skip to main |
skip to sidebar
त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच.
बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र......
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठी' इतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं. शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.
समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो. गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो.
गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीला नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त.
सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.
आपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!
या वेगाची नशाच काही और ! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही...
आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी... खर्व.... निखर्व......रुपये नाहीत, गरजा !
हा 'वेग' खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, 'लाल' सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि.....आणि...
... ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.
गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक....
खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते.
आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता.
वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...
आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.
गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल ?
सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर' ?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ? कोणी दिला होता आधार ? आठवून पहा.
प्लाज्मा टीव्हीने ? EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने? नव्या कोऱ्या गाडीने ? 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने ?
मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ.
तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने !
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थित' म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायको' नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्या' काळात आपल्या frustration चा ‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का ?
Don't get me wrong. माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया.
फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्स' चं स्मरण ठेवूया.
आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.
सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचं' अस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल. त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर !
जाता जाता आणखी एक.
स्वत:लाच एक प्रश्न विचारूया - दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का ‘फर्स्ट गिअर’
0 comments:
Post a Comment