Demo Site

Monday, August 8, 2011

जेव्हा मित्रांत भांडण होतात... तेव्हा...

माफ कर मित्रा मला, मोठी चूक झाली यार,
त्या चुकीसाठी एवढी शिक्षा खूप झाली यार.
त्यादिवशी आपण एकमेकांशी विनाकारण भांडलो,
मग तू माझ्याशी कधीही न बोलण्याची शपथ घेतलीस,
तू माझ्याशी बोलणं सोडलस आणि मला एकट केलंस,
तोंड असून माझ्याकडे मला मुकं करून टाकलस,
खरंच सांगतो, मी आजकाल फारसं कुणाशी बोलत नाही रे,
बोलण्याकरता अनेक गोष्टी सुचतात आणि आतल्या आत विरतात...
तू जरी बोलणं सोडलस, तरी मी मात्र तुझ्याशी आजही पूर्वी इतकाच बोलतो,
पूर्वी फक्त मी तुझ्यातल्याच तुझ्याशी बोलायचो,
आज मी माझ्यातल्या तुझ्याशी बोलतो...
आजकाल तू मला नेहमीच टाळतोस,
मी असेन जिथे, तेथून तू पळ काढतोस,
थांबावं लागलंच तुला, तर माझ्या आरपार तू पाहतोस,
इतर मित्रांमध्ये तू खूष आहेस, आनंदात आहेस,
हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्नही करतोस,
कधी एकदा माझ्याकडे, माझ्या डोळ्यांकडे बघ,
खात्रीनं सांगतो, मी त्याही वेळेस तुझ्याच कडे बघत असणार......




आठवतात का रे तुला क्रिकेटच्या मॅचेस पाहायचो आपण,

इंडियाची कुठलीही मॅच पाहताना सारं जग विसरायचो आपण.
आपल्या सचिनची मध्ये एकदा डबल century झाली होती,
यार, काय तुफान मजा आली होती.
त्यानं शेवटच्या over मध्ये २०० धावा पूर्ण केल्या,
आणि मी आनंदानं उडीच मारली,
टाळी देण्यासाठी हात वर केला, आणि.............
मग लक्षात आलं, घरात एकटाच होतो रे मी,
मगाच पासून एकटाच ओरडत बडबडत होतो मी,
तू जवळपास आहेस असं समजून आनंदात होतो मी......
त्यादिवशी तुझ्या जवळ असण्याची किंमत माझ्या टाळीसाठी आसुसलेल्या हातांनाही समजली.
तुझ्या असण्याची खूप सवय झाली आहे रे,
त्यामुळे तुझ्या नसण्याची सवय नाही करता येत मला.
तू जवळपासच आहेस, असा भास होतो मला, त्रास होतो मला.
खरंच एक सांगू , सचिनने त्या दिवशी उगाच एवढ्या धावा केल्या.......
उगाच एवढ्या धावा केल्या...............




लोकं विचारतात , तुमच्या भांडणाच कारण काय होतं?

कारण महत्त्वाचं नव्हतं रे, इतके दिवस ते टिकलंच कसं हाच प्रश्न पडलाय बघ मला,
खरं तर ती असते एक excitement , ओसरल्यावर राग जातो पण भांडण उरतं,
पूर्वी केलेल्या चुकांच्या पश्चातापामध्ये आपण रोज जळत राहतो,
झालेल्या जखमेवर खपली धरायच्या आधीच भळभळून रक्त वाहू लागतं.
पण मला ठावूक आहे, ही जखम फक्त मलाच झाली नाही,
त्या अग्नीमध्ये फक्त मीच जळतो असं नाही,
कारण मला माहीत आहे, माझं बोलणं ऐकणारे जर कोणी नसतील,
तर तुझ्याशी बोलणारेही खूप कमी असतील.
माझी टाळी घेणारे जर कोणी नसतील ,
तर तुला टाळी देणारेही कोणी नसेन.
आणि मला हेही ठावूक आहे , वर्गात बाकावर जशी माझ्या डावीकडील जागा नेहमीच रिकामी असते,
तशी तुझ्या उजवीकडील जागासुद्धा रिकामीच असते..............




आणि एक दिवस मी असाच तुझ्या विचारात खिडकी शेजारी बसून होतो,

तेवढ्यात मी तुला माझ्या घरी येताना बघितलं,
माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता, पण ते घडत होतं.
तू घरात आलास, नकळत माझा हात हातात घेतलास.
खरं तर आता काहीच बोलण्याची गरज नव्हती, आणि शक्यही नव्हतं,
कारण शब्दांपेक्षा बाहेर पडायची घाई साल्या अश्रूंना झाली होती.........
मग तूच वाचा फोडलीस , आणि "Sorry" म्हणालास.
मीही तुला 'Sorry' म्हणणार इतक्यात.......गजराच घड्याळ वाजलं,
आणि नेहमीप्रमाणे त्या दिवशीही ते स्वप्न अर्धवट राहिलं,
पण खरंच एक सांगू, स्वप्नात का असेना,
तुला असं जवळून, हातात हात घालून पाहण्याचं सुख वाटत मला.
आजही मी असाच तुझ्या विचारात त्याच खिडकीशेजारी बसून राहतो,
कारण मला खात्री आहे, तू नक्की येशील ,
आणि नुसता हात हातात नाही तर घट्ट मिठीच मारशील.
अश्रूंना मी थांबवू शकणार नाही, पण मात्र माफी मीच आधी मागणार बरं का........
तेव्हा......करशील ना माफ मला?

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers