Monday, February 14, 2011
शल्य
तुम्हाला कधी शल्य बोचणे/टोचणे, शल्य राहणे असला अनुभव आलाय का? मला सांगा शल्य बोचायला/टोचायला तो काटा आहे कि रहायला दुःखाला समानार्थी शब्द आहे? आयला मग हे शल्य म्हणजे मॅटर हाय काय? वेल, नसेल माहित तर मग तुम्हाला खालचा फाफटपसारा वाचावा लागेल….
डॉक: चल मग, ठेवतो. बोलू नंतर. जय श्रीराम.
मी: जय नकुल-सहदेव.
डॉक: हे काय??? नकुल-सहदेव का???
मी: आता तु जय श्रीराम बोल्लास, मी जय श्रीकृष्ण बोल्लो असतो. नेहमीची नावं झाली ती. म्हटल कोणा वेगळ्याचं नाव घेऊ. तसंपण नकुल-सहदेवांना कोणी विचारत नाही. ह्या नकुल-सहदेवांचा काही रोल होता का रे महाभारतात?
डॉक: हो, मग काय. कर्ण ह्यांच्यामुळे हरला.
मी: ऑ… काय सांगतोयस???
डॉक: हो. नकुल-सहदेव माद्रीची मुलं. शल्य माद्रीचा भाऊ, म्हणजे ह्यांचा मामा. महाभारताची लढाई झाली तेव्हा शल्य त्याचं सैन्य घेऊन पांडवांच्या मदतीला निघाला. पण तो वाटेत असताना शकुनीने डाव रचला. त्याने त्याच्यासाठी महाल बांधला. त्याची आणि त्याच्या सैन्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केली. शल्याला माहित नव्हतं कि हे सगळं शकुनीने केलय. त्याला वाटलं कि युधिष्ठीराने हा सगळा पाहुणचार केला. युधिष्ठीराला तो थॅंक्यू म्हणायला गेला तेव्हा युधिष्ठीर बोल्ला की मी हे काही केलं नाही, मला काही माहित नाही. नंतर त्याला समजल की हे सगळं दुर्योधन आणि शकुनीने केलय. क्षात्रधर्मानुसार एखाद्याचं आदरातिथ्य घेतल्यावर तुम्ही त्याचं देणं लागता. शल्याने दुर्योधनाचं आदरातिथ्य घेतल्याने त्याने दुर्योधनाला विचारलं की तुला ह्या बदल्यात काय पाहिजे? दुर्योधन शल्याला म्हणाला, तु तुझ्या सैन्यासह पांडवांविरुद्ध लढायला मला मदत कर. आता शल्य त्याच्या बहिणीच्याच मुलांविरुद्ध कसा लढेल? तेव्हा तो दुर्योधनाला म्हणाला, मी तुला माझं सैन्य देतो पण नकुल-सहदेव माझे भाचे आहेत. मी त्यांच्याविरुद्ध लढणार नाही. हवंतर मी तुझं सारथ्य करतो. श्रीकृष्णानंतर सारथ्य करण्यात जर कोणी पारंगत असेल तर तो शल्य होता. अर्जुनाला टक्कर देणारा धनुर्धारी कर्ण होता. अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण, म्हणुन कर्णालापण श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी मिळावा म्हणुन दुर्योधनाने शल्याला कर्णाचं सारथ्य करायला सांगितलं. शल्य तयार झाला. पण शल्याने कर्णाची वाट लावली. सारथ्याचं काम असत की तो ज्या योद्ध्याचं सारथ्य करतो त्याला प्रोत्साहित करायचं, जसा श्रीकृष्ण अर्जुनाला करायचा. पण शल्य कर्णाला घाबरवायला बघायचा. त्याला नेहमी टाकूनपाडुन बोलायचा. कर्णाला तसापण शाप होताच. जेव्हा त्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा त्याला त्याची विद्या वापरता येणार नाही. त्याला काही आठवणार नाही, त्याच्या मनात भिती असेल. कर्णाला डिमोरलाईझ करण्याचं सगळ्यात मोठ्ठ काम शल्याने केलं.
म्हणुनच मराठीत शल्य बोचणे/टोचणे/राहणे म्हणतात ते ह्यावरुनच.
मी: (फुलऑन आश्चर्यचकित!!! बोलेतो भौचक्का!!!) क्कॉय बोलतो…
डॉक: हो, कारण शल्याने मानसिक खच्चीकरण केलं.
तर आता तुम्हाला समजलं असेलच शल्य बोचणे/टोचणे/राहणे हा शब्दप्रयोग बोलीभाषेत कसा आला. त्यामागे एवढं मोठ्ठं रामायण… सॉरी महाभारत घडलं.
अवांतर:
मी: ते ठिकाय. पण ह्यात नकुल-सहदेवांचा काय संबंध???
डॉक: अरे, आता नकुल-सहदेव शल्याचे भाचे म्हणुन तो त्यांच्याविरुद्ध लढला नाही. आणि त्यांच्यामुळेच कौरवांच्या साईडने असुनपण पांडवांच्या फायद्याचं केलं.
मी: हम्म्म्म्म… इनडायरेक्ट रिलेशन. कॉम्प्लीकेटेड आहे.
पुढे आमच्या महाभारत ह्या टॉपिकवर बराचवेळ गप्पा झाल्या. डॉक्टरला महाभारत हा इतिहास असल्याचा पुर्ण विश्वास आहे. मला ते खरंखोटं ठरवण्याचा विवाद करण्यात रस नाही. महाभारत हे एका ऋषिने कोणा राजाला ऐकवलं होतं. राजाचं नाव आठवत नाही, पण डॉकने त्या ऋषिचं नाव सौती असल्याचं सांगितलं आणि सौतीने जे सांगितलं ते म्हणजे ‘महाभारत’. व्यासांनी जे लिहलं ते ‘जय’ म्हणुन, ज्यात ३२,००० ओव्या आहेत/होत्या. पुढे त्यात अनेक ऋषिमुनींनी त्यांच्यात्यांच्या ओव्यांची भर टाकली, ज्यामुळे त्या ओव्यांची संख्या १ लाखाच्या आसपास गेली. ह्यामुळेच आणि भाषांतर करताना भावार्थ समजुन नं घेता शब्दार्थ समजुन घेतल्याने महाभारतातल्या (रामायणातल्यासुद्धा) अनेक घटनांची तर्कसंगती लावणं निव्वळ अशक्य आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment