- पाऊस भेट तो नाही म्हणाला सकाळचा सोनेरी सूर्यप्रकाश . रस्त्यावर जणू सोनेरी सडाच टाकलेला. आणि समोर तो.उंच.रुबाबदार. त्याला पाहताक्षणी माझी दुनियाच बदलून गेली. इथे-तिथे-जिथे तिथे मला तोच दिसायचा. मी नववीत असेल तेव्हा. तो खूप खूप हुशार, शांत. त्याचं बोलणं, हसणं, बसणं, वागणं सारंच मला आवडायचं. त्याचं दर्शन झालं की, पूर्ण दिवस मी खूप आनंदात राहायचे. घरची सर्व कामं करताना डोक्यात तोच असायचा. त्या नादात कामही चांगलं व्हायचं. मला सतत त्याच्यासारखंच व्हायचं होतं. हुशार, परफेक्ट. त्याच्यासारखाच अभ्यास करायचा होता. मला त्याचाच ध्यास लागला होता. मी अभ्यासाला लागले होते, कारण तो खूप अभ्यास करायचा. मार्क्स चांगले पडायला लागले. मी हुशार मुलगी म्हणून ओळखले जाऊ लागले. मन बहरू लागले. माझ्या मनातल्या प्रेमानं चांगलंच बाळसं धरलं होतं. त्यात माझ्या घरी गरिबी अमाप. मी स्वकष्टानं शिकत होते, भावंडांना मदत करत होते. कधी कधी उपाशी झोपावं, तर झोपही येत नसे. पुस्तक वाचत जागी राहायचे. पण मनात जिद्द होती आणि समोर तो होता माझी प्रेरणा म्हणून उभा.! मी प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश मिळवायचे. फलकावर नाव झळकायचं. वाटायचं तो वाचेल माझं नाव, त्यानं वाचलं समजा तर त्यापेक्षा दुसरं मोठं बक्षीस नाही.! माझ्या घरचा खूप विरोध, कॉलेजला जायला नकारच होता. लग्न करून टाकायची घाई. मी दिसायलाही चारचौघीत उठून दिसणारी, लाघवी, हुशार. दोन-तीन नोकरदार स्थळं आली; पण मी ठाम नकार दिला. मी रोज पहाटे उठून देवाजवळ बसून प्रार्थना करायचे, माझ्या वडिलांना मला शिकवण्याची सुबुद्धी दे देवा, अशी भीक मागायचे. पण, सगळं व्यर्थ. ते तयार नव्हतेच. पण मी लाख प्रय} केले. अखेरीस परवानगी मिळाली. ड्रेस नाहीत, पैसे नाहीत. हे प्रश्न तर फार लांबचे होते. मी कशीबशी अकरावी सायन्सला अँडमिशन घेतले. कॉलेजला गेले, अभ्यास मन लावून केला. प्रेम हृदयाच्या कप्प्यातच बंद करून टाकलं. बी.एस्सी. झाले. पुढे एम.एस्सी.साठी विद्यापीठात गेले. आता स्वातंत्र्य मिळाले होते मला माझी वाट निवडण्याचे. दरम्यान, तो डॉक्टर होणार होता. आम्ही कधीही बोललो नाही, भेटलो नाही; पण त्याच्या आठवणीशिवाय माझा एक क्षणही गेला नाही. एक दिवस ठरवलं, त्याला भेटायचं. सांगायचं खरं काय ते.! त्याला फोन केला. तीनशे किलोमीटरचे अंतर पार करून त्याला भेटायला गेले. महिनाभराचे मेसचे पैसे खर्च करून त्याच्या शहरात पोहचले. तो भेटला. सोबत त्याचे आणखी दोन मित्र होते. बाहेर जोराचा पाऊस बरसत होता. मन खुलवत होता. माझ्या मनात जपलेलं नऊ वर्षं प्रेमाचं गुपित मी आज त्या पावसाच्या साक्षीनं सांगणार होते. आम्ही दोघं पावसाच्या सरीसोबत चालत होतो. त्याचे मित्रही मागे सोबत चालत होते. मी त्याला सारे सांगितले, मी त्याच्याचमुळे जगायला शिकले हेदेखील सांगितले. त्यानं सारं ऐकून घेतलं. आणि. ‘नाही’ म्हणाला.! मी गहिवरले. डोळ्यातून उधाणलेले अर्शू मला थांबवता आले नाही; पण पावसासोबत तेही धुतले गेले. मी परत बसमध्ये चढले. माझ्या गावी परत आले. सारे संपले होते. ज्याच्यासाठी, ज्याच्यामुळे जगत होते. तो फक्त ‘नाही’ म्हणाला. पण जगणं थोडीच थांबणार होतं. नाहीच थांबलं. पुढची काही वर्षं माझे हात रोज वीस-वीस तास काम करत होते. मी नोकरी केली. पुढे पाच वर्षांनी विवाह झाला. मुले झाली. सारं आयुष्य चाकोरीतून आनंदाच्या वाटेवर जगायला लागलं. पण.? ती ‘पाऊसभेट’ मात्र दरवर्षी आठवते.पाऊस जगवतो सार्या जगाला.त्यानं मला जीवदान दिलं. तो नाही म्हणून मी थांबले नाही उलट मनाचा एक कोपरा कायम ओलाचिंब असतो.आणि जन्मभर राहीन.! - सागरराणी-- ऑक्सिजन (लोकमत ) मध्ये आलेला एक लेख
Friday, August 26, 2011
पाऊस भेट
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment