Previous Chapter Next Chapter
अति प्राचिनकाळी खुरासन प्रांतामध्ये एक लैकिकसंपन्न बादशहा राज्य करीत होता. त्याचे पदरी आठ प्रधान होते. ते कर्तव्यद्क्ष होते. इतर नोकर-चाकरसुद्धा आपले काम दक्षतेने करीत. बादशहाचे नाव होते, कर्दनशाह. कर्दनशाह इतका न्यायनिष्ठुर होता की, न्यायासनापुढे प्रत्यक्ष मुलाचीही तो पर्वा करीत नसे. प्रत्यक्ष राज्यात रहाणारा बरझाक नावाचा अत्यंत धनवान व उदार अंत:करणाचा सौदागर, राजाचा जिवलग मित्र होता. बरझाकला फक्त एकच कन्यारत्न होते, तिचे नाव हुस्नबानु.
काही काळाने मरणसमयी सौदागाराने राजास बोलावून आपली धनदौलत व कन्या हुस्नबानू त्याच्या ताब्यात दिली. मित्राच्या अफाट संपत्तीचा लोभ न धरता हुस्नबानू तारूण्यात आल्यावर राजाने सर्व संपत्ती तिच्या स्वाधीन केली. हुस्नबानू आपल्या दाईसमवेत पित्याच्या वाड्यात राहू लागली. हुस्नबानूची आई लहानपणीच वारली असल्याने ती दाईसच आई म्हणत असे. एके दिवशी हुस्नबानु दाईस म्हणाली, ’आई॒! हा संसार निरर्थक आहे. सारी धनदौलत गरिबांस वाटून अल्लांचे नामस्मरण करीतच जीवन सार्थकी लावावे असे मला वाटते. या बाबतीत तुझे मत काय आहे?’
ते बोलणे एकुण ती दाई मोठ्या प्रेमाने म्हणाली, ’हा वेडेपणा तु करू नकोस. एका साधुमहाराजांच्या कृपेने मला सात प्रश्न माहित आहेत. ते सर्व प्रश्न तू दरवाजावर लिहून ठेव. त्याची जो समाधानकारक उत्तरे देईल त्याच्याशी तू लग्न कर, म्हणजे तुझे जीवन सुखी व समाधानी होईल.
१) एक वेळ पाहिले आहे पुन्हा पहाण्याची इच्छा आहे.
(एक बार देखा है, दुसरी बार देखने की तमन्ना है)
२) चांगले कर आणि पाण्यावर टाक.
(नेकी कर और दरिया मे़ डाल)
३) कोणलाही दगा देऊ नकोस. देशील तर तशीच फळे भोगशील.
(बदी किसीसे न क्र अगर करेगा तो वही पावेगा)
४) खरे बोलणारा सदा सुखी असतो.
(सच कहनेवाला हमेशा खुशहाल होता है)
५) ’कोहनिदा’ असे आवाज कराणारा पर्वताची खबर आण.
(’कोहनिदा’ पहाड की खबर ला दे)
६) पाणकोंबडीच्या अंड्याएवढा एक मोती माझ्यापाशी आहे. त्याच्या जोडीला दुसरा घेऊन ये.
(वह मोती जो मुर्गाबी के अंडे के बराबर बिल फैल मौजुद है उसीकी जोडी पैदाकर दो)
७) हमामबाद गिर्दची बातमी आण.
(यह है कि हमामबाद गर्द की खबर ला दे)
दाईने सांगितलेले सातही प्रश्न ऎकल्यावर हुस्नबानु म्हणाली की, ’या प्रश्नांची उत्तरे देणारा ज्ञानसंन्न पुरूष सापडणे अत्यंत अवघड आहे व त्याप्रमाणे सापडल्यास त्याच्याशी विवाह करून मी सुखी होईन हे तरी कशावरून? तिचा प्रश्न ऎकुन त्या दाईने साधूची योग्यता सांगितली व त्याप्रमाणे आचरण केल्यास सुखप्राप्ती निश्चित होईल असा विश्वास तिच्या ठिकाणी निर्माण केला.
(क्रमशः)
0 comments:
Post a Comment