आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक या चार महिन्यांचा चातुर्मास हा खरे म्हणजे व्रतवैकल्यांचा काळ. आषाढ महिन्यात दक्षिणायन चालू होते. या काळात देव शयन करतात, अशी समजूत आहे. देव झोपी जातात, तेव्हा आसुर प्रबळ होतात. त्यांचा त्रास मानवाला होऊ नये म्हणून या काळात अधिकाधिक उपासना करण्याच्या दृष्टीने या चार महिन्यांत अधिकाधिक व्रतवैकल्ये येतात. हल्लीच्या काळी पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आणि धर्माचरणाच्या अभावामुळे व्रते करण्याचे महत्त्व कमी झाले आहे किंवा त्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. व्रते श्रद्धापूर्वक आणि शास्त्रानुसार केल्याने त्यातून चैतन्य मिळून ईश्वराप्रती भाव वाढण्यास साहाय्य होते. म्हणून या काळातील व्रते समजून घेऊ..
ही झाली श्रावण महिन्यातील काही महत्त्वाची व्रतं. श्रावण महिन्यातील अन्य वारांच्या दिवशीसुद्धा त्या त्या वारांप्रमाणे काही जण व्रत पाळतात.
शिवमुष्टी हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी केले जाते. सुवासिनीने लग्नानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार करावयाचे हे व्रत आहे. हे व्रत करतांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी - तांदुळ, दुसर्या सोमवारी - तीळ, तिसर्या सोमवारी - मूग व चवथ्या सोमवारी - जव किंवा गहू या धान्यांच्या पाच मुठी देवावर वहाव्यात. शिवामूठ शिवपिंडीवरती वहायची असते. हे व्रत शिवमंदिरात जाऊन करतात. ज्यांना ते शक्य नसते त्या घरच्या देवघरातील शिवपिंडीला शिवामूठ वहातात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी फक्त एक वेळ आहार घेऊन शिवलिंगाची पूजा करावी. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ )
देव आणि दानव यांच्यातील संघर्षामध्ये देवांवर आलेले संकट दूर होण्यासाठी देवस्त्रियांनी महालक्ष्मीची प्रार्थना केली आणि मग श्री महालक्ष्मीने हे संकट दूर केले. तेव्हापासून या प्रसंगाची आठवण म्हणून आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण श्री महालक्ष्मीने करावे, यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करण्यात येते. ऋषीपंचमीनंतर मूळ नक्षत्रावरती गौरींची स्थापना करण्यात येते. त्यासाठी दोन मुखवटे घरी आणण्यात येतात. एक मुखवटा असतो, तो ज्येष्ठा गौरीचा आणि दुसरा असतो कनिष्ठा गौरीचा. तीन दिवस हे मुखवटे ठेवण्यात येतात. गौरींना निरनिराळ्या प्रकारचा नैवेद्य देण्यात येतो आणि नंतर तिसर्या दिवशी या मुखवट्याचे विसर्जन करण्यात येते. काही ठिकाणी मुखवट्यांच्याऐवजी खडे आणले जातात. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ )
उद्देश
मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यामुळे कळत-नकळत जे दोष लागतात, त्याचा स्त्रियांवर, पुरुषांवर आणि वास्तूवरसुद्धा अयोग्य परिणाम होतो़ त्यांच्या निवारणासाठी हे व्रत करावे. स्त्रियांवर होणारा अयोग्य परिणाम ऋषीपंचमीच्या व्रतामुळे कमी होतो. तसाच तो गोकुळ अष्टमीच्या व्रतामुळेसुद्धा कमी होतो.
या दिवशी स्नान करून अरुंधतीसह कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ या सप्तर्षींची पूजा केली जाते. पूजेसाठी पाटावर किंवा चौरंगावर तांदुळाच्या आठ पूजा घालून त्यावर सात ऋषी व एक अरुंधती, यांच्यासाठी आठ सुपार्या मांडाव्यात. पूजेच्या सुरुवातीला ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागले असतील त्यांच्या निराकरणासाठी व अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करतात व त्यानंतर त्यांची शोडषोपचारे पूजा करतात. पूजेमध्ये सप्तर्षींना वहाण्यासाठी तुळस, आघाडा, बेल, रुई, शमी व धोत्रा या पत्रींचा समावेश करतात. पूजेनंतर ऋषींचे विसर्जन करावे असा विधी आहे. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा व बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.
पूर्वी ऋषी मुनी सकळी । नित्य पिकवती साळी ।।
ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी । महातपस्वी पुण्यपुरुष ।।
याचा अर्थ असा आहे - पूर्वीच्या काळी महातपस्वी पुण्यापुरुष असे हे ऋषीमुनी आपल्या मंत्रसामर्थ्याच्या आधारे रोज साळी हे धान्य पिकवत असत. या दिवशी या ऋषीमुनींच्या मंत्रसामर्थ्याचे आणि त्यांच्या अपरिग्रह वृत्तीचे स्मरण करत व्रत करावे.
ऋषीपंचमी हे व्रत १२ वर्षे करावे आणि त्यानंतर या व्रताचे उद्यापन करावे. उद्यापन केल्यानंतरसुद्धा हे व्रत चालू ठेवता येते. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक, उत्सव व व्रते’)
1 comments:
व्रत करणे म्हणजे संकल्पसिद्धीसाठी आवश्यक अशी मनोवृत्ती विकसित करणे असा अर्थ बृहदारण्यकोपनिषदाने दिला आहे. सर्व मंत्रांसोबत त्यांची वेगवेगळी व्रतें आहेत. पुराणकाळात मंत्रपठणापेक्षा आवश्यक मनोवृत्ती विकसित करण्याला अधिक महत्व दिले गेले.
Post a Comment