आज मी अशीच एक कथा सांगणार आहे. आजपर्यंत माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या सर्व कथांमधे या कथेमधल्या विचित्र आणि धक्कादायक घटनाक्रमासारखे प्रसंग सापडणार नाहीत.
१८८७ सालच्या सप्टेंबर महिन्याचे शेवटचे दिवस होते. शरदसंपातामुळे निर्मांण होणाऱ्या वादळाने भयंकर उग्र रूप धारण केले होते. पूर्ण दिवसभर गरजणाऱ्या वाऱ्याने आणि अक्षरशः कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने लंडनच्या भर शहरी वस्तीत राहणाऱ्या लोकांनाही आपल्या शहरी कोशातून बाहेर येऊन निसर्गाच्या बलवान पंचमहाभूतांच्या अस्तित्त्वाची दखल घेण्यास भाग पाडले होते. खवळलेली महाभूते एखाद्या बंदिस्त आणि संतापलेल्या सिंहासारखी गरजत होती अंगावर चालून येत होती.वादळाचा वेग दर क्षणाला वाढत होता आणि पाऊस त्याला साथ देत होता. फायरप्लेसच्या एका बाजूला शेरलॉक होम्स आपल्याच तंद्रीत त्याच्या त्या डकवबुकातील नोंदी तपशीलवार लावत बसला होता आणि मी क्लार्क रसेलच्या सागरी कथांमधे बुडून गेलो होतो. वादळाची गर्जना समुद्राच्या गंभीर गाजेशी आणि पावसाचा मारा लाटांच्या सळसळीशी एकरूप होत असल्यामुळे मोठी झकास वातावरणनिर्मिती होत होती. माझी बायको तिच्या माहेरी गेली होती आणि काही दिवसांकरिता मी पुन्हा एकदा माझ्या बेकर स्ट्रीटवरच्या घरात मुक्काम ठोकला होता.