अभ्यंग उपचार आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी सांगितला आहे; पण त्याचा प्रसार मात्र सध्या परदेशात होत आहे. अंगाला तेल रगडणे, याला नाव दिलंय “मसाज’. उटण्याच्या खरखरीतपणाने त्वचा खसखसून धुणे, याला म्हणतात “स्क्रब’ आणि अंग कोरडे पुसून उटी लावणे, याला ते म्हणतात “डस्टिंग".
मसाजचे विविध प्रकार आहेत. त्यात नुसताच विशिष्ट भाग चेपणे, चापट्या, थोपटल्याप्रमाणे स्ट्रोक देणे हे विशिष्ट प्रकार काही तक्रारी दूर करायला चांगले असतात. यापेक्षा वेगळे म्हणजे जिरेपर्यंत सर्वांगाला तेल चोळून लावणे, ही झाली “अभ्यंग स्नेहल चिकित्सा".
आयुर्वेद म्हणते, सर्वांगाला तेलाने मालिश केल्याने शरीर बळकट होते व त्वचा नितळ व निरोगी राहते. सकाळी आंघोळीपूर्वी अर्धा तास अंगाला तेल चोळून लावावे. त्वचेची रंध्रे उतरत्या कौलासारखी वरून खाली झुकणाऱ्या दिशेने असतात. त्यामुळे तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावे, हे त्यासाठीच म्हटले आहे. संपूर्ण शरीराला लावायला 2 मोठे चमचे (अंदाजे 30 मिली.) तेल पुरते. संपूर्ण शरीराला तेल लावून जिरवायला 15 ते 20 मिनिटे पुरतात. नंतर तेवढाच वेळ थांबून आंघोळ करायला हरकत नाही. पोटाची तक्रार असताना किंवा आजारपणात अभ्यंग करू नये.
आपल्या त्वचेचे तीन भाग असतात. बाह्य त्वचा म्हणजे आपल्याला दिसणारी. ती तुकतुकीत, लवचिक व उजळ असावी. बाह्य त्वचेवर सतत मृतपेशी व मृतत्वचेचा लेप चढत असतो. मालिशमुळे तो निघतो. रंध्रे मोकळी होतात व तेथील श्वासोच्छवास चालू राहतो. त्या आतील भागात असतात महत्त्वाच्या ग्रंथी. जसे घाम पाझरणाऱ्या, तेल पाझरणाऱ्या, संवेदना पोचवणारे मज्जातंतू. मसाजने येथील रक्ताभिसरण सुधारते. प्राणवायूचा व पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. निरुपयोगी तत्त्वे बाहेर फेकली जातात. त्या आतील भागात असतो मेदाचा थर. ज्यावर त्वचा विसावली असते. तेल मेदाच्या थरात शिरून तेथील शिथिलता घालवून तो कार्यक्षम व लवचिक बनवते. त्यामुळे त्वचा निबर व निस्तेज दिसत नाही.
म्हणजे कृष शरीर पुष्ट होण्याकरिता व स्थूल शरीर कृष होण्याकरिता तेल हे एकच पुरेसे आहे. हे आयुर्वेदात म्हणूनच म्हटले असेल.परदेशात मसाज पार्लर्स असतात. तेथे सगळे शरीर रगडून देतात. त्यामुळे ताणतणाव नष्ट होऊन नवचैतन्य येते, असे म्हणतात. आपल्याकडेही बाळ-बाळंतिणीला, पैलवानांना गेलेली शक्ती भरून निघण्यासाठी मसाज करण्याची पद्धत आहे. आपल्याला काही दररोज अभ्यंगाला वेळ नसतो हे खरे आहे. रात्री झोपताना निदान डोक्याला व तळपायाला तरी तेल चोळून लावावे. त्याने थोडे तरी फायदे मिळतात. आठवड्यातून एकदा तरी सर्वांगाला अभ्यंग करावे.
निरनिराळ्या तेलबियांपासून त्या त्या गुणाची तेले मिळतात. जसे एरंड, करंज, कडुलिंब अशी अळाद्य, तर शेंगदाणा, बदाम, ऑलिव्ह, खोबरेल, तीळ अशी खाद्य तेले; पण अभ्यंगाला तिळाचे तेल उत्तम. खरंतर तेल नावच त्यावरून आले “तिलोद्भवं तेलम’ म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले हे तेल. आयुर्वेदाला तिळाच्या तेलाचे कौतुक फार. स्वाभाविकच आहे म्हणा. तिळाचे तेल हे उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म गुणाचे असते. चोळून लावताना उष्णता व घर्षणामुळे ते त्वचेत शिरते शरीरात सर्वत्र पोचून नंतर पचते व ताण शिथिल करते. शरीरातील घटकांना वंगण पुरवते.
तिळाचे तेल ज्या वनौषधीबरोबर प्रक्रिया करावे, तिचे गुण आत्मसात करते. अशी वनस्पती हवी. जी तीळ तेलाचे गुण वाढवेल, दोष कमी करेल व त्वचेला फायदे देईल. खरं तर तेल हे नाव त्यावरूनच आले. “”तिलोद्भव तैलम” म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले ते तेल; पण हल्ली तेलातील भेसळ हा प्रकार सर्रास झालाय. ती रोखावी म्हणून भारत सरकारने “ऍगमार्क’ ही प्रणाली आणली. ऍगमार्कला भारत सरकारची दर्जा व “शुद्धतेची हमी’ असे म्हणतात. तिळाचे तेल घेताना त्यावरील ऍगमार्क चिन्हे पाहूनच घ्यावे.
खाद्य तेलाची भेसळ, टंचाई व महागाई यावर उपाय म्हणून केरळमध्ये “करंजेल’ या अखाद्य तेलात वात लावून दीपोत्सव साजरा करतात. बरे, करंज तेल जंतूनाशकही आहे. त्यामुळे वातावरणही शुद्ध राहते.
उटण्यामुळे जास्तीची चरबी नाहिशी होते. त्वचेचा वर्ण व पोत सुधारतो. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
स्नान हे आरोग्यदायी आहे. खाज, मळ, घाम इ. पातकांचा ते नाश करते.
शरीराचे तापमान व आंघोळीसाठी घेतल्या जाणाऱ्या पाण्याचे तापमान सारखे असावे. म्हणून अतिथंड किंवा अतिउष्ण पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. आंघोळीनंतर स्वच्छ, कोरड्या टॉवेलने अंग खसखसून पुसावे. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकीत्सा. अगदी दररोज शक्य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी.
0 comments:
Post a Comment