skip to main |
skip to sidebar
एक असंही प्रेम होतं…
.
“अम्या असं कसं झालं रे… नक्की काय म्हणाली ती?”
...“तुला सांगितलं, तेच म्हणाली. आणि त्यानंतर काही बोलण्यासारखं राहिलंही नव्हतं…’
“रागावू नकोस; पण मला पुन्हा एकदा सांगतोस काय झालं ते…’
“जवळपास गेला आठवडा आम्ही फारसे भेटत नव्हतो, हे तुला माहितीच आहे. तेव्हाही न भेटण्याचं तसं विशेष काही कारण नव्हतं; पण भेट घडत नव्हती हे खरं… काल तिचा फोन आला. आज नक्की भेटूया म्हणाली. मी नेहमीप्रमाणे तिला खेचू लागलो,
तर ती खूप सिरीअस वाटली. आवाजावरून रडल्यासारखी वाटत होती. मी कारण विचारलं तिला… तर काहीच बोलली नाही… भेटल्यावर बोलू म्हणाली.’
“मग?’
“मग काय आम्ही भेटलो आज. काहीतरी गडबड आहे… काहीतरी विचित्र घडलंय किंवा घडणार आहे असं मला सारखं वाटत होतं… आज मनूला भेटताना नेहमीसारखं मस्त नव्हतं वाटत… म्हणजे इतर वेळी आम्ही भेटणार म्हटल्यावर जसं वाटायचं तसं नव्हतं वाटत.
तुला सांगता येत नाहीये आत्ता… म्हणजे काय वाटत होतं ते शब्दांत नाही सांगता येत…; पण ते काहीतरी विचित्र फिलिंग होतं…’
“आम्ही आपल्या नेहमीच्या जागी भेटलो. तिचा चेहरा मलूल दिसत होता. फारसं बोलली नाही ती. मी विचारलं तिला, “काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय नक्की?’ तर ती म्हणाली, “तेच बोलायला आलोय आपण; पण आधी काहीतरी खाऊन घे… नेहमीप्रमाणे उपाशीच असशील…’
मग आम्ही खायला मागवलं; पण ती नीट खात नव्हती. नेहमीप्रमाणे माझ्या डिशमधला घासही घेतला नाही तिनं… अन्न चिवडत बसली होती फक्त… तुला गंमत सांगतो, आज यांचं काहीतरी बिनसलंय हे आमच्या नेहमीच्या वेटरच्याही लक्षात आलं… त्यानं तसं विचारलं सुद्धा…
माझं खाणं झाल्यावर ती म्हटली, “चल पुलावर जाऊ…’
काय झालंय हे माझ्या लक्षात येत नव्हतं आणि ती काही बोलायला तयार नव्हती… आम्ही पुलावर जायला निघालो. आज बिल तिनं दिलं… तुला ठाऊक आहे, नेहमी बिल मीच देतो. पण आज तिनं मला अडवलं आणि पैसे काढून दिले.
आम्ही पुलाकडे जायला निघालो. ती गाडीवर मागे बसली होती ना, तेव्हाही नेहमीसारखी नव्हती बसली. माझ्या खांद्यावरच्या तिच्या हाताची थरथर मला जाणवत होती… माझ्यासमोरचं प्रश्नचिन्ह वाढतच होतं…
आम्ही पुलावर पोचलो. मी गाडी लावली तिनं वर पाहिलं, तर डोळ्यात पाणी होतं तिच्या…
तिनं पर्स उघडली आणि मला एक पासबुक दिलं. “हे तपासून घे,’ म्हणाली. तुला माहीत नाही… मी तिला प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचो. तिनं एक अकाउंट उघडलं होतं, त्यात ती ते भरायची. त्यात स्वत:चीही भर घालायची. आमच्या संसारासाठीची बचत होती ती!
ते पासबुक हातात घेतलं आणि विचारलं, “काय भानगड आहे ही? मी तुला आजपर्यंत त्याबाबत कधी विचारलंय का? आणि आज एकदम हे काय?’
तिनं माझा हात हातात घेतला… तिचा हात थरथरत होता. मी त्यावर थोपटलं… पाच-दहा मिनिटं आम्ही तसेच स्वस्थ बसून राहिलो. मी तिला थोपटत होतो. तिनं मला विचारलं, “तुझा विश्वास आहे माझ्यावर?’
मी म्हणालो, “मग कोणावर ठेवू?’
ती म्हणाली, “आपण लग्न नको करायला… का ते विचारू नकोस. मला नाही सांगता येणार; पण आपण लग्न नको करायला…’
ती काय म्हणते आहे, हे मला कळलंच नाही कितीतरी वेळ… ती माझ्याशिवाय आणि मी तिच्याशिवाय कसे जगू शकू..?
अक्षरश: काही समजत नव्हतं. कितीतरी वेळ आम्ही तसेच सुन्न बसून होतो नदीकडे बघत आणि ती नदी आमच्या दोघांच्या डोळ्यातून वाहात होती. बराच अंधार पडल्यावर आम्ही उठलो. तिला घरी सोडलं… आणि मी इथं तुझ्याकडे आलो…’
“अम्या, असं कसं होईल रे… ती का म्हणाली असं? तू विचारलं नाहीस तिला? मी विचारू का?’
“नको. तू काही बोलू नकोस. मीही कधीच विचारणार नाही. माझा विश्वास आहे तिच्यावर काहीतरी नक्की घडलंय…’
“अरे पण आपल्या ग्रुपला काय सांगायचं आता? आणि तू तुझ्या घरी काय सांगशील?’
राहुलच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या मनःस्थितीत अम्या नव्हताच. तो केव्हाच हरवून गेला होता. अम्या हरवला होता
त्यांची ती शेवटची भेट होती,
या साऱ्या गोष्टी त्या दोघांच्या घरीही माहीत होत्या. म्हणूनच अम्याची तक्रार मनूकडे आणि मनूची अम्याकडे व्हायची. दोघांनी घरी स्पष्ट सांगितलं नसलं, तरी त्यांना कळत नव्हतं असं नाही. आणि त्यांचीही ना नव्हतीच! लहानपणापासून पाहात आले होते ते दोघांना… अगदी “मेड फॉर इच अदर…’
मग आता हे अचानक झालं काय, हे राहुलला समजेच ना… अर्थात जिथं अम्यालाच काही समजलं नव्हतं, तिथं राहुलला काय समजणार होतं? तरी राहुल विचार करतच होता; कारण तिच्या आणि त्याच्या अशा दोघांच्याही ग्रुपला त्यालाच उत्तर द्यायचं होतं.
दोघांचा बेस्ट फ्रेंड होता तो.
राहुलपुढे हा एकच प्रश्न सतत उभा राहात होता, “हे अचानक काय झालं?’
दोन महिन्यातच मनूचं लग्न झालं. अम्या घरचं कार्य असल्यासारखा राबला त्या लग्नात. राहुलला, त्याच्या ग्रुपला, एवढंच काय पण तिच्या घरच्यांनाही बघवत नव्हतं त्याच्याकडे. तो आणि मनू एकमेकांसमोर यायचं टाळत होते. तसे आले असते, तर बांध नक्कीच फुटला असता… लग्न लागलं.
पंगती बसल्या. सगळा ग्रुप शेवटच्या पंगतीत बसणार होता. तेव्हा अम्या बाहेर सटकला. पंगत उठली, तरी हा काही दिसला नाही कोणाला. मनूची नजरही त्यालाच शोधत होती. तो उपाशी राहिलेला तिला अजिबात चालायचा नाही… पण अम्या उगवला तो थेट पाठवणीच्या वेळी. अर्थात जेवला का नाहीस,
हे विचारण्याची कोणाचीही हिंमत नव्हती, मनूचीदेखील… पाठवणीच्यावेळी मनू त्याच्यासमोर आली. नवऱ्याशी ओळख करून दिली. हा अम्या. माझा सगळ्यात जवळचा मित्र… त्यावेळी दोघांच्याही कंठात हुंदका अडला होता… फक्त दोघांच्याच नाही… त्यांना ओळखणाऱ्या साऱ्यांच्याच….
अम्याला सावरायला काही दिवस लागले. मनूला तेवढा तरी वेळ मिळाला की नाही ठाऊक नाही… मनू हनिमूनहून परत आली. आल्याआल्या तिनं पहिला फोन अम्यालाच लावला. तो सापडला नाही म्हणून राहुलला. अर्थात लग्नानंतर ती राहुलच्या संपर्कात होतीच. तिला अम्याची काळजी वाटत होती…
पण अम्या काही तिला भेटायला तयार नव्हता. तिनंही त्याला वेळ दिला. शेवटी तिच्या लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनंतर ते भेटले… त्याच नेहमीच्या जागी… नंतरही ते भेटत राहिले. अम्यासाठी चांगली मुलगी शोधण्याचा तिनं आता चंगच बांधला होता. त्याला कोणती मुलगी शोभेल,
हे तिच्याशिवाय दुसरं कोण सांगू शकणार होतं?
पुढे अम्याही निवळला. त्याचंही लग्न झालं. आज अम्या आणि मनू आपापल्या संसारात रमले आहेत. दोघांनाही पोरंबाळं आहेत. भेटीगाठी आता खूपच कमी झाल्यात
एवढ्या कथेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, की मी या साऱ्याचा साक्षीदार आहे. हे सारं माझ्यासमोर घडलंय… मी ते माझ्या परीनं अनुभवलंय. मागे संदीप खरेच्या कार्यक्रमाला गेलो होतो… तेव्हा एक गाणं ऐकलं
कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे, अपुले अंतर…
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी, माझ्या नंतर…
या दोघांना किती चपखल लागू होतं नाही…
ही गोष्ट अनेक दिवस मनात होती. सांगावीशी वाटत होती. अम्या आणि मनूच्या सफल न झालेल्या (खरंतर असं कसं म्हणणार? लग्नात परिवर्तन न झालेल्या, असं म्हणता येईल फारतर…) प्रेमाची ही कहाणी आहे. कोणालातरी वाटेल, की ते दोघं आपापल्या जोडिदारांना फसवत असतील
आज इतक्या दिवसांनी मला हे सांगावंसं का वाटलं ठाऊक आहे? ते दोघं पहिल्यांदा भेटले, त्याला नुकतीच 18 वर्षं पूर्ण झाली. आम्ही सारे, म्हणजे आमचा ग्रुप त्या दिवशी भेटतो.
अगदी पहिल्यापासूनचा रिवाज आहे हा.नेहमीप्रमाणे सारं वातावरण होतं. जाताना मात्र ती आमचीही नजर चुकवून चटकन निघून गेली… डोळे पुसत होती,
असं प्राजू म्हणाली… इकडं अम्याचेही डोळे पाणावले होते… राहुलनं सांगितल्यामुळे मलाही माहीत होतं, म्हणून त्याला सहज विचारलं, “अम्या, त्या पासबुकाचं काय झालं रे?’ अम्या म्हणाला, “मी अजूनही तिच्याकडे पैसे पाठवतो.
तीदेखील तिची भर घालून ते पैसे त्याच अकाउंटमध्ये ठेवते… अरे आमचं झालं नाही म्हणून काय झालं… आम्ही ठरवलंय पैसे साठवत राहायचे आणि एखाद्याचं पैशांमुळे अडत असेल, तर त्याला न बोलता देऊन टाकायचे… तिच्या एका मैत्रिणीला अडचण होती,
तेव्हा आम्ही त्या कपलला ते पैसे देऊन टाकले. आमचा नाही झाला संसार… पण दुसऱ्याचा उभा राहू शकला, याचा आनंद आहेच की!!
1 comments:
खुपच छान
Post a Comment