Tuesday, June 14, 2011
भोजनाच्या वेळचे आचार
अ. उजव्या हाताने भोजन करावे. लहान मुलांनाही उजव्या हातानेच जेवण्याची सवय लावावी.
आ. घास घेतांना पाचही बोटांचा वापर करावा. काट्या-चमच्याने खाणे शक्यतो टाळावे.
इ. वरण-भात आणि त्यावर तूप यांच्यापासून जेवणास प्रारंभ करावा. जेवणाच्या प्रारंभी जड, स्निग्ध,गोड, शीत आणि घट्ट पदार्थ खावेत. जेवणाच्या मध्ये आंबट अन् खारट पदार्थ खावेत. जेवणाच्या शेवटी तिखट आणि कडू पदार्थ खावेत.
ई. जेवतांना प्रत्येक घास अनेकदा (३२ वेळा) चावून खावा.
उ. जेवतांना मध्ये मध्ये पाणी प्यावे.
उ १. भांड्याला तोंड लावून पाणी प्यावे.
उ २. डाव्या हातात पाण्याचे भांडे धरून आणि उजवा हात पालथा करून खालच्या दिशेने उजव्या हाताचा भांड्याला आधार देऊन पाणी प्यावे.
उ ३. खरकट्या हाताने पाणी पिऊ नये.
उ ४. पाणी पितांना मान वर करून पिऊ नये.
उ ५. पाणी गिळतांना ‘गट् ऽ गट् ऽ’, असा ध्वनी (आवाज) करू नये.
ऊ. जेवतांना डाव्या हाताने अन्न वाढून घेऊ नये; दुसर्याला वाढण्यास सांगावे. दुसर्याने वाढणे शक्य नसल्यास प्रार्थना करून नामजप करत डाव्या हाताने अन्न वाढून घ्यावे.
ए. जेवतांना पोटाचे दोन भाग अन्न ग्रहण करून, तिसरा भाग पाण्यासाठी आणि चौथा भाग वायूच्या चलनासाठी मोकळा ठेवावा.
ऐ. ताटातील अन्नाच्या शेवटच्या घासाचा वास घ्यावा आणि उच्छिष्ट भक्षिणार्या पूर्वजांसाठी म्हणून ‘उच्छिष्टभाग्भ्यो नमः ।’ असे उच्चारून तो घास ताटाच्या बाहेर जेवणार्याच्या डाव्या हाताला ठेवावा. ‘उच्छिष्टभाग्भ्यो नमः ।’ याचा अर्थ आहे - ‘उच्छिष्टातील वाटेकर्यांना नमस्कार असो !’ नंतर उजव्या तळहातावर पाणी घेऊन ‘अमृतापिधानमसि स्वाहा ।’ असे म्हणून त्यातील अर्धे पाणी प्राशन करावे आणि अर्धे पाणी पुढील मंत्र म्हणून त्या घासावर सोडावे.
रौरवे पूयनिलये पद्मार्बुदनिवासिनाम् ।
अर्थिनामुदकं दत्तम् अक्षय्यमुपतिष्ठतु । - धर्मिंसधु, परिच्छेद ३
अर्थ : पूयाने (व्रण, काटा रुतणे आदींमुळे ‘पू’ निर्माण होऊ शकतो. अशा ‘पु’वाने) डबडबलेल्या रौरव नावाच्या नरकात अब्जावधी वर्षे खितपत पडलेल्या जलार्थ्यांना मी हे उदक देत आहे. त्याचा क्षय न होवो.
ओ. ताटात अन्न टाकू नये. ताटात अन्न टाकून दिल्यास त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावे.
औ. ‘अन्नदाता सुखी भव ।’ म्हणजे ‘हे अन्नदात्या, तू सुखी रहा !’, असे म्हणून, तसेच उपास्यदेवता अन् श्री अन्नपूर्णादेवी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून पाटावरून उठावे.
जेवतांना हे करावे !
अ. शक्य असल्यास सोवळे आणि स्पर्श-अस्पर्श या परंपरा पाळाव्यात.
आ. शक्यतो अन्नपदार्थांचा काला करून खाण्यापेक्षा पदार्थांच्या रुचीचा आस्वाद घेत अन्न सेवन करावे.
जेवतांना हे करू नये !
अ. जेवतांना (किंवा देवळात जातांना) चामड्याच्या वस्तू जवळ बाळगू नयेत.
आ. जेवतांना डाव्या हातावर भार देऊन बसू नये.
इ. जेवतांना अन्न तळहाताला लागू देऊ नये.
ई. घाईघाईने जेवू नये. तसे केल्यास अन्नपचन नीट होत नाही, तसेच अन्नाची चवही कळत नाही. हळूहळू जेवणेही टाळावे. मध्यम गतीने जेवावे.
उ. जेवतांना, तसेच पाणी पितांना आणि आचमन करतांना तोंडाचा ध्वनी (आवाज) करू नये.
ऊ. जेवतांना कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव घेऊ नये. प्रसन्नचित्ताने जेवण करावे.
ए. भोजन करतांना आपापसांत बोलू नये, तसेच बाष्कळपणा, वादविवाद आदी गोष्टी टाळाव्यात.
ऐ. जेवतांना भ्रमणभाषवर (‘मोबाईल’वर) बोलू नये.
ओ. जेवतांना काही वाचू नये.
औ. दूरचित्रवाणीवरील (टीव्हीवरील) कार्यक्रम बघत किंवा मायेतील विषयासंबंधी चर्चा करीत जेवू नये.
अं. भोजनाची निंदा करत भोजन करू नये. अन्न हे प्राणस्वरूप आहे, ते सत्कारपूर्वक खाल्ले, तरच बल अन् तेजस यांत वाढ होते.
क. जेवत्या ताटात बोटाने लिहू नये.
ख. जेवतांना मध्येच उठून जाऊ नये.
ग. जेवतांना एकमेकांना स्पर्श करू नये.
घ. जेवतांना स्वतःच्या ताटातील अन्न दुसर्याला देऊ नये.
च. एकाच ताटातून दोन व्यक्तींनी एकत्र अन्न खाऊ नये.
छ. जेवतांना दुसर्याच्या ताटात पाहू नये; स्वत:च्या ताटाकडे लक्ष असावे.
ज. अन्नात केस असेल, तर ते अन्न खाऊ नये.
झ. झोपून, तुटक्या-फुटक्या भांड्यात किंवा भूमीवर अन्न घेऊन भोजन करू नये.
ट. उष्टे हात घेऊन बसू नये किंवा उष्ट्या हाताने झोपू नये.
ठ. भोजनानंतर ताटात हात धुऊ नयेत.
ड. पंगतीतील सर्वांचे जेवण पूर्ण झाल्याविना पंगतीतून उठू नये. सगळ्यांची जेवणे झाल्याविना पंगतीतून उठल्यास प्रायश्चित्त घ्यावे.
ढ. उभ्याने किंवा चालत चालत जेवू नये.
त. जेवत असलेल्या व्यक्तीला नमस्कार करू नये.
भोजनानंतरच्या कृती
१. अन्न पायदळी तुडवले जाऊ नये, यासाठी जेवण झाल्यावर ताटाभोवती सांडलेले अन्नकण उचलून ताटात किंवा वाटीत ठेवावेत.
२. तीन वेळा चुळा भराव्यात.
३. तोंड धुऊन दातही घासावेत.
४. न्यूनतम (कमीतकमी) ३ ते जास्तीतजास्त २१ वेळा गुळण्या कराव्यात. ३ पेक्षा अधिक गुळण्या करतांना त्या ३ च्या पटीत, म्हणजे ६ किंवा ९ अशा पद्धतीने कराव्यात.
५. पाय धुवावेत.
६. आचमन करावे. आचमन करणे शक्य नसल्यास ते वगळून आचमनानंतरचे आचार पाळावेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
खुप छान माहिती. हे चित्र मी वापरु शकतो का ? फेसबूक वर माझे एक पेग आहे. प्रारबध्द/ कुंडली/ धार्मीक म्हणून
आपली परवानगी असेल तर वापरेन.
धन्यवाद
अमोल केळकर
९८१९८३०७७०
Post a Comment