Demo Site

Monday, July 30, 2012

कोथळीग



उंची : ४७२ मीटर/१५५० फूट
प्रकार :गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी :बिकट
ठिकाण : महाराष्ट्र
जवळचे गाव : पेठ(ता.कर्जत जि.रायगड)
डोंगररांग :कर्जत-भिमाशंकर



कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.


पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ’पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. हा किल्ला ’कोथळा’ या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो..

गडावर जाण्याच्या वाटा :
पेठ गावातून पाउलवाटेने वर चढत गेल्यावर थेट कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा सामोर्‍या येतात. प्रथम लागते ती देवीची गुहा व पाण्याचे टाके व नंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा. या गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी एक उर्ध्वमुखी भुयारात पायऱ्या खोदल्या आहेत.

कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसने जाता येते. येथुन साधारणतः ४-५ तासात गडावर पोहचता येते.

रायगड तालुक्यातल्या कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळे मार्गे जाणारी आंबिवले बस घ्यावी. आंबिवलीजवळ एक छान तळे आहे. तिथून चढ लागेल. तीन किलोमीटरवर पेठ गाव. हा कोठळीगड किल्ल्याचा पायथा. थोड्याशा बिकट चढणीने किल्ल्याच्या माथ्यावर पोचावे. खाली तळात काही पंचरशी तोफा पडल्या आहेत. या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांदरे खिंडीत जाण्यास पायवाट आहे.

इतिहास :
शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या किल्ल्याला फार महत्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दूल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले.


हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दूल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले.फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकुन घेण्याचा अयशस्वी प्रयास केला;ज्यात तो आणि त्याचे सैन्य मारले गेले.





0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers