Demo Site

Wednesday, July 27, 2011

तुम्ही केली तर कलाकारी आणि आम्ही केली तर चोरी?


ब्लॉगवरचा लेख/ फोटो/ क्रिएटीव्ह कॉपी - पेस्ट करणे हे काही नवीन नाही. काही प्रकरणांत हा उद्देश प्रामाणिक असतो - म्हणजे - आवडलं म्हणुन शेअर केलं - अर्थात ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न नसतो. तर काही प्रकरणांत चोरुन - त्यावरचा लोगो - वॉटरमार्क काढुन ते साहित्य आपल्याच नावावर खपवायचा प्रयत्न असतो.

बराच वादाचा आणि "काँप्लिकेटेड" म्हणावा असा एक मुद्दा! मित्रांनीही बर्‍याचदा यावर प्रश्न विचारलेले. मी काही कायद्याचा तज्ञ अथवा पंडित नाही, मात्र उपलब्ध असणार्‍या माहितीच्या आधारे काही माहिती इतरांसाठी लिहितोय.

भारतीय प्रताधिकार कायदा हा ब्रिटीश प्रताधिकार कायदा - १९११ वरुन तयार करण्यात आलेला असुन सध्या तो भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार अंमलात आहे.

प्रताधिकार - कॉपीराईट - म्हणजे काय?

प्रताधिकार हा साहित्यिक, नाटककार, कलाकार, सिनेमा - संगितकार - ध्वनिमुद्रण यांना [या कार्याशी निगडीत असणार्‍यांना] त्यांच्या कार्याची/ कामाची नक्कल होऊ नये यासाठी कायद्याने दिलेला एक अधिकार आहे. त्यामध्ये या संबंधित कामाचा/ कार्याचा वापर, संबधित सार्वजनिक व्यवहार, फेरफार करुन स्वीकार व अनुवादन याबातही अधिकार आहेत. या अधिकारांमध्ये कार्यान्वये काही बदल असु शकतात.

काय काय कॉपी-राईट होऊ शकतं?
  • वाङमयीन कार्य
  • संगीतयुक्त कार्य व संबधित शब्दरचना
  • नाटक - ड्रामा - व संबंधित संगीत
  • मूकनाट्य - परीकथेवर आधारित मूकनाट्य - व संबंधिक कोरिओग्राफि कार्य
  • चित्रीय - सचित्र, चित्रकला - रंगकला, शिल्पसंबंधी कार्य
  • ध्वनिमुद्रण - नोंदणी
  • गृहशिल्प - इमारतीचे नकाशे संबधित कार्य
वरील पर्यायांमध्येही उप-पर्याय आहेत/ असु शकतात.

प्रताधिकार - कॉपीराईट - हे शाश्वत/ कायमस्वरुपाचे असु शकते का?

- नाही. प्रताधिकार - कॉपीराईट - कायदा ठराविक कालासाठी आहे. जसं:
  • वाङमयीन कार्य
  • संगीतयुक्त कार्य व संबधित शब्दरचना
  • नाटक - ड्रामा - व संबंधित संगीत
  • मूकनाट्य - परीकथेवर आधारित मूकनाट्य - व संबंधिक कोरिओग्राफि कार्य
  • चित्रीय - सचित्र, चित्रकला - रंगकला, शिल्पसंबंधी कार्य [छायाचित्र/ छायाचित्रण व्यतिरिक्त]
या बाबतीत - लेखक/ निर्माता यांच्या मृत्युनंतरच्या पुढील वर्षापासुन साठ वर्षापर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असतो.
उदा. जर लेखक/ निर्माता यांचा मृत्यु २०११ साली झाला तर ते कार्य पुढील वर्षापासुन म्हणजे २०१२ पासुन २०७२ पर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल
  • निनावी - अनामित कार्य - टोपन नावाने लिखित
  • लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले कार्य
  • छायाचित्र
  • चलचित्रनिर्माण - चित्रपट
  • ध्वनिमुद्रण - नोंदणी
  • शासनाचे - सरकारी कार्य
  • सार्वजनिक अंगीकृत कार्य
  • आंतरराष्ट्रीय संघटना कार्य
या बाबतीत - पहिल्या प्रकाशनानंतरच्या पुढील वर्षापासुन साठ वर्षापर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असतो.
उदा. २०११ साली प्रकाशित कार्य पुढील वर्षापासुन म्हणजे २०१२ पासुन २०७२ पर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल.
  • प्रक्षेपण पुनर्निर्माण हक्क:
या बाबतीत पहिल्या प्रक्षेपणानंतरच्या वर्षापासुन पुढील पंचवीस वर्षांपर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल.
  • प्रेक्षकांसमोर सादर करून दाखवणारा (नट - कलाकार - वादक इ):
या बाबतीत पहिल्या प्रयोगानंतरच्या/ सादरीकरणानंतरच्या वर्षापासुन पुढील पन्नास वर्षांपर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल.

उचित व्यवहार - फेअर डीलिंग - च्या आधारे काय करता येते?

या बाबतीत वाङमयीन कार्य, संगीतयुक्त कार्य, नाटक - ड्रामा, मूकनाट्य - परीकथेवर आधारित मूकनाट्य, चित्रीय - सचित्र, चित्रकला - रंगकला, शिल्पसंबंधी कार्य [संगणकीय कार्यक्रमाव्यतिरीक्त] यांचा वापर खालील गोष्टींसाठी करता येतो:
  • वैयक्तिक वापर - संशोधन वगैरे
  • गुण-दोषविवेचन - समालोचन
  • संघ किंवा संघटना - यांच्याकडुन विना फायदा/ नफा या तत्त्वावर वापर/ उपयोग केला गेल्यास
  • संघ किंवा संस्था - या बाबतीत प्रयोग/ खेळ हा केवळ हौस म्हणून/ प्रेक्षकांकडुन पैसे न घेता अथवा धर्मसंस्थेच्या फायद्यासाठी वापर/ उपयोग केला गेला असल्यास
  • पुस्तकाच्या तीन पेक्षा जास्त प्रती न काढता वापरल्यास
अधिक माहिती: विकिपिडीया

आता ब्लॉगवर/ संकेतस्थळावर केलेले लेखन हे आपल्या विचारातुन झाले असेल तर ते लेखन रुपात आले की कॉपीराईट - प्रताधिकार - लागू होतो. संबधित लेखनाच्या प्रकाशित तारखेवरुन त्याचा अस्सल/खरेपणाही कळतो त्यामुळे अशाप्रकारचे लेखन/ चोरी बर्‍याचदा सापडते. अशा संकेतस्थळांवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.


तर असा हा कॉपीराईट - प्रताधिकार, थोडक्यात!


थोडं विषयांतर करुन पायरसीकडे [चाचेगिरी?] पाहु. संगणक आणि संगणकाची आज्ञावली पासुन ते चित्रपटांच्या पायरसी पर्यंत.


आपल्याला सध्या संबधित असलेली संज्ञा: सॉफ्टवेअर पायरसी [संगणकाची आज्ञावली चौर्य!]: साध्या भाषेत सांगायचं तर - सॉफ्टवेअरचे प्रताधिकार उल्लंघन म्हणजेच सॉफ्टवेअर पायरसी! अर्थात इथेही प्रताधिकार - कॉपीराईट - हा प्रकार आहेच. आपण वापरत असणार्‍या संगणकावरील कार्यरत प्रणाली [ऑपरेटींग सिस्टम] ते संगणकावर टाकलेले सॉफ्टवेअर्स [संगणकाची आज्ञावली] हे सर्व सॉफ्टवेअर पायरसी मध्ये येते. त्यामुळे कोणतंही सॉफ्टवेअर फुकट मिळालं अथवा मित्रानं दिलं म्हणुन इंस्टॉल करायच्या आधी नक्की विचार करा.


बिझनेस सॉफ्टवेअर अलायंस
च्या पाहणीनुसार भारत ६९% इतका पायरसी प्रमाण नोंदवुन ४२व्या क्रमांकावर आहे तर चीनचे पायरसी प्रमाण ८२% असुन तो १७व्या क्रमांकावर आहे.

ब्लॉग - साहित्यचोरी - फोटो - ग्राफिक्स ते पायरेटेड सॉफ्टवेअर्स पासुन सिनेमाचे टॉरेंट्स सगळं एकच! कुणी कुणाला दोष द्यायचा? पायरसी आणि कॉपीराईट्स याबाबतीत लेखक आणि वाचक दोघांमध्येही प्रामाणिकतेची आणि कर्तव्यनिष्ठेची जाणीव हवीच हवी!

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers