ईस्टवूडने मान वळवून आढ्याकडे पाहिलं. परत खाली जमिनीकडे, तिथून उजव्या भिंतीकडे. शेवटी काही निश्चयानंच त्याने पुढ्यात ठेवलेल्या आपल्या टाईपरायटरकडे लक्ष केंद्रित केलं. मात्र ठळक टायपात छापलेलं शीर्षक सोडलं तर तो कागद पूर्ण कोरा होता.
’दुसर्या काकडीचे रहस्य’ असं ते नाव होतं. एक लक्षवेधक शीर्षक! 'असल्या नावाच्या गोष्टीत आहे तरी काय? एक काकडी! आणि ती सुद्धा दुसरी? वाचून तरी बघूयात.' असा विचार वाचकाने नक्कीच केला असता, अँथनी ईस्टवूडला वाटलं. या रहस्यकथांच्या बादशहाने एका साध्या काकडी भोवती किती थरारक कथानक गुंफले आहे! वाचक नक्कीच खिळून गेला असता.
इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. कथा कशी असावी हे चार लोकांप्रमाणेच अँथनी ईस्टवूडला चांगलं माहीत असलं तरी गाडं पुढे सरकत नव्हतं. शीर्षक आणि कथानक हे कथेचे मुख्य घटक. ते जमलं तर बाकीचं जमायला काय वेळ लागणार? आणि कधीकधी तर शीर्षक सुचलं की कथा आपोआप सुचत जाते. मात्र यावेळी शीर्षक साधलं तरी कथानकाचा मागमूस नव्हता.
अँथनी ईस्टवूडची नजर पुन्हा एकदा, काहीतरी सुचावं, कथानकाला आकार यावा म्हणून छत, भिंतीवरचा वॉलपेपर वगैरेंवरून रेंगाळत राहिली. मात्र विशेष काही जमत नव्हतं. "नायिकेचं नाव असावं सोनिया" काहीतरी सुरुवात करण्यासाठी अँथनी स्वत:शीच म्हणाला. सोनिया किंवा मग डोलोरस. तिचा वर्ण असेल मोतिया रंगाचा! मात्र आजारपणामुळे पांढराफटक दिसतो तसा नाही. तिचे डोळे! थांग न लागणार्या एखाद्या गूढ जलाशयासारखे. नायकाचं नाव असेल जॉर्ज! किंवा मग जॉन. काहीतरी छोटंसं आणि ब्रिटीश. मग माळ्याचं नाव? अर्थात कथेत माळी तर असायलाच हवा होता. काहीही करून ती काकडी कथेत घुसडण्यासाठी तो बराच उपयोगी पडला असता. त्याला आपण स्कॉटिश बनवूया. एकदम निराश आणि चिडचिड करणारा.
अँथनीची ही पद्धत कधीकधी काम करत असली तरी आज मात्र त्यातून काही निष्पन्न होण्याचे चिन्ह दिसेना. कारण त्याने स्वत: कितीही जॉर्ज, सोनिया आणि त्या माळ्याला नजरेसमोर आणले तरी आपण जरा अंग मोडून हालचाल करावी, इकडेतिकडे फिरावं अशी त्या कुणाचीच इच्छा दिसत नव्हती. "एखादं केळं पण चालून जाईल म्हणा!" अँथनीने मनाशीच विचार केला. किंवा मग सॅलड, एखाददुसरी स्थानिक भाजी वगैरे. स्थानिक म्हणताच एखादा अमीर उमराव, हरवलेले महत्त्वाचे दस्तऐवज वगैरे गोष्टी झरझर त्याच्या नजरेसमोर तरळल्या. पण क्षणभरच! प्रकाशाचा एखादा किरण चमकून गेल्यासारखं त्याला झालं, मात्र मागे काहीच उरलं नाही. अमीर उमरावदेखील आकार घेईना आणि आता तर काकडी, चिडखोर माळी वगैरे सर्वच गोष्टी त्याला विजोड वाटू लागल्या.