Demo Site

Monday, February 14, 2011

दिपावली

वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.


धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)
धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकयांच्या दृष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात.ह्या सुमारास झेंडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडू व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.


नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)
आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.


लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)
या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.


पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा / बलिप्रतिपदा)
बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.


भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)
या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers