Friday, September 2, 2011
श्री गणेशाची पंचोपचारपूजा
प्रत्यक्ष पूजाविधीत पूजेच्या
प्रारंभी करावयाची प्रार्थना
‘हे श्री सिद्धिविनायका, तुझी पूजा माझ्याकडून भावपूर्ण होऊ दे. पूजा करत
असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहू दे. तू प्रत्यक्ष
माझ्यासमोर आसनस्थ झाला आहेस आणि मी तुझी पूजा करत आहे, असा माझा भाव सतत
असू दे. पूजेतील संभाव्य विघ्ने दूर होऊ देत. पूजेतील चैतन्य मला आणि सर्व
उपस्थितांना मिळू दे.’
कोणत्याही देवतेची पूजा करतांना त्याचे आवाहन करणे, योग्य त्या
उपचारांसह स्थापना आणि पूजा करणे आवश्यक असते. हे करतांना करावयाचे विधी,
त्यांतील मंत्र आणि त्यांचा अर्थ माहीत असल्यास पूजकाकडून कृती अधिक
भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकर्षित
होऊन पूजकास अधिक लाभ होतो. याच उद्देशाने गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची
पंचोपचार पूजा येथे देत आहोत. शास्त्रानुसार या पद्धतीने दिवसातून तीन वेळा
आणि ज्यांना तिन्ही वेळा पूजा करणे शक्य नसेल, त्यांनी सकाळी अन् सायंकाळी
पूजा करावी.
पुढील सर्व विधी करतांना प्रत्येक विधीचा विशिष्ट मंत्र म्हणतात.
१. आचमन : याने अंतर्शुद्धी होते.
२. देशकाल : देशकालाचा उच्चार करावा.
३. संकल्प : संकल्पाशिवाय कोणत्याही विधीचे फळ मिळणे कठीण असते.
४. आसनशुद्धी : यासाठी स्वतःच्या आसनास स्पर्श करून नमस्कार करावा.
५. पुरुषसूक्त न्यास : पुरुषसूक्त म्हणत देवतेची शरीरातील हृदय,
मस्तक, शेंडी, चेहरा, दोन्ही डोळे व भ्रूमध्य या ठिकाणी स्थापना करावी.
यामुळे सात्त्विकता वाढायला मदत होते.
६. श्री गणपतिपूजन : नारळावर किंवा सुपारीवर श्री गणपतीचे आवाहन करून त्याचे पूजन करावे.
७. कलशपूजा : कलशात सर्व देवता, समुद्र, पवित्र नद्या इत्यादींचे
आवाहन करून कलशास गंध, अक्षता व फुले वहावीत. हे सात्त्विक पाणी पूजेसाठी
वापरतात.
८. शंखपूजा : शंख धुऊन त्यात पाणी भरावे. मग शंखाला गंध व पांढरे फूल वहावे. शंखाला अक्षता आणि तुळशीपत्र वाहू नये.
९. घंटापूजा : देवांचे स्वागत करण्यासाठी व राक्षसांनी निघून जावे
यासाठी घंटानाद करावा. घंटा धुऊन डाव्या हाताला ठेवून तिला गंध, अक्षता आणि
फुले वहावीत.
१०. दीपपूजा : दिव्याला गंध व फुले वहावीत.
११. श्री गणपतीच्या वरच्या बाजूला बांधलेल्या माटोळीची गंध, फूल आणि
अक्षता घालून पूजा करावी. (कच्ची फळे, कंदमुळे इत्यादी एकत्र बांधतात
त्याला गोव्यामध्ये ‘माटोळी’ असे म्हणतात.)
१२. पवित्रीकरण : शंखातील पाणी उजव्या हातावर घेऊन ते स्वतःवर व पूजासाहित्यावर शिंपडावे.
१३. द्वारपूजा : हातात फुले आणि अक्षता घेऊन ती चारही दिशांना टाकावी. ही दिक्पालपूजाच होय.
१४.प्राणप्रतिष्ठा : देवाच्या मूर्तीच्या हृदयावर उजवा हात ठेवून मंत्र म्हणावा.
श्री गणेश चतुर्थीची मूर्ती किंवा नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यासाठी
प्राणप्रतिष्ठा करतात. नेहमीच्या पूजेत ही नसते; कारण दररोजच्या पूजेने
तिच्यात ईश्वरी तत्त्व आलेले असतेच.
१५. ध्यान : ‘वक्रतुंड महाकाय०’ हा मंत्र म्हणावा.
१६. आवाहन : आमंत्रणाच्या वेळीr ‘ॐ सहस्रशीर्षा पुरुषः०’ हा मंत्र
उच्चारून अक्षता वहाव्यात. अक्षतांमुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत लगेच
येण्यास मदत होते.
१७. आसन : आसनाप्रीत्यर्थ अक्षता वहाव्यात.
१८. पाद्य : पाय धुण्यासाठी फुलाने / दुर्वांनी मूर्तीच्या पायावर पाणी शिंपडावे.
१९. अर्घ्य : पळीत पाणी घेऊन त्यामध्ये चंदन-गंध कालवावे आणि ते
पाणी फुलाने गणपतीच्या अंगावर शिंपडावे. गुलाबपाणी शिंपडून स्वागत करतात,
तसे हे आहे.
२०. आचमन : देव आचमन करीत आहे, असे समजून पळीत पाणी घेऊन देवाला वहावे.
२१. मलापकर्षस्नान : देवाला पळीने पाणी घालूनस्नान घालावे.
२२. पंचामृतस्नान : प्रथम पंचामृताने (दूध, दही, तूप, मध आणि साखर
या क्रमाने) स्नान घालावे. प्रत्येक वेळी पळीत पाणी घेऊन त्याने स्नान
घालावे. त्यानंतर आचमन म्हणून तीन पळ्या पाणी घालावे आणि शेवटी गंध, अक्षता
आणि फुले वहावीत.
२३. पूर्वपूजा : गंध, अक्षता, फूल (गणपतीला तांबडे फूल), धूप व दीप
यांनी पूजा करून शिल्लक राहिलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. त्यासाठी
मूर्तीच्या समोर पाण्याचे मंडल करून त्यावर पंचामृत ठेवावे. (मंडलामुळे
देवता सोडूनइतर शक्ती नैवेद्य घ्यायला येत नाहीत.) देवाला नैवेद्य अर्पण
करण्याच्या दोन पद्धती आहेत.
पद्धत १ - कर्मकांडाच्या स्तरावरील : नैवेद्यावर तुळशीच्या दोन
पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे देवाच्या
चरणी वहावे. त्यानंतर `प्राणाय स्वाहा.....' इत्यादी मंत्र म्हणत उजव्या
हाताच्या पाचही बोटांच्या टोकाने नैवेद्याचा वास देवाकडे न्यावा. यामागील
शास्त्र असे आहे - ‘पाचही बोटांतून पंचतत्त्वाच्या लहरी प्रक्षेपित होण्यास
मदत झाल्याने आवश्यकतेप्रमाणे पंचतत्त्वाशी संबंधित ब्रह्मांडातील त्या
त्या देवतांच्या लहरी आपल्याला एकाच वेळी मिळण्यास मदत होते.’ (सनातनच्या
साधिका सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, २.१.२००५,
रात्री १०.३७)
पद्धत २ - भावाच्या स्तरावरील : नैवेद्यावर तुळशीच्या दोन
पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे व दुसरे देवाच्या
चरणी वहावे. त्यानंतर हात जोडून `प्राणाय स्वाहा....' इत्यादी मंत्राने
देवाला नैवेद्य समर्पित करावा.
पूजेतील शेवटचा भाग म्हणून हात व तोंड धुण्याच्या क्रियेच्या संदर्भात
तीन वेळा ताम्हणात हातावरून पाणी सोडावे. गंधात फूल बुडवून ते गणपतीला
वहावे. देवापुढे विडा ठेवावा व त्यावर पाणी सोडावे. फुले वाहून नमस्कार
करावा व ताम्हणात पाणी सोडावे.
२४. अभिषेक : पूर्वपूजेनंतर अभिषेक केला जातो. अथर्वशीर्षाने किंवा
ब्रह्मणस्पतिसूक्ताने अभिषेक करावा. त्या वेळी दूर्वा किंवा तांबड्या
फुलाने मूर्तीवर पाणी शिंपडावे.
तांबड्या फुलाने मूर्तीवर पाणी शिंपडावे.
२५. वस्त्रार्पण : दोन तांबडी वस्त्रे अर्पण करावीत.
२६. यज्ञोपवीत : जानवे अर्पण करावे.
२७. विलेपन : करंगळीजवळच्या बोटाने (अनामिकेने) गंध लावावे.
२८. अक्षतार्पण : अक्षता वहाव्यात.
२९. सिंदूरार्पण : शेंदूर वहावा.
३०. अन्य परिमलद्रव्य : हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध वगैरे वहावे.
३१. पुष्प : तांबडे फूल वहावे.
३२. अंगपूजा : या पूजेत पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवावर अक्षता किंवा फुले वहातात.
३३. नामपूजा : दूर्वा तांबड्या गंधात बुडवून एका नावाबरोबर एक याप्रमाणे वहाव्यात.
३४. पत्रपूजा : एकेका प्रकारच्या पानाबरोबर एकेक विशिष्ट नाव घेत
पत्री पायावर वहावी. ‘श्री गणेशाची पुढील एकवीस पत्री वाहून पूजा करतात -
मधुमालती (मालती), माका (भृंगराज), बेल, पांढर्या दूर्वा, बदरी (बोर),
धोतरा, तुळस, शमी, आघाडा, बृहती (डोरली), करवीर (कण्हेर), रुई,
अर्जुनसादडा, विष्णुकांत, डाळिंब, देवदार, मरुबक (मरवा), पिंपळ, जाई, केवडा
(केतकी) व अगस्ती (हादगा). वास्तवात श्री गणेश चतुर्थीखेरीज तुळशीची पाने
गणपतीला कधीही वहात नाहीत.’
३५. पुष्पपूजा : एकेका प्रकारच्या फुलाबरोबर एकेक विशिष्ट नाव घेत देवाकडे देठ करून फुले वहावीत.
३६. धूपदर्शन : धूप आणि उदबत्ती ओवाळावी.
३७. दीपदर्शन : निरांजन ओवाळावे.
३८. नैवेद्य : पूर्वपूजेत सांगितल्याप्रमाणे नैवेद्य दाखवावा.
३९. तांबूल : देवापुढे विडा ठेवून त्यावर पाणी सोडावे.
४०. दक्षिणा : दक्षिणा विड्यावर ठेवून त्यावर पाणी सोडावे.
४१. फलसमर्पण : देवाकडे शेंडी करून देवासमोर नारळ ठेवावा. त्यावर
पाणी सोडावे. नारळ नसल्यास त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध होणारे फळ वापरावे.
(नारळाची शेंडी देवाकडे केल्याने देवातील शक्ती नारळात येते. नंतर तो नारळ
प्रसाद म्हणून भक्त खातात, म्हणजे ती शक्ती भक्तांना मिळते.)
४२. आरती : आरत्या म्हणाव्यात.
४३. प्रार्थना : ‘घालीन लोटांगण०’ ही प्रार्थना म्हणावी.
४४. मंत्रपुष्पांजली : ‘ॐ यज्ञेन यज्ञमयजंत०’ ही मंत्ररूपी पुष्पांजली अर्पण करावी.
४५. प्रदक्षिणा आणि नमस्कार : स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात व पूजा करणार्याने साष्टांग नमस्कार घालावा.
४६. प्रार्थना : ‘आवाहनं न जानामि०’ या मंत्राने प्रार्थना करून तळहातावर पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे.
४७. दर्शनार्थ्यांचा नमस्कार : आरती आणि मंत्रपुष्पांजलीला उपस्थित
असलेले, तसेच दिवसभरात कधीही दर्शनाला येणारे, यांनी श्री गणपतीला फुले आणि
दूर्वा वाहून साष्टांग नमस्कार करावा. घरच्यांनी त्यांना प्रसाद द्यावा.
४८. तीर्थप्राशन : ‘अकालमृत्युहरणं०’ हा मंत्र म्हणून तीर्थ प्राशन करावे.
मध्यपूजाविधी : गणपति घरी असेपर्यंत दररोज सकाळी व संध्याकाळी
प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी आणि शेवटी
आरत्या व मंत्रपुष्प म्हणावे.
उत्तरपूजा (उत्तर आवाहन)
अ. विधी : गणपतीच्या विसर्जनापूर्वी ही पूजा करायची असते. विशिष्ट
मंत्र म्हणून पुढे दिल्याप्रमाणे पूजा करावी - १. आचमन, २. संकल्प, ३.
चंदनार्पण, ४. अक्षतार्पण, ५. पुष्पार्पण, ६. हरिद्रा (हळद)-कुंकूमार्पण,
७. दूर्वार्पण, ८. धूप-दीप दर्शन व ९. नैवेद्य. (पाठभेद : चंदनाच्याच वेळी
हळद व कुंकू वहातात.)
यानंतर आरती करून मंत्रपुष्पांजली समर्पावी. सर्वांनी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या व मूर्ती उजव्या हाताने हालवावी.
आ. महत्त्व : पूजेमुळे पूजा करणारा गणेशलहरींनी संपृक्त व्हावा, हा
पूजेचा उद्देश असतो. संपृक्तता वाढविण्यातला शेवटचा टप्पा म्हणजे
उत्तरपूजा. उत्तरपूजेच्या वेळी मूर्तीत असलेली सर्व पवित्रके एकदम बाहेर
पडतात. उत्तरपूजा झाल्यावर मूर्ती स्थानापासून थोडी हालवितात. त्यामुळे
उरलीसुरली पवित्रके मूर्तीपासून दूर जातात, म्हणून ती पूजा करणार्याला
मिळू शकतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment