Demo Site

Wednesday, July 20, 2011

निस्वार्थ प्रेम

माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानंही बरेच उद्योग
केले. पोरींना भरपूर त्रास दिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे
बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिले. दर महिन्याला त्याच्या अंगावर नवा
शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार,
प्रेमाबिमात नाही पडणार' त्यानं त्याच्या बाईकरवही "आय हेट गर्ल्स' असंच
...लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला.
शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही
सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता;
पण खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा.
पण... पण आज त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कुठल्या कुठं पळून गेलंय.
तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती.
कसलाही विचार न करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं.
ती होस्टेलला राहायला होती. सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.


खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं त्या मुलीनंही होकार दिला. त्याचा
स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला,
तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता. त्यामुळं त्यानं प्रेमाविषयी
त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.

तो तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे
पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच
फिरायला निघाले तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं
घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून
तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं
तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत पाण्याची बाटली
होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथं
चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे.
एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं त्या
दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच.
त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोचल्यावर फोन कर असं सांगून त्यानं फोन
ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन केला; पण कुणीच उचलला नाही.
घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात धरून त्यानंही परत तिला फोन
केला नाही. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी मला समजलं, तिचा अपघातात मृत्यू
झाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच सुचत नव्हतं. खूप धाडस करून
मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो. जागेवरच खाली बसला अन्‌ मोठमोठ्यानं रडायला लागला.
आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न
करता त्यानं गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन्‌ आम्ही तिच्या गावाकडं
गेलो; पण काही उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला
सावरलं. तो तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही
तिच्या बाबांना भेटलो अन्‌ अर्ध्या तासात माघारी फिरलो.

मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी
काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवली अन्‌ एका
झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता
अन्‌ झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर
दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा
स्वभावही बदलला आहे. एखाद्या शांत मुलाप्रमाणं तो वागतोय. त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहिती
नाही. तो घरात काही बोलतही नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला
दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो
अन्‌ उशीत तोंड खुपसून रडतो. तो म्हणतो, ""ते झाडच आता माझं सर्वस्व आहे.
त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं
म्हणतात;पण मी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन, की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची "लव्ह
स्टोरी' अर्धवट राहणार नाही. खरं प्रेम असेल, तर ही
निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.'

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers