Demo Site

Thursday, July 19, 2012

कुलाबा किल्ला



किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे.



इतिहास : अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.

पहाण्याची ठिकाणे :किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार्याच्या बाजूस पण, इशान्येकडे वळवलेले आहे. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. किल्ल्याला १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर अजुनही लोकांचा राबता असलेले सिध्दीविनायकाचे मंदीर आहे. गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटा पलिकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर आहे. या विहिरीला आत उतरायला पायर्या आहेत. दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणार्या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा / दर्या दरवाजा म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहे. दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस्त कली जात असत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्या आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार्या कंपनीच नाव कोरलेल आहे ‘‘ डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड ", व वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते.

पोहोचण्याच्या वाटा : मुंबईहून - पनवेल - वडखळ मार्गे अलिबागला जावे, अलिबागच्या समुद्र किनार्यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते.
राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही ,राहण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही ,जेवणाची सोय अलिबाग मध्ये आहे.
पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही , पाण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.
सूचना : किल्ल्यात जाण्यासाठी सोयीस्कर ओहोटीच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.

तिथी वेळ तिथी वेळ
प्रतिपदा ४:०० ते ६:०० अष्टमी ९:०० ते १२:००
द्वितीया ५:०० ते ७:०० नवमी १०:०० ते १२:३०
तृतीया ५:३० ते ८:०० दशमी ११:०० ते १३:००
चतुर्थी ६:०० ते ९:०० एकादशी११:३० ते १४:००
पंचमी ७:०० ते ९:३० द्वादशी १२:०० ते १५:००
षष्टी ८: ०० ते १०:०० त्रयोदशी१३:०० ते १६:००
सप्तमी ८:३० ते ११:०० चर्तुदशी १३:०० ते १६:००
पौर्णिमा / अमावस्या १४:३० ते १७:००

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers