Thursday, September 15, 2011
शिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)
शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ’शिवछत्रपतीचे चरित्र’ ही बखर. ह्या बखरीत केलेल्या उल्लेखानुसार हा ग्रंथ शालिवाहन शके १६१६ (इ०स० १६९४) या वर्षाच्या सुमारास (म्हणजे महाराजांच्या मृत्युनंतर केवळ १४ वर्षांनी) लिहिला गेला असे दिसते. याच्या सत्यासत्यतेबद्दल अर्थातच आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण तरीही याचे वाचन सुरस ठरावे.
शेवटच्या ’राज्याची मोजदाद’ या प्रकरणात फारच माहितीपूर्ण व सुरस तपशील सापडतो. कारखाने, महाल, खजिना (सोने-नाणे, कापड-जिन्नस इ०), घोडे, पागा, त्यावेळचे सरदार, शिलेदार, सुभेदार, हत्ती, जहाजे, आरमार, सरदार, गड-कोट-जंजिरे (जुने ५०, शिवाजी राजांनी वसवलेले १११ व कर्नाटक प्रांतातील काबीज केलेले ७९ असे एकूण २४०).
मृणाल विद्याधर भिडे ह्यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक टंकन करून मराठीप्रेमींसाठी उपलब्ध करून दिलेला हा ग्रंथ आपले मित्र श्री० मिलिंद पंडित (सदाशिव पेठ, पुणे) ह्यांनी आपल्याकरिता पाठवलेला आहे.
संपूर्ण बखर खालील दुव्यावर वाचण्यास उपलब्ध आहे.
टीप:
१. प्रस्तुत ग्रंथात शुद्धलेखनाचे बरेच दोष आहेत. काही ठिकाणी मराठी शुद्धलेखनाच्या आधुनिक नियमांप्रमाणेही लेखन केलेले दिसते. पण त्या सर्व चुका टंकनाच्या असून तेवढ्यावरून मूळ बखरीच्या सत्यासत्यतेबद्दल संशय घेता येणार नाही असे वाटते.
२. प्रस्तुत ग्रंथात पृष्ठ क्रमांक ७ वर खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
“त्याचे भेटीस शिमग्याचे सणास पोस्त मागावयास म्हणून गेले.”
आता गेल्या पाऊणशे-शंभर वर्षांतील माहितीप्रमाणे सामान्यपणे “टपाल (पोस्ट) खात्यातील कर्मचारी दिवाळीच्या आसपास घरोघरी जे बक्षिस मागतात ते पोस्त” असाच समज आहे. त्यामुळे पोस्त हा शब्द अलिकडला म्हणजे इंग्रजांनी भारतात टपालसेवा सुरू केल्यानंतरचा असावा असेच कोणाला वाटेल. त्यामुळे या मुद्द्यावरून ग्रंथ नकली आहे असेही वाटण्याची शक्यता आहे. पण वस्तुतः पोस्त हा शब्द बराच जुना आहे. त्याचा उल्लेख मोल्स्वर्थ तसेच दाते-कर्वे यांच्या शब्दकोशांत आहे. त्यांच्या नोंदीप्रमाणे हा शब्द संस्कृतातील पुष्टि या शब्दावरून आला असून त्याचा अर्थ “नोकरांचाकरांस सणावारी, विशेषतः होळीच्या सणानिमित्त दिलेला बक्षिसीचा पैसा किंवा दारू. नेहमीपेक्षा जास्त किंवा अधिक दक्षतेने काम करण्याबद्दल दिलेला पैसा; चिरीमिरी” असा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment