Demo Site

Monday, July 30, 2012

दुंधा किल्ला




किल्ल्याची ऊंची : 2280
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील बागलाणात कर्हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा असे कमी उंचीचे किल्ले आहेत. या किल्ल्यांबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही. हे किल्ले सुटेसुटे उभे असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. दुंधा किल्ल्याला स्थानिक लोक किल्ला म्हणून न ओळखता दुंधेश्वर महाराजांचा डोंगर म्हणून ओळखतात. श्रावणी सोमवारी गडावर यात्रा भरते.
पहाण्याची ठिकाणे :दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी दुंधेश्वर महाराजांचे देऊळ आहे. या देवळांच्या बाजूला पाण्याची विहीर आहे. देवळाच्या बाजूने गडावर चढायची पायवाट आहे. ही पायवाट गर्द झाडीतून जाते. १० मिनीटात आपण दगडात खोदलेल्या पायर्यांपाशी येतो. या पायर्या चढून गेल्यावर शंकर मंदिराजवळ येतो. २ डेरेदार वृक्षांच्या सावलीत हे छोटेखानी मंदिर उभ आहे. मंदिराच्या मागे पाण्याचे छोट कुंड आहे, पण या पाण्याला कुबट वास येत असल्यामुळे त्याचे पाणी केवळ भांडी घासण्यासाठी वापरतात.


मंदिराकडे तोंड करुन उभ राहील्यावर उजव्या हाताला सध्या गडावर राहणार्या रामदास महाराजांचे घर दिसते. घरावरुन जाणारी पायवाट पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांकडे जाते. पायवाटेच्या थोड्या खालच्या अंगाला कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील पाणी थंडगार व चवदार आहे. टाक्यातील पाणी पिऊन पुन्हा पायवाटेवर आल्यावर सरळ चालत, किल्ल्याच्या अर्ध्या डोंगराला वळसा घालून गेल्यावर दगडात खोदलेले पाण्याच टाक दिसत, १० फूट × ५फूट टाक्यातील पाण्यावर हिरव्यागार शेवाळ्याचा थर जमलेला असतो. येथून पुढे जाण्यासाठी पायवाट नसल्यामुळे आल्या वाटेने परत मंदिराजवळ यावे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या हाताची पायवाट ५ मिनिटात दगडात खोदलेल्या टाक्यापाशी जाते, याला आंघोळीचे टाकं म्हणतात, येथून पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पुन्हा शंकर मंदीरापाशी यावं लागतं या मंदिराच्या मागून जाणारी पायवाट किल्ल्याचा माथ्यावर जाते तिथून आजूबाजूचा सर्व प्रदेश दृष्टीक्षेपात येतो,

पोहोचण्याच्या वाटा : १) नाशिक जिल्ह्यातील सटाणा गावातून दुंध्याला जाता येते. सटाणा - मालेगाव रस्त्यावर, सटाण्यापासून ३कि.मी अंतरावर सौंदाणे फाटा आहे. या फाट्यावरुन अजमेरसौंदाणे - तळवडे मार्गे दुंधा २० कि.मी वर आहे. दुंधा गावाच्या पुढे १ कि.मी वर दूंधेश्वर मंदीराला जाणारा कच्चा रस्ता आहे. तो थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जातो.

२) सटाणा - मालेगाव रस्त्यावर सटाण्यापासून १७ कि.मी व मालेगाव पासून २२ कि.मी वर लखमापूर गाव आहे. या गावापासून दुंधा किल्ला ७ कि मी अंतरावर आहे.

राहाण्याची सोय : गडाच्या पायथ्याशी दुंधेश्वर मंदिरात १५ माणसांची रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय : गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे .
जाण्यासाठी लागणारा वेळ : गडाच्या पायथ्यापासून ३० मिनीटे लागतात.

सूचना : अजमेरा, बिष्टा, कर्हा, दुंधा हे छोटे किल्ले दोन दिवसांच्या मुक्कामात पाहाता येतात.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers