Demo Site

Monday, July 30, 2012

गडगडा (घरगड)




किल्ल्याची ऊंची : 3156
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अंबोली पर्वतरांग (नाशिक)
जिल्हा : नाशिक
श्रेणी : अत्यंत कठीण
नाशिकपासून १८ किमीवर असलेल्या "गडगड सांगवी" गावाच्या मागे एक डोंगररांग पसरलेली आहे स्थानीक लोक या डोंगररांगेस अंबोली पर्वत या नावाने ओळखतात. या पर्वत रांगेत तीन शिखरांनी डोके वर काढलेले दिसते. यातील उजवीकडील शिखराला ‘अंबोली‘ व डावीकडील शिखराला ‘अघोरी’ या नावाने ओळखतात. या दोन शिखरांच्यामध्ये असलेले शिखर म्हणजे ‘गडगडा किल्ला’ होय. हा किल्ला सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. किल्ल्याचे स्थान पाहाता याचा उपयोग मुख्यत: टेहाळणीसाठी केला जात असावा.

पहाण्याची ठिकाणे :गडगड सांगवी गावामागील या किल्ल्यावर गावामागील कच्च्या रस्त्याने जाताना, वाटेत वीरगळांचा समुह पाहाता येतो. या रस्त्याने आपण पायर्या असलेल्या विहिरीपाशी येतो. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे. विहिरीजवळ शिवलींग व नंदी आहे. येथून सरळ जाणारी वाट किल्ल्याकडे जाते, तर उजवीकडे जाणारी वाट जिर्णोध्दारीत हनुमान मंदिराकडे जाते. या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिरात विश्राम घेऊन पुन्हा विहिरीपाशी येऊन किल्ला चढण्यास सुरुवात केल्यावर, १० मिनिटात आपण छोट्या कातळ माथ्यापाशी येतो. हा कातळमाथा मुख्य किल्ल्यापासून मोठ्या भेगेने वेगळा झालेला आहे. या छोट्या कातळमाथ्याला वळसा घालून मागील बाजूस गेल्यावर भेगेमध्ये दगड रचून गावकर्यांनी बनविलेल्या पायर्या दिसतात. या पायर्या चढून वर आल्यावर उजवीकडे भेगेमुळे वेगळा झालेला कातळ दिसतो, तर डावीकडे किल्ल्याचा कातळमाथा दिसतो. प्रथम छोट्या उजवीकडे कातळमाथ्यावर जावे, तिथे टोकाला जात्यासाठी कातळ कोरलेला पाहता येतो. येथून पुन्हा मुळ किल्ल्याकडे वळून थोडी चढाई केल्यावर, पुन्हा आपण किल्ल्याच्या गडगड सांगवी गावाच्या दिशेला येतो. किल्ल्याच्या कातळकड्याखालून जाणारी वाट आपल्याला भवानी मातेच्या देवळाकडे घेऊन जाते. त्यासाठी आपल्याला कातळात कोरलेल्या पायर्या चढून जावे लागते. देवीच्या देवळापासून किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्या आहेत. पूर्वी या पायर्यांनी थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येत असे, परंतू इंग्रजांनी येथील पायर्यांची नासधूस केल्यामुळे आता येथून किल्ल्यावर जाता येत नाही. किल्ला उतरतांना मात्र दोर लावून (रॅपलिंग करुन) येथून उतरता येते.

देवीचे दर्शन घेऊन कातळ कड्याखालील वाटेने थोडे चालत गेल्यावर आपण गडगडाकिल्ला व अंबोली पर्वत यामधील खिंडीत येतो. येथून एक पायवाट खिंडीत उतरुन अंबोली पर्वताला वळसा घालून जाते. या पायवाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर दगडात खोदलेली ३ फूटी उंचीची गुहा पाहाता येते. या मानवनिर्मित गुहेत रांगत जाता येते.(सोबत टॉर्च असणे आवश्यक). थोडे अंतर गेल्यावर गुहा काटकोनात वळते. स्थानिक लोक याला भूयार म्हणतात. ही गुहा पाहायला जाताना मात्र जपून जावे लागते कारण अनेक ठिकाणी घसारा(स्क्री) आहे, तर दोन ठिकाणी कातळात असलेल्या खोबणीत हात घालून रस्ता पार करावा लागतो.

गुहा पाहून पून्हा गडगडा किल्ल्याच्या कातळमाथ्यापाशी आल्यावर उजव्या बाजूला (गडगड सांगवी गावाच्या विरुध्द बाजूस) गेल्यावर कातळाचा छोटा टप्पा लागतो. हा टप्पा पार केल्यावर आपण एका निष्पर्ण झाडाखाली येतो. या झाडाची मुळे कातळात खोलवर गेलेली आहेत. या मुळांना व झाडाच्या फांद्यांना पकडून वर चढल्यावर आपण कातळाच्या अरुंद पट्टीवर येतो. येथून पुढे वर चढण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. हा पहिला कातळटप्पा साधारणपणे १५ फूट उंचीचा आहे (गिर्यारोहण तंत्रात ‘चिमणी क्लाईंब’ नावाने ओळखतात) हा टप्पा चढून दोर(रोप) वर असलेल्या झाडाला बांधून मग त्यावरुन इतरांना वर चढता येते.

पहिला रॉक पॅच संपल्यावर थोडीशी चढण आहे. या चढणीवर घसारा(स्क्री) असल्यामुळे जपून चालावे लागते. चढण संपल्यावर दुसरा (कातळटप्पा) रॉक पॅच आहे. हा साधारणत: २० फूटाचा आहे. वर चढण्यासाठी खोबणी आहेत. त्यावरुन वर जाऊन किल्ल्याच्या माथ्यावरील झाडाला दोर बांधावा व इतरांना वर चढवून घ्यावे.

किल्ल्याच्या माथ्यावर आल्यावर डाव्या बाजूस उध्वस्त प्रवेशद्वार व त्याबाजूच्या देवड्या पाहाता येतात. येथून दगडात कोरलेल्या पायर्या खाली उतरतांना दिसतात. या पायर्या पूर्वी देवीच्या देवळापर्यंत होत्या. त्या आता उध्वस्त झाल्यामुळे आता येथून (रोप लावल्या शिवाय) चढता - उतरता येत नाही. प्रवेशद्वार पाहून पुढे आल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समुह पाहायला मिळतो. यात ५ टाकं आहेत टाक्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. शेवटच्या दोन टाक्यात चौकोनी दालन कोरलेली आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. या पुढे पुन्हा एक पाण्याच्या टाक्यांचा समुह आहे. यात चार टाकी असून यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गडावरुन आजूबाजूचा विस्तिर्ण प्रदेश दिसतो. डांग्या सुळका, अंजनेरी व वालदेवी डॅम किल्ल्याच्या पश्चिमेला, तर मुंबई - नाशिक महामार्ग , मुकणे डॅम व त्यामागील पट्टा, औंढा, बीतनगड,हे किल्ले व कळसुबाई डोंगररांग दिसते. गडाच्या माथ्यावरुन उतरण्यासाठी आपण आलेल्या मार्गाने रॅपलींग करत उतरु शकतो किंवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला दोर बांधून रॅपलिंग करत देवीच्या मंदिरापाशी उतरु शकतो.

पोहोचण्याच्या वाटा : मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबईपासून १६३ कि.मी वर (घोटी पासून १६ किमी) व नाशिकच्या अलिकडे १८ कि.मी वर वैतरण्याला जाणारा फाटा आहे. या फाट्यापासून २ किमी वर "वाडीव्हीरे" गाव आहे. गावातून बाहेर पडल्यावर एक चौक लागतो. या चौकातून उजव्या हाताचा रस्ता ४ किमी वरील "गडगड सांगवी" या गडाच्या पायथ्याच्या गावात जातो. या रस्त्याच्या सुरुवातीलाच एक कमान उभारलेली असून त्यावर ‘हनुमान व भवानी मंदिर, अंबोली पर्वत परिसर, गडगड सांगवी’ असे लिहलेले आहे. नाशिकहून दर तासाला वाडीव्हीरे गावात जाण्यासाठी एसटी बस आहेत, परंतू गडगड सांगवी गावात एसटी जात नाही. वाडीव्हीरेला उतरुन ४ किमी चालत गडगड सांगवी गावात जावे लागते. खाजगी वाहनाने गडगड सांगवी गावापर्यंत जाता येते.
राहाण्याची सोय : गडगड सांगवी गावातील शाळेच्या पडवीत १० जणांची रहाण्याची सोय होऊ शकते.
किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या हनुमान मंदिरात १० जणांची रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय स्वत: करावी किंवा गडगड सांगवी गावापासून मुंबई - नाशिक महामार्ग ६ किमी वर आहे, तेथे अनेक धाबे आहेत.
पाण्याची सोय : १) गडावरील प्रवेशद्वाराजवळील टाक्यात पिण्यायोग्य पाणी १२ महिने उपलब्ध असते.
२) हनुमान मंदिराजवळ असलेल्या विहिरीत बारामाही पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : गडगड सांगवी गावातून गडमाथा गाठण्यास २ ते ३ तास लागतात.सूचना : १) गडगडा किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे.

२) सोबत १०० फूटी व ३०फूटी असे दोन वेगवेगळे दोर घेतल्यास दोनही कातळटप्पे चढता उतरताना खोळंबा होत नाही. दोन्ही रॉक पॅचमध्ये व पहिल्या रॉकपॅच पूर्वी जागा अरुंद असल्यामुळे ५ ते ६ जणांपेक्षा अधिक माणसे उभी राहू शकत नाहीत त्यासाठी दोन रोप असलेले चांगले.

३) किल्ला उतरतांना रॅपलिंग तंत्राचा वापर करावा.

४) किल्ला उतरतांना प्रवेशद्वाराकडून देवीच्या देवळाकडे रोप लावून उतरणार असल्यास रोपचा ‘यू’ बनवावा. कारण येथे एक ‘घुमटाकार’(ओव्हर हॅग) असल्यामुळे रोप शिवाय खाली उतरता येत नाही. रोपचा ‘यू’ बनविल्यामुळे सर्वजण खाली उतरल्यावर रोप खेचून घेता येतो.

५) देवीच्या देवळाकडून गड चढता येत नाही. येथे पायर्या तुटल्या आहेत, तेथे ओव्हर हॅग असल्यामुळे येथून गडावर जाता येत नाही. परंतू वर सांगितल्याप्रमाणे रोप लावून उतरता येते.
६) गावात कातळटप्प्याची खडानखडा माहिती असणारे वाटाडे आहेत. योग्य मार्गदर्शनासाठी त्यांची मदत घ्यावी.

७) सुळके व भिंती चढणारे गिर्यारोहक हा कातळटप्पा फ्रि क्लाईंबींगने चढू शकतात.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers