तुमच्या डॉक्टरनं लिहून दिलेलं एखादं औषध तुम्हाला खूप्पच महाग वाटलं तर तुम्ही काय करता ?... ' अरे बापरे ' म्हणत, मनातल्या मनात शिव्या देत, खिशातले पैसे केमिस्टच्या हातावर टेकवून निमूटपणे ते औषध खरेदी करता... हो ना ? मग आता, ऑगस्ट महिन्यापासून महागडं औषध असं नाखुषीनं विकत घ्यायची गरज नाहीए. कारण, महागड्या औषधांना स्वस्त औषधांचा पर्याय देणारी एसएमएस सेवा केंद्र सरकार देशभर सुरू करतंय.
आमीर खानच्या ' सत्यमेव जयते ' मधून जेनेरिक औषधांवर प्रकाशझोत पडल्यानंतर, कुठलंही औषध घेताना सजग नागरिक त्याच्या ' ख-या ' किमतीचा विचार करू लागलाय. अनेक औषधांच्या किंमती अगदीच नगण्य असतात, पण कंपन्या ' ब्रँडिंग ' चा भरभक्कम खर्च आपल्या खिशातून वसूल करतात, हे त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे अनेकांनी जेनेरिक औषधं कुठे-कशी मिळतील, याचा शोध सुरू केलाय. त्यांचं हे संशोधन सोपं करण्यासाठी सरकार पुढे सरसावलंय. फक्त एका एसएमएसवर त्यांना त्याच आजारावरची, समान घटकद्रव्यं असलेली, दोन-तीन इतर कंपन्यांची स्वस्त औषधं सुचवण्याची अभिनव योजना त्यांनी आखली आहे.
समजा, तुम्हाला डॉक्टरांनी एखादं औषध सुचवलं आणि त्याची किंमत तुम्हाला जास्त वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाइलवरून ठरावीक नंबरवर एसएमएस करायचा. त्यानंतर काही वेळातच, त्याच औषधाला दोन ते तीन पर्याय तुम्हाला सुचवणारा मेसेज तुम्हाला येईल. उदाहरणच द्यायचं झालं तर, तुम्हाला डॉक्टरांनी ' ऑग्मेंटिन ' ही टॅब्लेट सुचवली आणि तुम्ही हे नाव संबंधित नंबरवर एसएमएस केलंत, तर कदाचित तुम्हाला
' मॉक्सीकाइंड सीव्ही ' हा पर्याय सुचवला जाऊ शकेल. ही गोळी ' ऑग्मेंटिन ' पेक्षा स्वस्त आहे. अर्थात, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही पर्यायी गोळी घ्या, अशी सूचनाही मेसेजसोबत केली जाणार आहे.
या एसएमएस सेवेमुळे समान गुण असलेलं औषध ग्राहकांना स्वस्त दरात मिळू शकेल, असा विश्वास एका अधिका-यानं व्यक्त केला. अँटि-इन्फेक्टिव्ह, पेनकिलर्स, गॅस्ट्रो-इन्टेस्टाइनल औषधांना पर्याय देण्याची जय्यत तयारी केंद्र सरकारनं चालवली आहे. काही वेळा डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधाची किंमत आणि पर्यायी औषधाच्या किंमतीत १० ते १५ पट फरक असू शकेल.
काही वर्षांपूर्वी, केमिस्टच्या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी केंद्र सरकारनं अशीच हेल्पलाइन सुरू केली होती. एखादं औषध नसल्याचं सांगून त्याऐवजी महागडं औषध देणा-या औषध विक्रेत्यांना त्यामुळे चांगलाच चाप बसला होता.
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15015816.cms
0 comments:
Post a Comment