Demo Site

Monday, July 30, 2012



किल्ल्याची ऊंची : 2500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: तळ कोकण
जिल्हा : कोल्हापूर
श्रेणी : मध्यम

महाराष्ट्राचे ‘‘चेरापूंजी’’ म्हणून ओळखल्या जाणार्या गगनबावडा गावात गगनगड उभा आहे. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नाथपंथीय गैबीनाथांचे हे मुळ स्थान, १९ व्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रकाश झोतात आले. गगनगिरी महाराजांच्या मठामुळे आजही गडावर लोकांचा राबता आहे.

इतिहास : गगनगड उभारणीचे श्रेय शिलाहार शाखेतील अखेरचा राजा दुसरा भोज याच्याकडे जाते. राजा भोज याने इ.स ११७५ ते १२०९ पर्यंत राज्य केले पन्हाळा ही त्यांची राजधानी होती. कोल्हापूर परीसरात त्याने १५ किल्ले बांधले. सिंधण यादवने १२०९ मध्ये शिलाहार राजा भोज याचा पराभव केल्यावर गगनगड त्यांच्या ताब्यात गेला. इ.स १३१० मध्ये देवगिरीचा पाडाव झाल्यावर गड दिल्लीच्या अधिपत्याखाली आला. बहामनी राज्याच्या फाळणीनंतर गगनगड आदिलशहाच्या ताब्यात आला. इ.स १६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला.
पहाण्याची ठिकाणे :गगनगड सह्याद्री पठाराच्या टोकावर असल्यामुळे त्याच्या पश्चिमेकडे कोकणात उतरणार्या खोल दर्या दिसतात. गडाच्या अर्ध्यां उंचीपर्यंत गाडी रस्ता झालेला आहे. गाडीतळापासून गडावर जाण्यासाठी पायर्या आहेत. पायर्यांच्या सुरुवातीला म्हसोबाचे मंदिर आहे. त्यात रेडयाची प्रतिमा आहे. पायर्या चढून वर गेल्यावर डाव्या हाताला समोरच दगडातील एक प्रशस्त नैसर्गिक गुहा आहे. गगनगिरी महाराजांचे या गडावर वास्तव्य होते, त्यांनी याच गुहेत तपसाधना केली होती. त्यामुळे या गुहेत त्यांचे मंदिर बनवण्यात आले आहे. गुहेच्या बाहेर कातळात कोरलेली भव्य हनुमंताची प्रतिमा आहे. त्याच्या बाजूला राम, लक्ष्मण, सीता व शंकराची प्रतिमा आहे. गुहेसमोर मठाची कचेरी व भोजन कक्ष आहे. गुहेपासून पायर्यांच्या मार्गाने वर चढत गेल्यावर भक्तनिवास व नवग्रह मंदिर आहे. मंदिराजवळील बुरुजावर २ तोफा आहेत. भक्तनिवासापासून वर चढत गेल्यावर आपण मोकळ्या पठारावर प्रवेश करतो. पठारावर डाव्या बाजूस संगमरवरी देऊळ(ध्यानमंदिर) आहे. उजव्याबाजूस शंकराचे पूरातन मंदीर आहे. या मंदीरासमोर उभे राहीले की किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर (बालेकिल्ल्यावर) मशिदीसारखी इमारत दिसते. ती आहे गैबी पिराची कबर किंवा गैबीनाथाची समाधी.गगनगडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी शंकर मंदिराजवळून खोदीव पायर्यांचा मार्ग आहे. या मार्गाने आपण १० मिनीटात समाधी पाशी पोहोचतो. तेथून जवळच विठ्ठलाई देवीचे मंदिर व पाण्याची विहिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूस जुन्या घरांचे चौथरे व तटबंदीचे अवशेष दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा : गगनबावडा गाव कोल्हापूरहून ५५ कि.मी वर आहे. कोल्हापूरहून येथे येण्यासाठी नियमीत बससेवा आहे. याशिवाय कोकणातील वैभववाडी, कणकवली येथून गगनबावडा ५० किमी अंतरावर आहे. कोकणातून कोल्हापूरला जाणार्या बसेस गगनबावडा स्थानकात थांबतात. तिथून २ कि.मी ची पक्की सडक गगनगडापर्यंत जाते. गगनगडाच्या जवळजवळ अर्ध्या उंचीपर्यंत गाडीने जाता येते. गाडी तळापासून पायर्यांनी गडावर जाण्यास १० मिनीटे लागतात.
राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय भक्त निवासात होऊ शकते.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय (प्रसादाचे जेवण) आहे.
पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : गगनबावडा एस.टी स्थानकातून गडावर चालत जाण्यास ३० मिनीटे लागतात.
सूचना : गगनगडाचे दरवाजे रात्री ०९:०० ते सकाळी ०५:०० बंद असतात.


0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers