण्यास मदत करतात की नाही यावर अवलंबून असते. हा डार्विनचा सिद्धांत झाला. मीमबद्दल असे काही म्हणता येईल का? मानवी इतिहासाकडे पाहिल्यास असे दिसते की काही मीम अत्यंत ठामपणे समाजात टिकून आहेत तर बाकीच्यांचे आयुष्य कमीजास्त आहे. आमिरचा हेअरकट ही मीम काही महिनेच टिकली पण वेदात सांगितलेला लग्नात करण्याचा सप्तपदीचा विधी ही मीम अडीच-तीन हजार वर्षे झाली तरी अबाधित आहे. एखाद्या मीमच्या अस्तित्वामागे प्रबळ मानसशास्त्रीय किंवा सामाजिक कारणे असली तर ती मीम शतकानुशतके टिकून रहाते. याखेरीज ज्या मीममुळे जगणे अधिक सोईस्कर होते त्या मीमही जलदपणे पसरतात. माणसाला आगीचा शोध लागल्यावर त्याचे अनेक फायदे लक्षात घेता गारगोट्यांच्या सहाय्याने आग कशी लावायची आणि कशी जतन करायची ह्या मीम सर्वांनी लगेच आत्मसात करून घेतल्या असाव्यात.
मीम आपल्या अवतीभोवती सगळीकडे आहेत. वेदांचा प्रसार होण्यासाठी त्याकाळी फक्त मौखिक पद्धत उपलब्ध होती, पण आज लेखन, चलचित्र, आंतरजाल अशा अनेक माध्यमांच्या सहाय्याने अनेक प्रकारच्या मीमचा प्रसार झपाट्याने होतो आहे. सध्या गाजत असलेली ट्विटर ही साइट वेगवेगळ्या प्रकारच्या मीमचा प्रसार करण्यासाठीच बनवलेली आहे. काही लोक आपल्या मीमचा प्रसार होऊ नये म्हणून त्यावर पेटंट घेतात तर कलावंत लोक त्यांच्या मीमच्या प्रसारामुळे गडगंज संपत्ती कमावतात. काही मीम समाजाच्या दृष्टीने विघातक आहेत तर काही उपयुक्त. 'आर्य वंश सर्वात श्रेष्ट' ही मीम विघातक आहे पण कालिदास, शेक्सपिअरची काव्ये या मीम अमूल्य आहेत.
तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जनुकांचे परिणाम फार काळ टिकणार नाहीत. पण तुम्ही एखादा शोध लावला, एखादे पुस्तक लिहीले किंवा लोकांच्या उपयोगी पडणारी एखादी संस्था काढली तर त्या मीमच्या रूपाने तुमचे अस्तित्व बराच काळ टिकून राहील. संत रामदासांच्या एका प्रसिद्ध मीममध्ये थोडा बदल करून म्हणता येईल, "मरावे परी मीमरूपे उरावे."

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers