आपण साजर्या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसर्याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसर्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
होळीच्या दुसर्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बर्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसर्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळे येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.
होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्या सणामागे एक आख्यायिका आहे.पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.
थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत होळीच्या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत राहणार्या आदिवासी (महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांना जोडणारा भाग) समाजात या सणाचे दिवाळसणापेक्षाही जास्त महत्त्व आहे. होळीच्या आठ दिवस आधी आणि आठ दिवस नंतर चालणार्या या उत्सवात आदिवासी समाजातील जनतेचा भोंगर्या बाजार भरतो. त्याभागातील प्रत्येक गावात एकेक दिवस हा बाजार भरतो. या बाजारातून आदिवासी संस्कृती दिसून येते.
या दिवशी हे आदिवासी कुलदेवतेला नमस्कार करून पारंपरिक नृत्य सादर करतात. रात्रभर आजूबाजूचे लोक एकत्र येऊन नाचगाणी करतात. दारू पितात आणि होळीचा सण साजरा करतात. रात्री कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन बोकड कापले जाते. बोकड कापण्याचेही एक वैशिष्ट्य आहे. आपल्या जवळील धारदार शस्त्राने एकाच घावात बोकडाचे धड वेगळे केले जाते. त्यानंतर मरून पडलेल्या बोकडांभोवती रात्रभर नृत्य करत गाणी म्हटली जातात. या बोकडाचे मांस सकाळी शिजवून प्रसाद म्हणून खाल्ले जाते.
विशेषतः तरुण-तरुणी या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. कारण या दिवशी त्यांचे विवाह ठरणार असतात. कुलदेवतेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय विवाह करणे ते अपशकून मानतात. या निमित्ताने मोठ्या संख्येने मुले-मुली पारंपरिक वेषभूषेत आलेले असतात. या प्रसंगी प्रत्येकजण आपल्या आवडीने जोडीदार पसंत करतात. या क्षणी मुलगा मुलीला मागणी घालतो. मुलाने दिलेला पानाचा विडा मुलीने स्वीकारला आणि त्याला गुलाल लावू दिला तर ती मुलगी त्या मुलाशी लग्न करण्यास तयार आहे हे गृहीत धरले जाते. त्या रात्री ते दोघेही जण अज्ञात ठिकाणी पळून जातात. त्या ठिकाणी ते चार ते पाच दिवस राहतात. त्यानंतर मुलीच्या माहेरी परत येतात. तिथे समाज पंच ठरवतील तेवढी रक्कम मुलाला मुलीच्या आई-वडिलांना द्यावी लागते. त्याला झगडा असे म्हणतात. ती रक्कम कमीत कमी साडे तेरा हजार रुपये असावी अशी पद्धत आहे. समाज पंचांनी ठरवून दिलेली रक्कम जर मुलाने मुलीच्या आई-वडिलांना दिली तर लग्न निश्चित करून त्यांचे लग्न लावून दिले जाते. आदिवासी समाज आजही मागासलेला समजला जातो. तरीही ते मुला-मुलींना आपल्या आवडीचे जोडीदार निवडू देण्यास प्राधान्य देतात. मात्र आपल्या पांढरपेशा समाजात आजही तरुणांना त्यांच्या पसंतीने जोडीदार निवडू दिले जात नाही. आदिवासींकडून आपण हे नक्कीच शिकायला हवे.
माळव्यातील भगोरीया
मध्यप्रदेशातील माळवा भागातल्या आदिवासी भागातही होळी अशीच साजरी केली जाते. हा उत्सव या भागात भगोरिया नावाने ओळखला जातो. या उत्सवासाठी आदिवासी लोक सजून धजून येत असतात. भगोरियाचा शाब्दिक अर्थ आहे, पळून जाऊन लग्न करणे. येथेही मुला-मुलींनी जोडीदार निवडण्याची पद्धत वरीलप्रमाणेच आहे. पूर्वी या उत्सवाच्या वेळी बरीच भांडणे, मारपीट व्हायची. मात्र आता प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेमुळे काही वर्षांपासून कोणतीच अनुचित घटना घडलेली नाही.
भगोरीया आणि आधुनिकता
भगोरीया बाजारातही आता आधुनिकता अवतरली आहे. मुले चांदीच्या दागिन्यांसोबतच मोबाईल बाळगताना दिसतात. ताडी आणि मोहाच्या दारूची जागा आता विदेशी दारूने घेतली आहे. त्याप्रमाणे लस्सी-लिंबूपाण्याऐवजी कोल्ड ड्रिंक दिसते. आदिवासी युवक नृत्य करताना काळा गॉगल घालतात तर तरुणी देखील आधुनिक रंगात रंगलेल्या दिसतात.
शिकलेली तरुण पिढी भगोरियात सामील होताना दिसत नाही. त्यामुळे भगोरिया दरम्यान होणार्या लग्नांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आधुनिकतेच्या रेट्यात ही परंपरा लोप होणार तर नाही ना ही भीती आदिवासी बांधवांना सतावते आहे.
होळी एक आनंददायी सण आहे. मुख्य म्हणजे हा रंगांचा सण आहे. होळीनंतरचे आठ दिवस म्हणजे नुसती धमाल. या काळात सर्वत्र रंगाचे साम्राज्य असते. कुठे केशर, कण्हेर यांच्या कोमल कळ्या फूलून लाजायला लागतात, तर कुठे चंपा, चमेली आणि चांदनी फुलू लागते. सगळीकडे रंगांचे असे मनोरम दृश्य दिसते. निसर्गही रंगात न्हाऊन निघतो. या रंगांनाही महत्त्व आहे. त्याचा संबंध माणसाशी आणि त्याच्या मनाशीही आहे.
निळा:
निळा रंग धैर्याचे प्रतीक आहे. विशाल गगनाचा हलका निळा रंग धैर्याचे प्रतीक म्हणजेच नभाची प्रकृती त्या रंगाचे प्रतीक बनली आहे.
हिरवा:
हिरवा रंग गती आणि चंचलतेचे प्रतीक आहे. नदीच्या हिरव्या रंगाची गती, जोश आणि आवेग यात अभिप्रेत आहे. पाणी रंगहीन असले तरी एकत्रित स्वरूपात नदी हिरव्या रंगाला व्यक्त करते. आणि हा रंग नदीच्या प्रकृतीसारखा जोश आणि गतीला अभिव्यक्त करतो.
लाल:
लाल रंग उत्तेजनेचे प्रतीक आहे. लाल आणि हिरव्या रंगाचे मिश्रणाने जांभळा रंग तयार होतो. हा रंग रहस्यात्मक असल्याने तो त्याचे प्रतीकही बनला आहे.
गुलाबी:
लाल आणि पांढरा या रंगाच्या मिश्रणातून बनलेला हा रंग कोमलतेचे प्रतीक आहे. हा रंग गुलाबी आहे. गुलाबाला कधी कठोर असू शकेल काय? म्हणूनच गुलाबासारखे कोमल म्हटले जाते.
पांढरा:
श्वेत चंद्र, श्वेत ससा, श्वेत हंस....पांढरा रंग म्हटला की हे सगळे समोर येते. पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. मानवाच्या हृदयातही शांती निर्माण करतो. हा रंग बघितल्यानंतर शांततेचा अनुभव येतो.
पिवळा:
पिवळा रंग मीलन आणि आत्मीयतेचे प्रतिक आहे.
काळा:
अंधार भीतीनिदर्शक आहे. आणि अंधाराचा रंग काळा असतो. काळा रंग निराशा, मळकटपणा आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे.
0 comments:
Post a Comment