Previous Chapter Next Chapter
हुस्नबानू त्याप्रमाणे आपल्या जीवनातील दिवस घालवीत होती. एक दिवस रस्तावरील मौज खिडकीतुन ती पाहत होती. एक वृद्ध साधुमहाराज आपल्या शिष्यांसह रस्त्यावरून जाताना दिसला. त्याचे शिष्य त्याच्या मार्गावर सोन्यारूप्याच्या विटा ठेवीत होते. त्यावरून जमिनीला पाय न लावता साधुपुरूष चाललेला पाहून ती आश्चर्यचकीत झाली व तिने दाईस हा असा का चालला आहे असे विचारले.
तेव्हा दाई म्हणाली, ’बेटी, हा साधुपुरूष राजाचा गुरु आहे व त्याच्या भेटीसाठी तो जात आहे. कधी कधी राजसुद्धा त्याच्य दर्शनास जातो.’
नंतर बानूने दाईला विचारले की, ’आई!, तुझी परवानगी असेल तर या साधुपुरुषास आपल्या घरी बोलावून त्याचे दर्शन मी घेऊ का?’ तेव्हा ती म्हणाली, ’तुझी इच्छा असल्यास जरूर दर्शन घे.’
त्याप्रमाणे आपल्या चाकराकरवी हुस्नबानूने साधुस निरोप पाठविला की आपल्या चरणांची धूळ आमच्या घराला लावून आम्हाला पावन करावे अशी प्रार्थना आहे.
साधूने तिच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. दुस-या दिवशी येण्याचे मान्य केले. हुस्नबानूस अतिशय आनंद झाला. तिने त्या दिवशी संपूर्ण महाल शृंगारला. निरनिराळ्या प्रकारची उत्तमोत्तम पक्वान्ने तयार केली. प्रात:काळीच साधूला घेऊन येण्यासाठी चाकरास पाठवून दिले.
बाह्माचारी साधू असणारा तो इसम अत्यंत दृष्ठ व भयंकर नीच पातळीचा ढोंगी माणूस होता. दृष्ट कृत्ये करण्यास तो सरावला होता. त्याचे शिष्यसुद्धा पापकर्म करण्यात पटाईत होते. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की, त्याच्या पापांचा सुगावा कोणालाच लागत नसे. त्यामुळे राजाचीसुद्धा त्याच्या ठिकाणी श्रद्धा होती. राजादेखील त्याला पूज्य मानी.
साधूच्या स्वागतासाठी हुस्नबानूने सर्व वाडा सजविला, दिवाणखान्यात भरजरी बैठकी घातल्या. ठरलेल्या वेळी साधू आपल्या शिष्यांसह आला. बानूने त्याला आसनावर बसविले. मनोभावे त्याची पूजा केली. मौल्यवान जवाहि-यांची भरगच्च ताटे त्याच्यासमोर ठेवून ती हात जोडून उभी राहिली. तेव्हा ती धनदौलत पाहून साधू शांतपणे म्हणाला, ’ही संपत्ती घेऊन मी काय करणार? मला त्याचा उपयोग का?’ साधूची ही वैराग्य वृत्ती पाहून बानूला त्याचेबद्दल अतिशय आदर वाटू लागला.
नंतर साधूला बानूने दुस-या दालनात नेऊन भरजरी पोषाख अर्पण केले. पण त्याने त्याचाही अंगिकार केला नाही.
त्यानंतर तिस-या दालनात बानू त्याला घेऊन गेली. तेथे मोत्याचे जाळीदार पडदे सोडलेले होते. हंड्या व झुंबरांनी तर फारच शोभा आली होती. सोन्यारूप्याच्या सुंदर ताटात त-हेत-हेचा चविष्ठ पक्वान्ने वाढून बानूने सर्वांपुढे ठेवून त्यांना प्रार्थना केली, ’महाराज! जवाहार व भरजरी पोषाख यांचा आपण स्वीकार केला नाही, तेव्हा जर कृपा करून थोडा उपहार केलात तर मी स्वत:ला भाग्यवान समजेन.’
तिची ती प्रार्थना ऎकुन तो दृष्ट साधू जड अंत:करणाने खावयास बसला. पण त्याची नजर तिच्या मौल्यवान संपत्तीकडे होती. राजापेक्षाही अधिक ऎश्वर्य असणारी तिची संपत्त्ती लुटावी कशी याची चिंता त्याला लागून राहिली होती. भोजन झाल्यावर अत्तर-गुलाबाचा स्वीकार करून हुस्नबानुस आशीर्वाद देऊन साधुमहाराज तेथून बाहेर पडले.
त्या दिवशी हुस्नबानु आणि तिचे नोकरचाकर साधूच्या आदरातिथ्याने थकुन जाऊन गाढ झोपले होते. त्यांनी मौल्यवान वस्तुंची आवराआवर केली नव्हती. एवढेच तर त्या वाड्याचे दरवाजेही लावायचे राहून गेले होते.
तो दरोडेखोर साधू आपल्या शिष्यांसह मध्यरात्री वाड्यात आला. त्याने लगेच किमती वस्तु चोरण्याचा सपाटा चालविला. तेवढ्यात बानूचे काही नोकर जागे झाले व चोरांना प्रतिकाल करू लागले. परंतु त्यांच्यापैकी कांहीना ठार करून तर काहिंना जखमी करून साधुने संपत्ती लुटून नेलीच. त्याच्या या गोंधळाने हुस्नबानुस जाग आली व तिने त्या दुष्ट साधुची पापकर्मे स्वत: पाहिली. ज्याला आपण दैवी अंग मानला तो साधूच महा नीच कृत्ये करणारा आहे हे पहाताच बानूस अतिशय संताप आला. त्याचा नायनाट केलाच पाहिजे, म्हणुन जखमी नोकरांना घेऊन ती राजवाड्यात आली. प्रधानाने तिची हकीकत ऎकुन घेतली व ती राजास सांगून तो म्हणाला, ’महाराज! तुमच्या जिवलग मित्राची कन्या आपल्याला स्वत: हकीकत सांगण्याची परवानगी मागत आहे.’
राजाने त्याप्रमाणे बानूस बोलाविले तेव्हा घडलेली सर्व हकीकत सांगुन ती म्हणाली, ’खुदावंत! ज्याला आपण गुरु मानलेत त्याने विरक्तपणाचे सोंग घेऊन अशी भयंकर कृत्ये केली आहेत, तेव्हां योग्य न्याय करावा.’
0 comments:
Post a Comment