Demo Site

Sunday, May 8, 2011

अक्षय्य तृतीया

ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.

१. अर्थ : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणार्‍या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे

२. मृत्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टी ठेवणार्‍या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती‍ होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.

३. मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)

महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. (निदान पूर्वीतरी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापीक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)

४. वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. - ब्रह्मतत्त्व (८.५.२००५, सायंकाळी ४.४४)

५. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीविष्णूसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्‍यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी विष्णूसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्‍तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. नुसत्या लक्ष्मीदेवीची कृपा आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ती आहे. जेथे विष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ती कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल? म्हणून कोणत्याही रूपातील लक्ष्मी पूजनाच्या वेळी विष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर लक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो. - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता विक्रमसिंह पाटील यांच्या माध्यमातून, ८.५.२००५, सायंकाळी ४.४५)


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे

* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
* ब्राह्मण भोजन घालावे.
* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.
* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.


शास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीया

* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.
* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.
* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.
* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.


अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य

* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
* शुभ कार्ये या दिवशी होतात.
* श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.
विस्तृत माहिती

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers