Friday, September 23, 2011
ज्ञानयोग
ज्ञानाच्या साधनेने आजचा अवाढव्य विश्वविस्तार आपण अनुभवत
आहोत. अर्थात याचे बरेवाईट परिणाम भोगतो आहोत. आदिमानवाच्या काळापासून
ज्ञानोपासना सुरू आहे. अॅडमनेही ज्ञानाचे फळ चाखले. ते त्याला पचले नाही,
परंतु माणसाने यातून पचनशक्ती वाढवली. ज्वलंत विस्तवही त्याने पचविला.
त्याची ओळख करून घेतली. त्याच्या साहाय्याने उपजीविकेची साधने त्याने गोळा
केली. अग्नीचे ज्ञान हा मानवाच्या प्रगतीतला मौलिक टप्पा होता. ‘अग्नीमिळे
पुरोहितम्’ या प्रख्यात वैदिक ऋचेतून अग्नीची देव म्हणून स्तुती केलेली
आहे.
‘‘तुम्ही स्वत:ला ओळखा’’ हे खरे ज्ञान आहे. तेच कठीण आहे. महर्षी
याज्ञवल्क्य म्हणतात, ‘‘न वा अरे सर्वस्य कामाय र्सव प्रियं भवति।
आत्मनस्तु कामाय र्सव प्रियं भवति।।’’ सर्व व्यापक परमेश्वराचा विलास
म्हणजे हे जग आहे, याची जाणीव होणे हे खरे ज्ञान आहे. हे ज्ञान एकदा झाले,
की भूतमात्रात परस्पर जिवाचे मैत्र जडते. आपण विश्वाचे घटक आहोत.
विश्वात्म्याचे अंश आहोत ही जाणीव ज्ञानयोगाची सूचक आहे. गुरुदेव
रवींद्रनाथ टागोरांचे उद्गार इथे स्मरतात. ते म्हणतात, ‘‘ईश्वरा, माझ्या
वागणुकीत तू प्रकट हो.’’ जगातली दु:खे, मत्सर, हेवेदावे अज्ञानमूलक आहेत.
कार्यकारणभावाच्या यथार्थ ज्ञानाने हे समजावे. सर्व कर्माचा शेवट ज्ञानात
होतो. ‘ज्ञानी माझा आत्मा आहे’ असे भगवान गीतेत सांगतात. सारे योग शेवटी
ज्ञानयोगात मिळतात. ईश्वरी ज्ञान आणि साक्षात्कार यात येतो. ज्ञानयोगाची ही
महानता मान्य करून एक प्रश्न पडतो. ज्ञानाने अनेक थोरामोठय़ांना जगापासून,
व्यावहारिक जीवनापासून अलग-अलिप्त ठेवले. यामुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग
जगाला व्हावा तसा झाला नाही. (काही सन्मान्य अपवाद सोडा.) योगी अरविंदांनी
ज्ञानयोगाला जगाच्या माजघरात आणले. त्याच्या सामर्थ्यांतून विश्वाला
पूर्णयोगी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment