Demo Site

Saturday, February 26, 2011

मेहंदीच्या पानावर ............


२४ डिसेंबर
आज स्टुडीओ मध्ये आशु जोऱ्रात ओरडलीच “अग्गं हात सोडं.. कित्ती जोरात दाबती आहेस..” :-)त्याला कारणही तस्सच होतं ‘राज’ स्ट्युडीओ मध्ये अचानकपणे आला होता, त्याचे आज रेकॉर्डींग नसताना त्याचे अनपेक्षीतपणे येणं त्याला अनपेक्षीतपणे बघणं माझ्यासाठी एक सुखःद धक्काच होता. त्याचे थोडीशी निळसर छटा असलेले डोळे, नेहमीच चेहऱ्यावर असणारी ति स्माईल, आपल्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य पसरवणारी त्याची बोलताना डोळे मिचकावुन बोलण्याची पध्दत आणि कष्टाने कमावलेली शरीरयष्टी सर्वच काही छान होते.. मी पुर्ण फिदा होते त्याच्यावर. आणि त्याचा आवाज.. माय गॉड.. अंगावर हजारो गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात केल्यासारखे वाटते. उगाच नाही तो आघाडीचा गायक आहे, मीच काय कित्तेक मुली त्याच्यावर फिदा असतील. अर्थात मला हे काही वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या सहा महीन्याची माझ्या डायरीची पानं तुम्ही चाळलीत तरी तुमच्या आपसुकच लक्षात येईल.
त्याला अचानकपणे येताना पहाताच खरं सांगु तर माझा माझ्यावरच ताबा राहीला नाही आणि नकळतच मी आशुचा हात इतका जोराने दाबला होता की न रहावुन ती ओरडलीच.
मी म्हणलं आशुला, ‘स्वॉरी यार, उन्हाने तापलेल्या धर्तीवर, पाना-फुलांवर पावसाचा एक थेंब पडला तरी सगळे कसे झुमुन उठतात इथे तर माझ्यावर साक्षात एक सर कोसळली होती..’
तर म्हणते कशी, ‘अदिती.. बास आता.. राज तुला किती आवडतो हे मलाच काय पुर्ण स्टुडीओ ला माहीत झालंय..’
म्हणजे??? मी इतकी ऑब्व्हीयस वागते की काय?
‘तो समोर आला कि तुझा चेहरा बघ कित्ती बदलतो. लाजतेस काय, एकटीच हसतेस काय, पायाच्या अंगठ्याने जमीनीवर लिहीतेस काय..’
आशु बोलत होती, माझ्या मनात मात्र ते गीत गुणगणत होते.. ‘लाज लाजली त्या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी, मनात हसली, मनात रुसली, खुदकन हसली ती फुलराणी’
‘काय बोलते आहेस तु आशु? अगं मग हे आधी नाही का सांगायचं? राजला तर नसेल ना हे कळलं? काय म्हणेल तो? एक फडतुस गाण्यामध्ये ‘कोरस’ आवाज देणारी अदिती.. माझ्यावर प्रेम करते..!! हसला असेल तो स्वतःशीच.. शट्ट यार..’
तर म्हणते कशी..’अगं काही हसतं वगैरे नाही.. त्याला सवय आहे अश्या गोष्टींची.. तु एकटी का आहेस त्याच्यावर प्रेम करणारी..’ खरंच सांगते इतका राग आला होता ना असतील हजारो प्रेम करण्याऱ्या, पण माझ्याइतके नक्कीच नाही.
‘हाय आशु.. हाय अदिती..’ राज अचानक कुठुनतरी समोर आला. इतका हॅन्ड्सम दिसत होता ना.. माझं नाव त्याला माहीत आहे हे कळल्यावर तर इतका आनंद झाला ना.. मला काही बोलताच येईना.. शब्दच अडकले.. मग आशुच म्हणाली.. ‘हॅलो राज..’
‘शी कित्ती मुर्ख आहे ना मी.. कित्ती बावळट दिसले असेन?’
‘उद्या संध्याकाळी माझ्या घरी यायचं..सगळ्यांनाच बोलावले आहे.. तुम्ही सुध्दा या. क्रिसमस निमीत्त पार्टी ठेवली आहे, ८.३० वाजता, नक्की या’ एवढे बोलुन गेला सुध्दा.
‘मला खुप काही बोलायचे होते. त्याला सांगायचे होते.. त्याचा आवाज खुप आवडतो मला.. त्याच्याबरोबर एक-दोन गाणी सुध्दा मी गायली आहेत.. पण कध्धी.. माझ्या तोंडातुन तर हॅलो सुध्दा नाही फुटले.. खरचं अदिती बिनडोक आहेस तु..’
ख्रिसमसच्या आधी किंवा ख्रिसमसला बर्फ पडणे शुभ मानतात.. माझ्या अंगावर तर आज थंडगार बर्फाची एक कोमल, शितल चादरच लपेटल्यासारखे वाटले.. आज पहिल्यांदा राज माझ्या इतक्या जवळ होता.. शुभ-शकुनच म्हणायचा..

Next

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers