Demo Site

Monday, July 18, 2011

माणसे जोडण्यासाठी……काय कराल?

माणसे जोडणे म्हणजे माणसाना प्रभावित करणे,
माणसावर प्रभुत्व गाजवणे नव्हे.
माणसे जोडणे म्हणजे मनमोकळे, मतमोकळे असणे.
मनाचे मनाशी नाते जोडणे.
माणसे जोडणे म्हणजे अंतरीच्या जीव्हाळ्यासाठी ‘जिवंत निमित्त’ शोधणे.

माणसे जोडणे म्हणजे प्रत्येक माणूस
वेगळा असतो, याचे भान ठेवणे.
वेगळेपण जपता जपता जुळलेपण ही जोपासणे.
माणसे जोडणे म्हणजे स्वत:ला हरवणे नव्हे,
तर नात्यांच्या माध्यमातून स्वत:चाच शोध घेणे.

माणसे जोडणे म्हणजे कुणीच परिपूर्ण नसते
हे सत्य स्वीकारणे.
आपण स्वत:च्या चुकांकडे पाहतो,
तसेच इतरांच्या चुकांकडे पाहणे.

माणसे जोडणे म्हणजे स्वत:ला मोठे करण्यासाठी
कुणाला कमी न लेखणे, नाउमेद न करणे.
माणसे जोडणे म्हणजे सौजन्याची साथ धरणे.

आपल्या व्यक्तित्वातील काटे
इतराना बोचणार नाहीत, याची दक्षता घेणे.
सहज, स्वाभाविक, वागणे, पण…..
स्वभाव बदलताही येतो, याची जाण ठेवणे.

माणसे जोडणे म्हणजे समोरच्याला
‘तो आहे’ तसा स्वीकारणे.
आपल्या अपेक्षा, आपली मते इतरांवर न लादणे.
माणसे जोडणे म्हणजे ऐकण्याची कला शिकणे.
फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणे.

माणसे जोडणे म्हणजे माणसांवर शिक्के न मारणे.
समोरचा अधिक महत्वाचा – हे स्वत: जाणणे.
आणि त्यालाही ते जाणवू देणे.
माणसे जोडणे म्हणजे कौतुकाची संधी न सोडणे,
तक्रार मात्र जपून करणे.

माणसे जोडणे म्हणजे प्रतिक्रिया नव्हे,
तर प्रतिसाद देणे.
रागाचेही रूपांतर लोभात करता येणे.
माणसे जोडणे म्हणजे इतराना माफ करता करता,
स्वत:चे मन साफ करणे.

माणसे जोडणे म्हणजे अपमानाचा बदला
मानाने घेणे, टीकाकारांचीही दाद मिळवणे.
मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे, हे ओळखणे.
माणसे बदलली तरीही इतिहास न बदलणे.
जिव्हाळा जपता आला नाही, तरीही कटुता टाळणे.

माणसे जोड़णे म्हणजे मदतीची संधी घेणे .
इतरांच शक्य तितके भले करणे.
भले करता आले नाही, तरी
नुकसान न करणे…कुणाची संधी हिरावून न
घेणे.
माणसे जोडणे म्हणजे माणसाना वापरणे नव्हे,
तर त्याना आपल्या स्वप्नात सहभागी करून
घेणे.

माणसे जोडणे म्हणजे कृतद्न्य राहणे,
श्रेयाच्या मोहात न पडणे.
माणसे जोडणे म्हणजे समाजाचे ऋण चुकते करणे,
स्वहित साधता साधता, ‘स्व’ विस्तारत नेणे.

माणसे जोडणे म्हणजे ‘कामाचे संबंध’ सुरळीत ठेवणे.
सम्बंधाइतकेच कामाला महत्व देणे.
कामाशी प्रामाणिक रहाणे, आवश्यक तिथे ठाम राहणे.
माणसे जोडणे म्हणजे माणसाना प्रेरित करणे, दिशा देणे.

माणसे जोडणे म्हणजे नाती
बदलू शकतात, याचे भान ठेवणे.
‘इतुके आलो जवळ जवळ की
जवळपणाचे झाले बंधन’ हे टाळणे.
नात्यांमध्येही एकमेकांसाठी
पुरेसा अवकाश ठेवणे.

माणसे जोडणे म्हणजे
‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ हे गाणे आळवणे.
माणसे जोडणे म्हणजे माणसाचा धर्म पाळणे.
माणसे जोडण्याताल्या ‘यशा’ चा आनंद अनुभवणे!

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers